“जू ” :अस्वस्थ करणारं आत्मकथन
ऐश्वर्य पाटेकर यांचे “जू “ हे आत्मकथन वाचले. खूप दिवसांपासून वाचण्याची इच्छा होती. पण मिळत नव्हते. अक्षरपेरणीचे संपादक बाळासाहेब घोंगडे यांनी पुण्याहून पाठवून दिले.
एका मनस्वी लेखकाने त्याचे अत्यंत वादळी आणि वेदनामय बालपण यात शब्दबद्ध केले आहे. बालवयात सोसावे लागलेले चटके, पडणारे प्रश्न, त्याची न मिळणारी उत्तरे, बोली भाषेत अतिशय समर्पकपणे मांडलेली आहेत. यातील मायलेकरांचा, भावंडांचा संवाद वाचताना जणू आपणही त्यात सहभागी आहोत असे वाटायला लागते. हुशार आणि अतिशय कणखर आईची ही पाच मुले. चार बहिणी आणि स्वत: लेखक!
प्रतिकूल परिस्थितीतही भावंडांमधील हजरजबाबी संवाद, कधी प्रेमाचा, कधी लुटुपुटुच्या भांडणाचा, तर कधी चेष्टेचा, यातून त्यांची शहाणीव दिसून येते. आत्मकथन वाचत असताना उत्तरोत्तर उत्कंठा ताणली जातेच परंतु त्याबरोबरच अस्वस्थताही वाढत जाते. मनाला चटका लावणारे अनेक प्रसंग यात घडतात. पुस्तक वाचताना जाणवते की लेखकाला निरागस, आनंदी बालपण लाभले नाही, उलट पावलोपावली संकटे आणि जीवावर बेतणारे प्रसंगच वाट्याला आले. …आणि त्यात होती ती या भावंडांना छळणारी भूक!
…सतत होणारा आईचा छळ, लागोपाठ झालेल्या चार मुली, पुरुषप्रधान संस्कृतीचे तनामनावर उठलेले ओरखडे आणि हे सोसत आईचे जगणे! …प्रचंड अस्वथ करून टाकते!
जिवावर उठलेली आपलीच माणसे, सततची मारहाण, त्यातून वाचवलेला प्राण! पराकोटीचे कष्ट, क्षणोक्षणी संकटाचे आव्हान देणारे प्रसंग! त्यातून पिल्लांना चिमणचारा भरवून जगवण्याची आईची कसरत!
पण यातून तावूनसुलाखून निघालेलं, परिस्थितीने खंबीर बनलेलं, बापानं सोडून दिलेलं हे कुटुंब, जगत असतं ते फक्त कष्टावर आणि एकमेकांच्या प्रेमावर! प्रेमाचा बंध त्या सर्वांनी याही परिस्थितीत अतूटपणे जपलेला आहे. लेखकाची आई एकटीच्या हिंमतीवर चारी मुलींचे लग्न करते. सुशिक्षित असणारा अडाणी नवरा यात अडथळे आणू पाहतो, त्यालाही ती निकराने तोंड देते, बाप सर्वांच्या जीवावर उठलेला असतो. त्याची काहीही मदत न घेता हे सर्वजण आपले पोट भरत असतात. परंतु त्याही परिस्थितीत तो यांना जगू देत नाही, उलट त्यांच्या कष्टाचे मोल सुद्धा हिसकावून घेतो.
बापाच्या दारुमुळे आईच्या जीवनाची वाताहत झालेली असतेच आणि त्यातच दोन बहिणींच्या वाट्यालाही तेच दुःख येते. मनाने खंबीर आणि कष्टाळू असणाऱ्या बहिणी येथे हतबल ठरतात.
…पण ‘ हेही दिवस जातील.’ हा विश्वास आई देते. …आणि चांगले शिक्षण घेऊन भाऊ, हे साध्य करेल याची खात्री देते. म्हणून त्या सर्वजणी लेखकाच्या शिक्षणासाठी धडपड करतात.
अनेक ह्दय द्रावक प्रसंग यात आहेत. यातलाच एक म्हणजे पमीचं, म्हणजे सर्वांत लहान बहिणीच लग्न ठरत असतं तेव्हाचा. सगळ्या बहिणींची लग्ने झाली आता पमीही जाणार या कल्पनेने भावड्याला( लेखकाला) भरून येते. पमी भांडी घासत असते तेथे जवळ दगडावर तो बसतो आणि त्याला हुंदका येतो,
“काय झालं रे, भावड्या?” टोकरीत हात धुता धुता पमी म्हणाली.
…
“तुझं लग्न व्हणार, तू निघून जाणार, मंग कुनाला ढम्मी म्हननार?”
“अरे म्या येत जाईन न! मंग म्हणत जा हं!” तिचाही कंठ दाटला होता.
अन कवरच्या कवर रडत बसलो. असे अनेक प्रसंग यात येतात.
यातील सर्व पात्र सजीव होऊन डोळ्यासमोर उभी ठाकतात. मायाळू अक्का, हुशार माई, फटकळ पण तितकीच प्रेमळ तावडी, सुंदर आणि भूक न सहन होणारी पमी, त्याबरोबरच बेरकी बाप, दुष्ट आणि निष्ठुर आजी, आत्या!
…पुस्तकाच्या सुरुवातीची लेखकाच्या आईची ओवी मन वेधून घेते.
“चार माझ्या लेकी
चार गावच्या बारवा
अन माझा गं लेक बाई
मधी जोंधळा हिरवा “
…ग्रामीण जीवन, शेती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा वाट्याला येणारी अस्मानी सुलतानी संकटे, सतत उभ्या ठाकलेल्या समस्या आणि चिवटपणे जगणारी माणसे! याचे यथायोग्य चित्रण यात आले आहे. त्याचप्रमाणे आत्मकथनाला समर्पक असे शीर्षक लेखकाने दिले आहे. मानेवर लादलेलं जू बैल जसे मुकाटपणे वागवतो तसेच नियतीने या मायलेकरांच्या खांद्यावर प्रचंड वेदनांचं आणि असंख्य समस्यांचं जू लादलेलं आहे. त्यातून सुटका करून घेण्याची त्यांची धडपड सुरु आहे.
स्त्री इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करू शकते हेच यात दिसते. आपल्या कष्टाळू, जिद्दी, कणखर आणि प्रेमळ आईचे चित्रण लेखकाने समरसून केले आहे.
…बापानं, आजीनं आणि इतर नातेवाइकांनी लादलेलं दारिद्र्य! त्याबरोबरच भुकेचा अगतिक कल्लोळ, आलेली असहायता, आणि या सर्वांशी निकराने लढत असलेलं हे कुटुंब!
त्यांची ताकत आहे ती आईची खंबीर वृत्ती, तिची प्रचंड सहनशीलता, लेखकाची चिकाटी, बहिणींचे अतिव प्रेम, मित्रांबरोबरचा विरंगुळा! या सर्वांच्या पाठिंब्यावर तगून निघालेलं लेखकाचं यश!
…खरोखरच खूप र्ह्दयस्पर्शी आणि अस्वस्थ करणारं
…आणि शेवटी दिलासा देणारं हे आत्मकथन आहे!
– सौ. प्रतिभा जगदाळे
सांगली
परिचय :
नाव– सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे गाव- सांगली शिक्षण : बी. कॉम., एम. ए. (अर्थशास्त्र आणि मराठी) म. सा. प. शाखा सांगली सदस्य पत्ता- ‘धनवंत’ मनिषा स्टेट बँक कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली. ४१६४१६ मोबाईल- ९४२३८७२४९९ Email- pratibhapjagdale@gmail.com प्रकाशित पुस्तके : भावनांच्या हिंदोळ्यावर ( ललितगद्य ) अनुबंध ( ललितगद्य ) मिश्किली ( विनोदी लेखसंग्रह ) चंदनवृक्ष ( चरित्रलेखन ) भावतरंग (काव्यसंग्रह ) इतर- वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, मासिकांमधून लेखन, पुरस्कार: *दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज यांचा उत्कृष्ट लेखनासाठी पुरस्कार, *रेणावी येथील 16 वा “शहाबाई यादव गौरव पुरस्कार” *देशिंग येथील उत्कृष्ट साहीत्य लेखनाचा 13 वा अग्रणी पुरस्कार *आरग येथील शैला सायनाकर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार *शब्दोत्सव ग्रंथोत्सव सांगली येथील उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार *प्रतिष्ठा फौंडेशन तासगावचा “स्री प्रतिष्ठा साहित्य सन्मान पुरस्कार” *९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद २०२०, निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग गोवा येथे झालेल्या ७६ तास अखंड काव्यवाचन “काव्यहोत्र” मध्ये सहभाग *मुलाखत- आकाशवाणी सांगली आणि साम टी. व्ही. *व्याख्याने, साहित्य संमेलनातील परिसंवादात सहभाग, निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. |