डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाचे परीक्षण
डॉ.प्रल्हाद लुलेकर लिखित नवा ग्रंथ
बहुजन संस्कृतीचे सारसूत्र
लेखक,समीक्षक,कवी, विचारवंत,वक्ते आणि प्रशासक प्रल्हाद जी.लुलेकर यांनी हयातभर लेखणी,वाणी आणि प्रशासनातून सम्यक परिवर्तनाची विद्रोही भूमिका मांडली.फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा घेऊन अविरत लोकजागृती घडवत साहित्यालाही नवी दृष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.प्रामुख्याने शोषितांचे प्रश्न आणि साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.त्यांनी सामाजिक समतेसाठी विद्रोही तत्वज्ञानशास्राची मांडणी प्रभावीपणे केली आहे.‘आले ढग…गेले ढग ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे.‘मोगडा’ आणि ‘दलितेतरांसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर’या त्यांच्या वैचारिक लेखनाने मराठी विचारविश्वात मोलाची भर टाकलेली आहे.‘बलुतेदार’, ‘गावगाड्याचे शिल्पकार’व ‘बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे’हे त्यांचे ग्रंथ गावगाड्याच्या समाजशास्रीय, संस्कृतीशास्रीय आणि भाषाशास्रीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.‘वेदनांचा प्रदेश’,‘प्रतिभेचे प्रदेश’,‘पंचधारांचा प्रदेश’,‘साहित्याचे वर्तन आणि वर्तमान’,‘भंजनाचे भजन’,साठोत्तरी साहित्य प्रवाह’आदी ग्रंथांतून त्यांनी परिवर्तनवादी दृष्टीकोनातून केलेली साहित्य समीक्षा आणि केलेले चिकित्सक संशोधन दिशादर्शक व मूलभूत स्वरूपाचे आहे.
दलित आत्मकथने,साठोत्तरी साहित्य प्रवाह, मराठवाड्यातील साहित्य,बारा बलुतेदार आणि गावगाडा,परिवर्तनवादी चळवळी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अवकाशात त्यांनी केलेला अभ्यास मराठी साहित्यात महत्त्वाचा मानला जातो.जवळपास पंचविस ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचे साहित्य आणि समाजचिंतन वाचकांसमोर आलेले आहे.या संबंध लेखनाच्या केंद्रस्थानी वंचित समुहांचा विचार राहिलेला आहे.समाजप्रश्नांच्या बद्दल भारतीय संविधानातील तत्त्वांचा अंगिकार करत त्यांनी केलेला साहित्यिक हस्तक्षेप लोकशाहीवादी समाजनिर्माणासाठी आवश्यक आहे.नुकताच त्यांचा‘बहुजन संस्कृतीचे जनक:महात्मा जोतीराव फुले’हा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.हा ग्रंथही मानवी मूल्यांसाठी आग्रही असणार्या आणि समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पाहणार्या जोतीराव गोविंदराव फुले या माहात्म्याच्या कार्याचे सर्वव्यापीत्त्व विशद करणारा आहे.महात्मा फुले यांनी बहुजन समूहांच्या आयुष्यात घडवून आणलेली क्रांती आणि त्यांच्या संस्कृती निर्माणासाठी घेतलेल्या भूमिकांचा वस्तुनिष्ठ परामर्श प्रल्हाद लुलेकर यांनी प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.महात्मा फुले यांच्या कार्याचे बहुजनवादी दृष्टीकोनातून मांडलेले हे आकलन ‘फुलेविचार’समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.या ग्रंथातून बहुजन संस्कृतीचे सारसूत्र विशद झाले आहे.म्हणून या ग्रंथाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे.
महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पर्यायी संस्कृतीचा कृतिकार्यक्रम देणारे,शोषणमुक्त समाजरचनेचे स्वप्न पाहणारे दृष्टे विचारवंत आहेत.कृती व लेखनातून बहुजनवादी परंपरेची पुनर्मांडणी करणारे समाजसुधारक आणि लेखक आहेत.त्यांनी सामाजिक समतेचा आग्रह धरत आणि बहुजनांसाठी न्यायाची भूमिका घेत लोकशाही व्यवस्थेचा पाया घातला.शूद्र,अतिशूद्र आणि स्रीयांच्या मुक्तीसाठी हयातभर कार्य करत बहुजन संस्कृतीला आकार दिला.शेती,पाणी,शिक्षण,उद्योग, अर्थ,धर्म, जात,इतिहास,स्री प्रश्न आदीसंबंधाने त्यांनी केलेले कार्य आणि व्यक्त केलेले विचार हे बहुजनकेंद्री आधुनिक भारताच्या घडणीला दिशा देणारे आहे.समकालीन वास्तव आणि इतिहासाची चिकित्सा करत त्यांनी लिहिलेले साहित्य हे आधुनिक मूल्यविचार प्रकट करणारे आणि बहुजनांच्या हक्काची भाषा बोलणारे मूलभूत सृजन आहे.सामाजिक न्याय हे मूल्य त्यांच्या संपूर्ण बहुजनवादी कार्याच्या केंद्रव्रती आहे.या मूल्यांचा आग्रह धरत त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली.
याच कार्यसूत्राला केंद्रव्रती ठेवत प्रल्हाद जी.लुलेकर यांनी सदर ग्रंथाची मांडणी केलेली आहे.आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक; तसेच बहुजन समाजाच्या सर्वकष परिवर्तनाचे नायक म्हणून महात्मा फुले यांच्या कार्याची यथोचित मांडणी या ग्रंथातून झालेली आहे.
पाच दीर्घ लेखाच्या माध्यमातून हा दोनशे अठ्ठेचाळीस पृष्ठांचा ग्रंथ सिध्द झालेला आहे.‘जोतिराव फुले यांचे पहिले चरित्र’हा या ग्रंथातील पहिला लेख.तो पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी १९२७ साली लिहिलेल्या ‘महात्मा जोतीराव फुले’या चरित्राचा वेध घेणारा आहे.या लेखातून फुले चरित्रलेखनाच्या प्रयत्नाचा आढावा घेत पंढरीनाथ पाटील यांनी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या पहिल्या विस्तृत चरित्राच्या सामर्थ्यस्थळांची चिकित्सक मीमांसा केलेली आहे.पाटील यांची कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्वाचाही परिचय यानिमित्ताने करून दिलेला आहे.चरित्रलेखनाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करून मूल्यमापन केल्याने हा लेख या चरित्राचे महत्त्व विशद करणारा आहे.बहुजनांचे नायक म्हणून पंढरीनाथ पाटील यांनी रेखाटलेले फुलेचरित्र हा सत्यशोधक चळवळीचा अनमोल दस्तऐवज असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण लुलेकर यांनी नोंदवलेले आहे.महात्मा फुले यांनी बहुजन संस्कृतीला कशारीतीने आकार दिला याचेही सूचन या लेखातून होते.त्यामुळे सदर ग्रंथातील हा पहिलाच लेख महात्मा फुले बहुजन संस्कृतीचे जनक कसे आहेत,याचे अधोरेखन करणारा आहे.
‘बहुजन संस्कृतीचे जनक’हा एक्क्याऐंशी पृष्ठांचा दुसरा दीर्घलेख या ग्रंथातील बीजलेख आहे.बहुजन संस्कृतीच्या जनकत्त्वाची मूलगामी चर्चा या लेखातून झालेली आहे.‘बहुजन’हा शब्द महाराष्ट्रात फारच ढोबळपणाने वापरला जातो.त्याची व्याख्या-व्याप्ती सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला;परंतु त्यातून नेमकेपणाने ही संकल्पना स्पष्ट होऊ शकलेली नाही.या संकल्पनेचा सर्वसमावेशक व अचूक अर्थ प्रथमच या लेखातून विशद झालेला आहे.‘शोषण’हाच बहुजनवादाचा मूलाधार असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.शोषित समूहांच्या मुक्तीसाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची नोंद करून ते बहुजनवादाचे आद्यप्रवर्तक कसे ठरतात,याचे साधार विवेचन या लेखातून आलेले आहे.समता,बंधुता, मानवता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या स्वीकारासह शोषणमुक्त झालेल्या बहुजनांची ती‘बहुजन संस्कृती’असे सांगून ही संस्कृती महात्मा फुले यांनी कशाप्रकारे घडवलेली आहे,याचे विस्ताराने विवेचन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.‘बहुजन’ संकल्पनेचे केलेले विश्लेषण आणि त्याधारे महात्मा फुले यांच्या बहुजनवादी कार्यदृष्टीची केलेली मांडणी मराठी वैचारिक लेखनाला नवा विचारगर्भ आशय देणारी आहे.
महात्मा फुले यांच्या लेखनातील १८८३ साली प्रसिध्द झालेला‘शेतकर्याचा असूड’हा अक्षरग्रंथ आहे.या ग्रंथाच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय शेतकर्यांच्या दु:खाचा विराट पट प्रकट झालेला आहे.या देशातील शेतकरी हा बहुजन संस्कृती निर्माणातील अविभाज्य घटक आहे.या समूहाच्या शोषणाची पोटतिडकीने मीमांसा महात्मा फुले यांनी केलेली आहे.याच मीमांसेचा अन्वयार्थ प्रल्हाद लुलेकर यांनी बहुजनवादी दृष्टीतून आणि वर्तमान शेतीवास्तवाचे परिप्रेक्ष्य स्वीकारून‘एवढे अनर्थ एका अविद्येने…’या लेखातून लावलेला आहे.हा अन्वयार्थ आजच्या शेतीच्या दु:स्थितीची कारणमीमांसा करणारा आणि शेतीविषयक चिंतनात नवी भर टाकणारा आहे.महात्मा फुले यांनी बहुजनांना सत्य आणि नितीवर आधारलेल्या नव्या सार्वजनिक सत्यधर्माचे तत्त्वज्ञान सांगितले.हे त्यांचे तत्त्वज्ञान त्यांच्या महानिर्वाणानंतर प्रकाशित झालेल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’(१८९१) या ग्रंथात उपलब्ध आहे.या ग्रंथाचे अंतरंग ‘सत्य आणि नीती हाच धर्म’या लेखाधारे प्रल्हाद लुलेकर यांनी मूल्य चिकित्सा करत स्पष्ट केले आहे.हे तत्त्वज्ञान वैश्विक असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.
सर्वप्रकारची ज्ञानसत्ता ही अभिजनांच्या ताब्यात असल्याने वाड्मयेइतिहासलेखनातही बहुजन वाड्मय झाकून ठेवत अभिजन साहित्याला प्रेक्षेपित करण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे.त्यामुळे बहुजनांच्या वाड्मयाचा खरा इतिहास समोर आला नाही.म्हणून या इतिहासाचे पुनर्रलेखन करण्याची आवश्यकता आहे आणि हे पुनर्रलेखन करताना फुले-आंबेडकरी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे लुलेकर यांनी म्हटलेले आहे. ‘फुले-आंबेडकरी दृष्टीने वाड्मयेतिहासलेखन’हा या ग्रंथातील शेवटचा लेख या अनुषंगाने इतिहासलेखनाचा बहुजनवादी आराखडा मांडणारा आणि इतिहासलेखनाची नवी दृष्टी देणारा आहे.एकूणच हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या बहुजनवादी कृतिकार्यक्रमांचे स्वरूप विशद करणारा आहे.संशोधन,समीक्षा आणि वैचारिकतेच्या मिलाफातून या लेखनाची शैली घडलेली आहे.ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टात संदर्भग्रंथ सूची आणि महात्मा फुले यांचा संक्षिप्त जीवनपट दिल्याने ग्रंथ परिपूर्ण वाटतो.
महात्मा जोतीराव फुले यांच्या अनुषंगाने आजपावेतो विविध दृष्टीकोनातून विपुल लेखन झाले आहे.त्यांच्या जीवन आणि कार्याचे अनेकविध पैलू अभ्यासकांनी समोर आणलेले आहेत.त्यांच्या लेखनाचा विविधांगी अन्वयार्थही लावला गेला आहे;परंतु बहुजन संस्कृतीचे जनक म्हणून प्रथमच या लेखनाच्या रूपाने विस्ताराने मांडणी झालेली आहे,असे वाटते.त्यांच्या जीवनकार्यासंबंधीच्या अनेक नाविण्यपूर्ण बाबी या ग्रंथातून समोर आलेल्या आहेत.इतिहास आणि वर्तमानाचा दिशादर्शक अनुबंधही या लेखनाने सिध्द केलेला आहे.त्यांच्या लेखनाची वर्तमान प्रासंगिकताही अधोरेखित झाली आहे.पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीचे अनेकविध संदर्भ या लेखनाने प्रकाशात आणलेले आहेत.म्हणूनच महात्मा फुले यांच्याविषयीच्या चिंतनग्रंथात आणि विचारपरंपरेत हा ग्रंथ मोलाचा वाटतो.महात्मा फुले यांच्या समग्र कार्याचे सारसूत्र या लेखनातून उलगडलेले आहे.त्यांनी आकार दिलेल्या बहुजन संस्कृतीच्या प्रारूपाचा आशयार्थ या लेखनाने ठळक केलेला आहे.त्यामुळेच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक ठरते.
— प्रा.केदार कळवणे
मोबा.७०२०६३४५०२
प्रा.केदार कळवणे
.
……………………………………………………………………………………………………….
सहायक प्राध्यापक,मराठी विभाग,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब,जि.उस्मानाबाद.पिन:४१३५०७,
ईमेल:Kedar.kalwane.28@gmail.com
…………………………………………………………………………………………………………
THE HYMN OF LEAVES : SANJAY BORUDE
PARTRIDGE : IT’S A PENGUINE & RANDOM HOUSE PUBLICATION