2020 एप्रिल

राजन गवस नावाचा माणूस : एकनाथ पाटील

सा हि त्या क्ष र 

   संवेदनशील लेखक, हाडाचा शिक्षक आणि आस्थेचा परिघ विस्तारणारा माणूस.

       कसलाही गाजावाजा नाही, भपका नाही, बडेजाव नाही, हारतुरे नाहीत, शाली नाहीत की  कौतुकाची भाषणं नाहीत आणि अत्यंत साधेपणाने ‘गवस गुरुजी’  सेवानिवृत्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या माणसाची ही अशी सेवानिवृत्ती कदाचित अनेकांना आश्चर्यकारक वाटली असेल. पण त्यांना खरेच जवळून जे ओळखतात त्यांना कदाचित यात नवल वाटणार नाही. आजवर आपल्या भूमिकेशी ठाम राहून लेखक म्हणून ज्या प्रकारचे लेखन त्यांनी केले आणि माणूस म्हणून ज्या प्रकारचे  आयुष्य ते जगले, त्याचा विचार करता  त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आणि भूमिकेशी सुसंगत अशीच ही सेवानिवृत्ती आहे.

अगदी काही दिवसांपूर्वी, ‘गवससरांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी ‘एन्. डी. सर’ अध्यक्ष म्हणून येतील का? आपण त्यांच्याकडे जाऊया का?’ अशी विचारणा करणारा रणधीर शिंदे यांचा विद्यापीठातून फोन आला होता.’  ‘जरुर येतील. आपण जाऊया. सोबत टी.एस पाटील सरांना घेऊया’ असं तेव्हा मी म्हणालो खरा. पण का कुणास ठाऊक तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. गवस सर या अशा उत्सवी आणि त्यांच्या गौरवासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी तयार होतील का? असा एक पुसटसा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि पटकन तेव्हाच तो मी झटकूनही टाकला. त्यानंतर चार – सहा दिवसांनी रणधीरच्या फोनची वाट पाहून एन्.डी.सरांकडे जाण्याबाबतच्या चौकशीसाठी रणधीरना मी फोन केला. तर  एव्हाना सेवानिवृत्ती समारंभाचा हा प्लॅन गवस सरांनी उधळून लावल्याचे समजले आणि आज रोजच्यासारखेच ते विद्यापीठात जातील, दैनंदिन कामकाजाचा दिवसभराचा भाग उरकून  नेहमीसारखेच विद्यापीठाच्या कॅम्पसमधून ते अगदी सहजपणे बाहेर पडतील. अपवाद असेल तो फक्त कार्यालयीन कागदपत्रांच्या सोपस्कारांचा. लोकांचा कितीही आग्रह असला, तरी असल्या गौरवाफिवरवाच्या सापळ्यात अडकून राहाणाऱ्यांपैकी ते नाहीत.

नेमकं आठवत नाही पण १९८४- ८५ चा तो काळ असेल हसुर खुर्दच्या श्री. लक्ष्मी विद्यालयात आठवीच्या वर्गात मी शिकत होतो. एका दुपारी आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि चळवळीतले कार्यकर्ते असलेले  आनंद वास्कर सर काखेला शबनम , अंगात झब्बा घातलेल्या शिडशिडीत बांध्याच्या दाढी असलेल्या एका गृहस्थांना घेऊन आमच्या शाळेत आले. लगबग सुरु झाली आणि थोड्याच वेळात शाळेच्या व्हरांड्यातच कार्यक्रमाला सुरवात झाली आणि आम्हाला कळाले वास्कर सरांच्याबरोबर आलेले पाहुणे राजन गवस नावाचे  हे गृहस्थ कोणी मोठे लेखक आहेत. पाहुण्यांना तांब्यातून पाणी नेऊन द्यायची जबाबदारी माझ्या गटाकडे होती .मी आणि माझे मित्र आम्ही आनंदुन गेलो आणि पुढचा तास दिडतास कसा गेला कळालेच नाही. त्यांचं भाषण आणि कविता ऐकत राहावं, असं वाटत होतं. आम्ही  तृप्त झालो. ते काय सांगत होते, ते कळण्याचं ते वय निश्चितच नव्हतं.  पण हा माणूस  आपल्याला ज्याम आवडला. गवससरांची आणि माझी पहिली भेट ही अशी. मध्ये अनेक चढउतार आले  आणि  गेले. पण तेव्हापासून आजतागायत प्रत्येक भेटीत लेखक, शिक्षक, पालक आणि माणूस अशा कितीतरी भूमिकातून हा माणूस जसा मला तसंच सहवासातल्या प्रत्येकाला नवं काही शिकवत आला.

हायस्कूलच्या शिक्षणानंतर गारगोटीच्या मौनी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि  तिथंही हाडापेराच्या या शिक्षकानं मनावर गारुड केलं. मौनी विद्यापीठात तर विजय निंबाळकर, जयंत कळके,आनंद वास्कर आणि गवस सर  अशा  एकापेक्षा एक सरस, हिरे पारखी शिक्षकांचा खजिना होता. हा खजिना अक्षरशः आम्ही लुटला.

 मौनी विद्यापीठात अनेक सामाजिक, सांस्कृतिक  कार्यक्रम व्हायचे. त्यांच्या जोडण्या लावण्यात, पाहुणे आणण्यात गवस सर पुढे असायचे आणि नेमका कार्यक्रम सुरु झाला, की ते एकदम कुठेतरी गायब व्हायचे. ही त्यांची खासियत असायची. त्यांना एखाद्या कार्यक्रमाचे श्रेय घेण्यात,  मिरवण्यात रस नसायचा. मग ते दूर कुठंतरी दिसणार नाही, अशा ठिकाणी मुलांवर आणि कार्यक्रमावर नजर ठेवून अलिप्तासारखे बसून असायचे. ऐन विद्यार्थिदशेत माझ्या  वाचनाला शिस्त लागली ती माझ्या या शिक्षकांमुळेच. गवस सर नेमकं आणि शेलकं हातावर ठेवायचे. शिकायला मी बी.ए.कडे आणि शिकवायला ते स्पेशल बी.ए. बी.एड्. कडे. त्यामुळे नजर चुकवून त्यांचे अनेक तास आम्ही अटेंड करीत असू.

मौनी विद्यापीठाच्या पुढाकारातून गारगोटीत एकदा स्री अभ्यास परिषदेचे आयोजन केले होते. राज्यभरातील चळवळीतले अनेक कार्यकर्ते आणि  या विषयाचे व्यासंगी विद्वान या परिषदेत सहभागी झाले होते. ज्या गृहीतकांवर ही परिषद बेतलेली होती त्यांचा पायाच ठिसूळ असल्याच्या मतामुळे सर या परिषदेपासून सुरवातीपासूनच फटकून होते. मात्र डाॅ. नरेंद्र दाभोळकरांनी अक्षरशः त्यांना धरुन आणून  मंचावर उभे केले आणि भूमिका मांडण्याचा आग्रह केला. नाही नाही म्हणत दाभोळकरांच्या आग्रहापोटी ते फक्त पंधरा वीस मिनीटेच बोलले.  खेड्यापाड्यातल्या रानावनात राबणाऱ्या कष्टकरी स्त्रियांना या परिषदेच्या चर्चेत कुठेच स्पेस नसल्याची तक्रार त्यांनी मांडली. समोर या विषयातले अनेक दिग्गज असल्याची त्यांनी फिकीर   केली नाही आणि पुढच्या दोन दिवसात  सगळ्या परिषदेचा सूर पालटला. चर्चा आपल्या आस्थेच्या केंद्रावर आणण्याची धमक नेहमीच त्यांनी जवळ बाळगली. त्यासाठी कुणाची भीडभाड ठेवली नाही. परिणामांची तमा बाळगली नाही. परिणामी त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आजही  अनेक गैरसमज आहेत. अशा  गैरसमजांचा अनेकदा त्यांना तोटाही झाला असेल. पण त्याची त्यांनी कधी तमा केली नाही. बुद्धीला, मनाला न पटणाऱ्या कुठल्याच गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत.   जे पटेल, रुचेल त्याच्या आग्रहाखातर  जोखीम पत्करण्याची तयारी ठेवली. त्यांची सगळीच मतं कुणाला, अगदी मलाही  पटतीलच असे नाही. मात्र ती सर्वांनी मानलीच पाहिजेत असा आग्रह त्यांनी कधीच धरला नाही. मात्र प्रत्येक विषयाकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना  दिली.

शेती आणि गावगाडा हा त्यांच्या आस्थेचा परिघ. आपल्या या आस्थेच्या परिघात लेखक म्हणून ठामपणे पाय रोवून ते उभे आहेत.गावगाड्याच्या आणि शेतीच्या पडझडीच्या वर्तमानामागचा शोध त्यांनी आपल्या लेखनामध्ये घेतला आहे. गावगाड्याच्या नीटशा आकलनाअभावी  भल्याभल्या लेखकांनी गावगाड्याबद्ल अत्यंत चुकीचे निष्कर्ष नोंदवले आहेत. संवेदनशील  लेखक म्हणून गवस सर समूहभावाच्या मूल्यावर आपले आकलन नेहमी तपासत आले आहेत. ज्याकाळात खेड्यापाड्यातील माणूस हा शहरी आणि खेड्यातल्या लेखकांच्यासुद्धा हसण्या – हसवण्याचा विषय होता , त्या काळात या माणसांकडे,  त्यांच्या जगण्याकडे लेखक म्हणून ते अत्यंत गंभीरपणे पाहात आलेले दिसतात. ‘ चौंडक’ पासून ते ‘ ब बळीचा’ पर्यंत त्यांची ही दृष्टी अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. गावगाड्यातल्या पूर्वापार संचिताचे माहीत नसलेले नवे अर्थ त्यांनी सांगितले. परिणामी खेड्यापाड्याच्या रचनेकडे त्यातल्या सुसंवाद आणि  विसंवादांकडेही अत्यंत आस्थेवाईकपणे पाहणारे हाताच्या बोटावर मोजावेत असे त्यांच्या पिढीत जे मोजके लेखक दिसतात. त्यात त्यांचा नंबर खूप वरचा आहे. जसे लेखक   म्हणून तसेच संशोधक म्हणूनही त्यांनी भाऊ पाध्येंसारखा आव्हानात्मक लेखक निवडला. ‘रोकडे पाझर’ हा त्यांचा समीक्षाग्रंथ समीक्षेची  नवी दृष्टी सूचित करणारा आहे. त्यांचा एखादा प्रासंगिक लेखसुद्धा वाचणाऱ्याला कुठल्या नव्या प्रकाशाचं भान देणारा असतो.

गारगोटीच्या मौनी विद्यापीठातून ते थेट पूणे विद्यापीठात गेले. सिमेंट काँक्रीटच्या तिथल्या जंगलात त्यांचे मन फारसे रमले नाही. तिथून ते माघारी आले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात तुलनेने ते अधिक रमले. हा त्यांच्या माती आणि माणसांचा परिसर होता. विभागातल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी  इथे  अनेक नवे उपक्रम राबविले. चर्चासत्रे , परिषदांचे आयोजन करताना संधी न मिळालेल्या अनेक शिक्षकांना संधी देण्याचे धोरण त्यांनी अवलंबले.   

 कधी कधी त्यांच्या स्वभावाचा  कुणाला अंदाज बांधता येत नाही. कारण समोरच्याला कधी प्रेमाने तर कधी परखडपणे ते सुनावतील सांगता येत नाही. एखादी गोष्ट टाळायचीच असेल तर चक्क थाप मारुन ते वेळ मारुन नेतील. त्यांचा परखडपणा अनेकांना फटकळपणा वाटतो. मध्येच एकदम एखाद्याची ते खिल्ली उडवतील. पण त्या खिल्ली उडवण्यामध्ये कुचेष्टेचा सूर कधीच नसतो. असतो तो सुद्धा  समोरच्याबद्दलचा आस्थेवाईक दृष्टिकोन. अगदी कालच माझ्या एका मित्राचा फोन आला. म्हणाला , ‘ सर निवृत्त होताहेत. भेटलास का?’ या पार्श्वभूमीवर  मी जर का त्यांना भेटायला गेलो, तर ते म्हणतील, ‘मला रिटायर करायला आलास व्हय गा.लई श्याणा हायीस. चल च्या पिऊया’  आणि चक्क माझ्या अशा भेटण्याचीही ते गंमतीने खिल्ली उडवून खळखळून हसतील. त्यात टोकदारपणा नसतो.

 जुन्या काळात खेड्यापाड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत एक तरी गुरुजी असे असायचे की ते सर्व थरातल्या सर्व प्रकारच्या मुलांना सामावून घ्यायचे. त्या मुलांना जवळ घेऊन कधी प्रेमाने आंजारुन गोंजारून तर कधी गरजेनुरुप रागावून मुलांच्या क्षमतांप्रमाने त्यांना वाढू द्यायचे . त्यामुळे ते सर्व मुलांना  आवडायचे. ‘ गवस गुरुजी ‘ हे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या अस्सल देशी परंपरेशी नाळ टिकवून असलेले गुरुजी आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी असा शिक्षक अनेक प्रकारचे कष्ट उपसतो. त्याच वृत्तीने त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. नव्याने लिहिणाऱ्या अनेक लेखकांना हात दिला.  एखाद्या विद्यार्थ्याच्या नोकरीसाठीची धडपड असेल, एखाद्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचण असेल अथवा एखाद्याच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ असेल. संबधित प्रश्न जणू आपलाच आहे असं समजून  त्यात ते सारखाच रस घेतील. ज्या माणसाच्या हस्ते आपल्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे म्हणून लोक जीव टाकतात त्याच गुरुजींनी परवाच त्यांच्या एका विद्यार्थ्याच्या  पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात जणू संयोजकाच्या थाटात चक्क कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत.

अत्याळ( करंबळी) – गडहिंग्लज- गारगोटी व्हाया पूणे- कोल्हापूर असा झालेला त्यांचा प्रवास साठच्या दशकात शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या कोणासाठीही आव्हानात्मक होता. आव्हानांचा हा टप्पा पार करुन नियत वयोमानानुसार तांत्रिकदृष्ट्या आज ते सेवानिवृत्त होत आहेत. लौकिकदृष्ट्या आज ते सेवानिवृत्त झाले असले, तरी त्यांचा पिंड सेवानिवृत्तीचा नाही. त्यांच्यातल्या संवेदनशील लेखकाला आणि हाडाच्या शिक्षकाला आता खुले आकाश  मिळाले आहे. सतत आपल्या आस्थेचा परिघ विस्तारत आलेल्या या माणसाला  अनेक नवी क्षितिजं खुणावत आहेत. ती कवेत घेण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…

 – एकनाथ पाटील

   ९४२१२८५०८२

( पाटील सरांच्या फेसबुक वॉलवरुन साभार.)

******

  राजन गवस आणि डॉ.संजय बोरुडे,

    (स्थळ :गवस गुरुजींचे घर,गारगोटी )

*******************************

   ‘साहित्याक्षर’ तर्फे लवकरच प्रकाशित होत आहे.

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment