मनोहर सोनवणे नावाचा माणूस
१.
मनोहर सोनवणे नावाचा माणूस
१.
२००३ मध्ये ‘यूनिक फीचर्स’मधे जॉईन झालो होतो. तिथं एका टेबलवर इनशर्ट केलेली, चेहर्यावर कोडाचे पांढरे डाग असलेली, डोक्यावरचे केस बहुधा कोडानेच पांढरे झालेली एक व्यक्ती सतत खाली मान घालून sincerely काम करताना दिसायची… तसे असले तरी, ऑफिसमधे कुठे हास्यविनोद झाला तर त्यात भाग घेऊन मधेच एखादा विनोदी चुटका करुन हास्यविनोदात भर घालायची. अगदी ऑफिसबॉयवरही रागवताना मी त्या व्यक्तीला फारसं पहिलं नाही. त्या व्यक्तीशी हळूहळू मैत्री झाल्यानंतर आधीच्या साठे बिस्किट या कंपनीच्या नोकरीतील अनुभव वारंवार सांगायची- ती व्यक्ती म्हणजे मनोहर सोनवणे.
हळूहळू त्यांच्याशी माझी wavelength जुळली. तेव्हा यूनिक फीचर्स मधे इतर छोट्या मोट्या कामांसोबतच ‘मैत्रिण’, ‘भटकंती’ आणि ‘अनुभव’ या मासिकांची कामे चालत. त्यातील भटकंतीचे काम मनोहर सोनवणे, तर मैत्रिणचे काम हे मुकुंद ठोंबरे, शुभदा चंद्रचूड यांच्यासह पाहायचे. या दोन्ही अंकांचे फायनल काम एक- दोन दिवसांच्या फरकाने पूर्ण व्हायचे. तेव्हा रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्वजण थांबायचो. मात्र उशिरा थांबण्याबद्दल त्यांनी कधी फारशी कटकट केली नाही. कारण त्यांना काम बिनचूक व्हावे असे वाटायचे, आणि त्यांचे काम बिनचूक व्हायचेही…
अनुभव या मासिकाचे संपादक आणि यूनिक फीचर्सचे संचालक सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी सर हे तर मला म्हणायचे ‘सोनवनेंची खात्री झाली असेल तरच अंक प्रिंटला सोडा’. सोनावणे यांच्या संपादनाचा हात फिरला कि ओबडधोबड लेखाला छान आकार यायचा. सोनवणे अनुभव मासिकाचे कार्यकारी संपादक होते.
त्यांच्या संपादनाची खरी झलक अनुभवास आली ती ‘स्टोरी ऑफ द डेमॉक्रसी इन साऊथ एशिया’ या पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्ताने… ते पुस्तक युनिक फीचर्स च्याच समकालीन प्रकाशनाने ‘लोकशाही झिंदाबाद’ या नावाने प्रकाशित झाले. अतिशय अवघड असे अकॅडेमिक पुस्तक त्यांनी सर्वसामान्य वाचकाच्या वाचन क्षमतेच्या आवाक्यात आणले. तेव्हा सर्वजण त्यांच्यावर बेहद्द खुश झाले होते. मूळ पुस्तकाचे एक लेखक सुहास पळशीकरांनी फोन करून त्यांचे त्याबद्दल कौतुकही केले. असेच काम त्यांनी प्रकाशवाटा, महाराष्ट्र दर्शन, खरेखुरे आयडॉल, देवाच्या नावाने अशा अनेक पुस्तकांवर केले. इतकेच काय पण ‘यांनी घडवले सहस्रक’, आणि ‘असा घडला भारत’ यासारख्या पुस्तकांच्या अवाढव्य कामात सोनवणे यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. सुहास कुलकर्णी आणि त्यांची त्याबाबत छान wavelength जुळली होती.
कालांतराने मी युनिक फीचर्स मधून बाहेर पडलो. ‘आर्ट ऍडव्हर्टायझींग’ ही संस्था सुरु केली. त्यामार्फत स्वतःचे डिझायनिंगचे काम करत असताना एखादे नियतकालिक सुरु करावे असे मला आणि माझी पत्नी अमृता खेतमर हिला वाटू लागले. त्यादिशेने आम्ही पावलं उचलली. दरम्यान सोनावणे यांची भेट होऊन त्यांनीही त्या उपक्रमात सहभागी होण्यास सहमती दर्शवली. लवकरच ‘पुणे पोस्ट’ या नावाने आमचे साप्ताहिकाचे काम सुरु झाले. सोनवणे अंकाचे संपादक झाले.. आमच्या टीम वर्कमुळे अंक बहरला.. जवळपास दीड-दोन वर्षे हे काम चालले. नंतर माझ्या काही अडचणींमुळे मला साप्ताहिक स्वरूपात ते चालवणे अवघड होऊ लागले. त्यामुळे आम्ही ते पाक्षिक केले. त्यातही येनकेन प्रकारे विघ्न येत राहिली. मात्र गेली आठ वर्षे आम्ही दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केले. शिवाय साप्ताहिकाचे आणि पाक्षिकाचे जे काही अंक केले त्याला महाराष्ट्र भरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्थात, त्यात सोनावणे सरांचे योगदानही तितकेच महत्वाचे ठरते. या काळात आम्ही अनेक प्रकाशन संस्थांसाठीही कामे केली. नंतर सोनवणे यांना विश्वकर्मा पुब्लिकेशन कडून संपादक पदाची ऑफर आली. तिथेही त्यांनी समरसून काम करत तिथल्या मराठी विभागाला छान आकार दिला. दोन वर्षांपूर्वी सौम्य हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते घरून काम करीत आहेत.
सोनवणे सर यांचा कवी-लेखक म्हणून विचार करायचा झाला, तर त्यासाठी आधी त्यांचा ‘सदरा बदललेली माणसं’ हा ललित संग्रह (अनुभव मासिकात प्रकाशित झालेले ललित लेख) वाचावा. शिवाय त्याच पुस्तकातील वसंत अबाजी डहाके यांची प्रस्तावना आवर्जून वाचावी. ती प्रस्तावना सोनावणे यांच्यातील साहित्यिक मूल्यांबद्दल खूप काही सांगून जाते. या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही लाभला. त्यांचा पहिला कविता संग्रह ‘एक शहर सूनसान’ हाही तितकाच महत्वाचा… पण काहीसा दुर्लक्षित. ज्यांना सकस कविता ऐकायची असेल त्यांनी सोनवणे यांचीही कविता एकदा आवर्जून ऐकावी-वाचावी. मनोहर सोनवणे हे कवी वर्तुळात सर्व महत्वाच्या कवींशी चांगले संबंध ठेवून आहेत. मुळात फारसे न बोलणारे, स्वस्तुतीपासून दूर राहण्याचा स्वभाव असलेले सोनवणे साहित्यिक म्हणून दुर्लक्षित राहिल्याचे दुःख आधी वाटायचे.. मात्र अलीकडे त्यांनी ‘पुणे पोस्ट’सह अन्य महत्वाच्या दिवाळी अंकात काळाचे वेगवेगळे टप्पे वेगवेगळ्या लेखातून खुमासदार शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न सर्वांना खूप भावला. पुढे त्याचे पुस्तक करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर जालियनवाला बाग हत्याकांडावरील पुस्तकाचे कामही बऱ्यापैकी उरकत आणले आहे. समकालीन प्रकाशनाच्या शशी थरूर यांच्या नेहरूंवरील ‘शोध नेहरूंचा आणि भारताचाही’ या पुस्तकाचा त्यांनी केलेला अनुवादही छान जमला आहे. एकंदर येत्या काळात येणारी त्यांची पुस्तके साहित्य वर्तुळात त्यांची दुर्लक्षित राहिलेली प्रतिमा स्थिर करतील यात शंका वाटत नाही.
सोनवणे यांचा आणखी एक गुण म्हणजे ते आमच्यासारख्या तरुणांसोबत मिळून मिसळून छान काम करतात. आमच्या उत्साहाला त्यांच्या अनुभवसंपन्न सल्ल्याने काही प्रमाणात योग्य दिशा देण्याचे काम करतात.
त्यांच्या कामाची यादी खूप मोठी होईल परंतु मला जशी आठवली तशी मी इथे सांगितली. त्यांचे साहित्यिक क्षेत्रासाठीचे योगदान मोठे आहे. त्याची दखल घेणे आता आवश्यक आहे.
त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! आणि त्यांच्या सर्व संकल्पित उपक्रमांना सदिच्छा
– प्रदीप खेतमर
२.
*आता घोड्यांच्या टापांना आवाज आहे*
*दिशा नाही*
*तुझी खोल आतून उमटणारी* *आर्त साद आहे*
*प्रतिसाद नाही*
80 च्या दशकात कुठल्यातरी कविसंमेलनात ही कविता ऐकली आणि स्तब्धच झाले . कवीचं नाव होतं *श्री मनोहर सोनवणे* .
” आम्ही तापतो तेव्हा पेटून उठतो
आणि थंड होताच गोठून जातो .. ”
अशा ज्वलंत तरीही आतल्या आवाजातील ओळी लिहिण्यासाठी तुमच्या आत समाजमनाविषयीचे खोल आकलन आणि समज हवी ,समाजाविषयी खोल आस्था हवी . ही समज सोनवणे यांच्या प्रत्येक कवितेत नंतर जाणवत गेली . प्रथमदर्शनीच एक कवी म्हणून त्यांच्याविषयी आदर आणि मित्रत्वाचं नातं निर्माण झालं .
मनोहर सोनवणे यांचा आज एकसष्टावा वाढदिवस . या निमित्ताने 80 – 90 पासून आम्हा पुण्यातल्या कवींचा झालेला साहित्य क्षेत्रातला सहप्रवास डोळ्यांसमोरून सरकत गेला .
सोनवणे एक चांगले कवी , उत्तम कथाकार , आणि एक बेहतरीन संपादक आहेत . ‘ एक शहर सुनसान ‘ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे .’ सदरा बदललेली माणसं ‘ सारखं ललितलेखन त्यांच्या नावावर आहे . जालियनवाला बाग हत्याकांडाविषयीचा त्यांनी अभ्यासलेला काही दुर्मीळ इतिहास आणि 70 – 80 च्या दशकापासून देशात , महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींमुळे बदलत गेलेला भोवताल , बदलत गेलेलं सामान्य माणसांचं जगणं याविषयीचं त्यांचं भाष्यात्मक ललित तसंच त्यांच्या कथा पुस्तकरूपाने येण्याची वाट बघतायत .
कथा , कविता , ललित असो वा संपादन … खोल वैचारिक बैठक आणि अभिव्यक्तीचा समकालीन ,प्रगल्भ अंदाज हे त्यांच्या सर्वच लेखनाचं वैशिष्ट्य असतं . संपादनासाठी त्यांच्या हाती आलेल्या पुस्तकाचं ते सोनं करतात .
बरचसं अंतर्मुख आणि काहीसं संकोची व्यक्तित्व असलेल्या या आपल्या सर्वांच्या कविमित्राला एकसष्टीनिमित्त खूप खूप शुभेच्छा .
– अंजली कुलकर्णी
24 नोव्हेंबर 2020