2020 नोव्हेंबर

द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ : अतुल ठाकूर

सा हि त्या क्ष र 

द बॅड म्हणुन काम केलेला “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंजल आय ली व्हान क्लीफ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान. त्यातुन सर्जीयो लिऑनसारखा क्लोजअपवेडा दिगदर्शक मिळाल्यास पाहायलाच नको. सर्जियोने या नजरेचा वापर करुन पडद्यावर अनेकदा जाळ पेटवला आहे. उंचीपुरी देहयष्टी, त्याला सजेसा वेस्टर्नपटातील तो पोशाख. ओठात पाईप पकडुन व्हानक्लीफ पडद्यावर आला की बाकीचे सारे काहीवेळ धुसर वाटु लागतात. त्याचं आगमनच स्क्रीन व्यापुन टाकणारं असतं. हे जणुकाही कमीच म्हणुन की काय त्याचा तो बसकट, काहीसा खर्जातला धडकी बसवणारा आवाज. तो बोलु लागल्यावर तो आवाज आणि ती नजर प्रेक्षकांना खिळवुन टाकते. एकुणच व्यक्तीमत्वाचा प्रभाव जबरदस्त. सर्जिओ लिऑनने “फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर” मध्ये देखिल व्हान क्लीफ च्या या नजरेचा अत्यंत परिणामकारक वापर केला आहेच. मात्र त्याबद्दल स्वतंत्र लिहावे लागेल. कारण ती भुमिका सकारात्मक आहे. “द बॅड” व्हान क्लीफ हा फार वेगळ्या तर्‍हेचा व्हिलन आहे.

व्हान क्लीफच्या “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंट्रीला इनिओ मोरीकोनने असं काही पार्श्वसंगीत वापरलं आहे कि या माणसाच्या येण्याने भयंकर वादळ येणार आहे याची प्रेक्षकाला चाहुल लागावी. त्यानंतरचे दृश्य हे चवीचवीने पाहण्याजोगे. सर्जियोचे टाईट क्लोज अप्स आणि वेस्टर्नपटातील ते रापलेले चेहरे. व्हान क्लीफ घोड्यावरुन उतरतो आणि कॅमेरा त्याच्या चेहर्‍यावर स्थिर होतो. त्यावेळी दिलेलं पार्श्वसंगीत भयंकराच्या आगमनाची वर्दी देणारे आहे. व्हान क्लीफची दारात उभे राहण्याची पद्धत आणि त्यानंतर त्याचे ठामपणाने पावले टाकत येणे फक्त एकच सुचवते की हा माणुस काहितरी ठरवुन आला आहे. घरमालक आपल्या लहान मुलाला जेवणाच्या ताटावरुन उठवतो आणि बायकोला देखिल नजरेनेच आत जायला सांगतो. दुबळ्या प्राण्याला आपला मृत्यु समोर दिसावा त्याप्रमाणे त्याच्या हालचाली सुरु असतात. बराचवेळ कुणीचे काही बोलत नाही. व्हान क्लीफ समोरच्यावर आपली धारदार नजर रोखुन टेबलावरील अन्नाचा समाचार घेऊ लागतो. आणि मग समोरच्याला व्हानक्लीफची ती नजर जणु असह्य होते आणि तो बोलु लागतो. व्हानक्लीफ त्याला मांजराने उंदराला मारण्याआधी खेळवावं तसा खेळवतो. हवी ती माहीती मिळाल्यावर ठार मारतो. त्याच्या मुलालाही सोडत नाही. आणि ज्याच्याकडुन पैसे घेतले त्यालाही ठार मारुन दडवलेल्या संपत्तीच्या मागावर स्वतःच बाहेर पडतो. या दृश्याचं जास्त वर्णन करीत नाही कारण ते प्रत्यक्ष पाहायलाच हवं. व्हान क्लीफचा आवाज, त्याची बोचरी शोधक आणि भेदक नजर, त्याने विद्युतवेगाने केलेल्या हालचाली आणि त्याला साथ आहे तितक्याच तोलाच्या पाश्वसंगीताची. सर्जिओ लिऑनच्या समोर व्हान क्लीफसारखा माणुस आल्यावर काय चमत्कार घडु शकेल याचे प्रात्यक्षिकच या दृश्यात दिसुन येते.

पुढे चित्रपट एखाद्या महाकाव्याचे सर्ग वाचल्याप्रमाणे पुढे सरकतो. सर्जिओच्या वेस्टर्नपटात डोंगर दर्‍या, खुरटी झुडपं, पॅनोरमिक ऐसपैस पसरलेली मैदाने, त्यातुन दौडत असलेले घोडे, त्यावरील रापलेल्या चेहर्‍यांची, फट म्हणता पिस्तुले काढणारी माणसे यांची रेलचेल असते. वेस्टर्न पटाच्या कठोर पार्श्वभुमीवर खलनायकदेखिल तसाच असायला हवा होता आणि व्हान क्लिफने ती जागा घेऊन “एंजल आय” ला अमर करुन टाकले. दडवलेल्या संपत्तीच्या शोधात तो सावजाच्या मागावर निघावं त्याप्रमाणे निघतो. आपल्या सैन्यातील पदाचा दुरुपयोग करायलाही हा मागेपुढे पाहात नाही. अतिशय थंड, हिशेबी आणि आपल्या हेतुबाबत पूर्णपणे नि:शंक असलेला हा एंजल आय खरं म्हणजे प्रेक्षकांना मनातुन आवडुन जातो. त्यानंतरचा अतिशय मह्त्वाचा सीन म्हणजे टुको कढुन माहिती काढणे. इलिया वलाचने टुको, द अग्लीची भुमिका झकासच वठवली आहे. प्रेक्षकांना अतिशय आवडलेली, विनोदाची झाक असलेली ही भुमिका. अशा या टुकोच्या चलाखिला व्हान क्लिफ फसत नाही. त्याच्या कडुन माहिती मिळण्यासाठी ज्या तर्‍हेच्या क्रौर्याची वापर व्हान क्लिफ थंडपणे करतो ते पाहुन अंगावर शहारे येतात. हे एकुणच दृश्य अतिशय हिंसक आहे.

शेवटचा सीन तर चित्रपटाचा कळसच आहे. मात्र त्यातदेखिल बाजी मारुन जाते ती व्हान क्लिफची नजर. क्लिंट इस्टवूड शेवटपर्यंत ज्या थडग्यात संपत्ते दडवलेली आहे त्या थडग्यावरचे नाव उघड करत नाही. बंदुकीच्या जोरावर संपत्ती मिळणार नाही त्यासाठी तिघांना एकमेकांशी लढावे लागेल हे तो दोघांनाही शांतपणे सांगतो. त्यानंतर सुरु होतो तो जिवन मरणाचा लढा. यावेळी मोरीकोनीचे संगीत तीव्र होत जातं आणि व्हान क्लिफची नजरदेखिल. पुढे काय घडतं हे सर्वांना माहितच आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी ते आवर्जुन पाहावं असं आहे. क्लिंट इस्टवूडचा “द गुड” ब्लाँडी, इलिया वलाचचा “द अग्ली” या भावखावु भुमिका आहेत. प्रेक्षक त्या मनापासुन एंजॉय करतातच पण व्हान क्लिफ फ्रेममध्ये आल्याबरोबर प्रेक्षक सावरुन बसतात. कारण हे काम सिरियस आहे, आता काहीतरी घडणार आहे असेच वातावरण तयार होते. व्हानक्लीफचा एंजल आय हा चित्रपटाच्या इतिहासातील वेगळा खलनायक गणला जायला हवा. अत्यंत हिशेबी, थंड डोक्याचा, सावजाच्या मागावर चिकाटीने असलेला, काम साधण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा असा हा खलनायक आहे. हे करताना एक “नो नॉनसेन्स” तर्‍हेचा वाईट माणुस स्क्रीनवर उभा राहतो. आणि विद्युतवेगाने पिस्तुल काढुन अचुक नेम साधण्याची क्षमता असलेल्या या माणसाशी मुकाबला करण्यासाठी त्याच्यासारख्याच नेमबाज अशा दोघांना एकत्र यावं लागतं यातच त्या भुमिकेची ताकद दिसुन येते.

पुढे व्हान क्लिफचे अनेक चित्रपट पाहिले. काही आवडले. मात्र नकारात्मक भुमिकेत मला अतिशय आवडलेला असा हा एकमेव “एंजल आय”च. मला आजही असं वाटतं की व्हान क्लीफच्या प्रतिभेला योग्य न्याय देणार्‍या भूमिका त्याच्या वाट्याला फार कमी आल्या. विधात्याने हॉलिवूडसाठी ली व्हान क्लीफ हे रसायन एकदाच तयार केलं. तसा अभिनेता पुन्हा होणे नाही.

– अतुल ठाकुर

अतुल ठाकूर यांनी हा लेख इथे पोस्ट करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.. संपादक : साहित्याक्षर

ली व्हान क्लिफची वैयक्तिक माहिती पुढील लिंकवर :

https://en.m.wikipedia.org/wiki/Lee_Van_Cleef

you tube link for the movie :

The Good , The bad & The Ugly is

https://youtu.be/U6txc_4S-aI

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment