आदिमाया” विषयी…: नाना किरतकर,अकोला
विदर्भातील प्रख्यात लेखक मा. अशोक राणा यांचा ‘आदिमाया’ हा ग्रंथ वाचण्यात आला. सदर ग्रंथामध्ये लेखकांनी ज्या ज्या संस्कृतीमध्ये मातृदेवता आढळतात त्या त्या संस्कृतीचा परामर्श घेतला. हा ग्रंथ म्हणजे लेखकाचे मातृसत्ताक संस्कृतीवरील संशोधन आहे. ह्या संशोधनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ वाचलेत असे दिसून येते. लेखक लिहितात की, प्राचीन भारतात आणि जगातील काही देशांत उदा: बॉबिलोनिया, असिरिया ,इजिप्त, मेसोपोटेमिया इत्यादी देशांत मातृसत्ताक समाज रचना अस्तित्वात होती. सिंधू संकृतीचा शोध लागण्यापूर्वी असे गृहित धरले जात होते की, मातृसत्ताक पद्धती ही मेसोपोटेमियामधून आली. मेसोपोटेमियन संस्कृती ही ई.स.पूर्व १५ हजार वर्षापूर्वीची मानली जाते. सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यावर असे निदर्शनास आले की मातृसत्ताक पद्धतीचे मूळ भारतातच होते. भारतीय संस्कृती ही मेसोपोटेमियन संस्कृती पेक्षा प्राचीन मानली जाते. अर्थात ह्या संस्कृतीचा काळ मेसोपोटेमियन संस्कृतीच्या आधीचा काळ आहे. वेद डोळ्यानेही न पाहणाऱ्या व वेदाची केवळ महती ऐकून वेद संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या अज्ञानी लोकांना लेखक संदेश देऊ इच्छितात की सिंधू संस्कृतीच्या शोधामुळे सत्य उघडकीस आलं व ते म्हणजे वेदांच्या निर्मितीपूर्वी भारतात एक समृद्ध आणि सर्वांगीण विकसित नागरी संस्कृती नांदत होती. त्या संस्कृतीची वैदिक संस्कृतीशी तुलना केल्यास वैदिकांची संस्कृती ही रानटी व अप्रगत होती असे निदर्शनास येते. सिंधू संस्कृती ही मातृसंस्कृती म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतीय स्त्री,अर्थात सिंधू संस्कृतीतील स्त्री सन्माननीय मानली जात होती.ती कुटुंब प्रमुख होती. कुटुंबात बाल्यावस्थेत मुलामुलींच्या पोषणाची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली. त्यामुळे तिला देवतेचा दर्जा प्राप्त झाला असावा. श्रमण संस्कृतीच्या संस्काराचा हा प्रभाव होता असे म्हणावयास हरकत नाही.
जगातील इतर देशातील मातृसत्ताक संस्कृतीच्या पाऊलखुणा काळाच्या ओघात मिटल्या गेल्या. परंतु सुदैवाने भारतात त्या खुणा धूसर स्वरुपात आजही अस्तित्वात दिसून येतात, ज्या द्वारे अभ्यासकांना त्या संस्कृतीची ओळख स्पष्ट करता येते. अशाच धूसर पाऊलखुणांच्या आधारे मा. राणा सरांनी या ग्रंथात त्या संस्कृतीचा अभ्यास मांडला.
मातृसत्ताक संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतात आर्यांचे आगमन होय. लेखकाचे हे मत रास्त आहे. आर्य भारतात आल्यावर त्यांनी वेळोवेळी कपट करून येथील सभ्य असलेली श्रमण संस्कृती बुडवून रानटी व अप्रगत वैदिक संस्कृती लादली. त्या साठी त्यांनी साम,दाम,दंड,भेद इत्यादी नीतीचा उपयोग केला. आर्य भारतात आले तेंव्हा त्यांनी सोबत त्यांच्या स्त्रिया आणल्या नव्हत्या. त्यांनी भारतीय स्त्रियांशीच संसार थाटला. भारतातील जनतेला आपल्या प्रभावाखाली आणणे हा त्यांचा हेतू होता. भारतात सर्वोच्च पदावर स्त्रिया होत्या तेंव्हा भारतीय जनतेला गुलाम बनवायचे असेल तर प्रथम स्त्रियांना गुलाम बनविले पाहिजे हे त्यांनी हेरले. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले.
लेखक लिहतात की वेगवेगळ्या काळात निऋती, लक्ष्मी, सिरिता, गजलक्ष्मी, मायादेवी, सटवी, सिंधूमातृका, साती,आसरा,अमावस्या,जिवती,हारिती, कद्रू, दिती, दनू, अदिती, सीता, माया, मनसा, पुतना, होलिका,हिडिंबा, महाविद्या,सरस्वती,कामाख्या इत्यादी स्त्रियांना भारतीय संस्कृतीत पूजनीय मानले जात असे. आजही यातील अनेक देवींना वेगवेगळ्या भागात पूजिले जाते. स्त्रियांचा हा दर्जा कायम राहिल्यास भारतीय जनतेवर गुलामी लादणे सोपे जाणार नाही म्हणून त्यांनी गौरवशाली स्त्रियांचा इतिहास विकृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सत्य लपविणाऱ्या पुराणकारांनी, इतिहासकारांनी संदर्भ बदलून टाकले. वरील सर्व पूजनीय स्त्रियांच्या जीवन चारित्र्यात गोंधळ निर्माण होईल असे कपोल कल्पित साहित्य निर्माण केले. मा. राणा सर लिहितात की, एखाद्या व्यक्तीची बदनामी करायची असल्यास त्या विषयी खोट्यानाट्या कथा रचणे तसेच अफवा पसरविणे हे नेहमीच घडत असते. भारतीय पुराणं हे अशा खोट्यानाट्या व अफवा असलेल्या साहित्याचं प्रतिष्ठित रूप आहे. लेखक,पोथ्या पुराणांच असं असली रूप समोर आणतात त्याच बरोबर असाही इशारा देतात की, कल्पित कथांचा ढिगारा उपसून बरेचदा त्यामध्ये वास्तवाचे कण सापडण्याची शक्यता असते म्हणून त्यांना एकदम टाकाऊ समजणे चुकीचे आहे. अशा प्रकारचं स्पष्ट मत व्यक्त करणारे लेखक क्वचितच आहेत. स्वत:ला आर्य मानून आर्य संस्कृतीचा अभिमान बाळगणारे व त्यासाठी एकांगी इतिहास लिहिणारे शेकडो इतिहास संशोधक व संस्कृती अभ्यासक प्रस्थापित झाले आहेत, अशी खंत लेखक व्यक्त करतात.सत्य आणि केवळ सत्य मांडणारे साहित्यिक जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले. हा भारतीय साहित्य क्षेत्रातील कलंक आहे. परंतु असत्य मांडणाऱ्या तथाकथित प्रस्थापित साहित्यिकां पेक्षा सत्य मांडणारे दुर्लक्षित साहित्यिक बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठच मानले जातील हे ही तितकेच सत्य आहे.
भारतीय महानायिका ठरलेल्या स्त्रियांविषयी आर्य ग्रंथातून नकारात्मक भूमिका मांडण्यात आल्या. पोथ्या पुराणात लिहिलेल्या गोष्टींचा संदर्भ देवून तथाकथित विद्वान, कीर्तनकार, प्रवचनकार, ह.भ.प.त्याचा प्रसार प्रचार करीत असतात. कीर्तनकार, प्रवचनकार, ह.भ.प. वर भारतीय भक्तांचा भरवसा आहे. त्यामुळे सामान्य व्यक्ती इतिहासाच्या खोलात न शिरता,सत्य असत्याची पडताळणी न करता त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत असतो. खऱ्या भारतीय महानायिकांचे विकृतीकरण कशा प्रकारे केले हे पुराव्यासह उदाहरणे देऊन लेखक स्पष्ट करतात. उदा: ‘अमावस्या’ ह्या महानायिकेबद्दल तिरस्कार पसरविण्यासाठी चंद्राचा सहारा घेवून अमावस्येचा दिवस वाईट असतो असे समाजमनावर बिंबविले. अमावस्येचा दिवस वाईट जरी बिंबविला असला तरी समाज मनावरील अमावस्येबद्दलच्या पाऊल खुणा अजूनही कायम आहेत, ह्याचा पुरावा देतांना लेखक लिहितात की दिवाळी,पितृमोक्ष अमावस्या.सोमवती अमावस्या,आषाढ महिन्यातील दिव्यांची अमावस्या,इत्यादी अमावस्येचा दिवसांना शुभ मानले जाते.
भारतीय मातृसत्ताक श्रेष्ठ संस्कृती असतांना त्या संस्कृतीची पीछेहाट का व्हावी याचा उलगडा करताना लेखक लिहितात की, राज सत्तेच्या प्रभावावर मात करण्याच्या प्रयत्नात अनेक संप्रदाय किंवा धर्म नष्ट होऊन जात असतात किंवा क्षीण स्वरुपात शिल्लक राहतात. त्यामुळे संस्कृती संक्रमणाची प्रक्रिया सुरू राहते. त्याचं यशापयश दैवतांच्या बदलत्या स्वरूपावरून लक्षात येत असते. संस्कृती संक्रमणाचे लेखकांनी दिलेले कारण यथोचित आहे. पराभूत संस्कृतीतील महानायकांना खलनायक ठरवून जेत्यांकडून त्यांना बाजूला करण्यात येत असते. यासाठी त्यांनी गेल्या पांच हजार वर्षापासून सुरु असलेल्या ऐतिहासिक सत्याकडे वाचकाचे लक्ष वळविले आहे. भारतात नायिका ठरलेल्या स्त्रियांना दुय्यम स्थान देवून विषमता निर्माण करणारी अस्पृश्यता आर्यांच्या यज्ञ प्रधान संस्कृतीने भारतात आणली असे सडेतोड कारण देवून त्यांनी सत्य निर्भीडपणे उघडकीस आणले. गेल्या ५००० वर्षात भारतीय श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राम्हण संस्कृती चढ – उताराचा परिणाम भारतातील, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परिस्थितीत होत आला आहे.
आज पुरुष प्रधान संस्कृती स्वीकारली गेली आहे. मातृसत्ताक संस्कृती इतिहास जमा केली गेली. आजची स्त्री मग ती कोणत्याही जाती धर्माची असो ,तिला शूद्र घोषित केले. केवळ शूद्रच नाही तर अस्पृश्य सुद्धा ठरविले. एके काळी जिची देवता म्हणून पूजा व्हायची तिला आता काही देवांच्या मंदिरात सुद्धा प्रवेश नाकारला जातो. ढोल,गंवार,शुद्र,पशु,नारी सब है ताडन के अधिकारी. रामचरितमानसमधील ह्या चौपाईने स्त्रियांना पशूंच्या रांगेत बसविले. ढोल ज्या प्रमाणे बडवितात त्या प्रमाणे स्त्रियांना बडविलं पाहिजे असा वैदिकांचा धर्म सांगतो. स्त्रीला चित्रात सुद्धा पाहू नये, इतका तिच्या विषयी तिरस्कार पसरविला. स्त्री विषयी असा द्वेष, तिरस्कार, भेदभाव ही सारी धर्माज्ञा मानली गेली. ‘आदिमाया’ या ग्रंथातून स्त्रियांचा प्राचीन काळाचा दर्जा व आजची त्यांची झालेली दैन्यावस्था याची कारणमीमांसा लेखकांनी पुराव्यानिशी केली आहे. प्रत्येक स्त्रीने हा ग्रंथ वाचावा व आपली प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यासाठी वैदिकांची धार्मिक गुलामी झुगारावी असे लेखकाला अपेक्षित आहे .
प्राजक्त प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेंला २०० पृष्ठांचा हा ग्रंथ प्राचीन स्त्री गौरवाचा इतिहास उघड करतो तसेच त्यांचा ऱ्हास व त्याची कारणे सुद्धा स्पष्ट करतो. भारतीय स्त्रियांनी पोथ्या पुराणात, व्रत वैकल्यात गुंतून पडण्याऐवजी आपला गौरवशाली इतिहास जरूर वाचावा असे विजया दशमीच्या शुभेच्छासह आवाहन करतो.
नाना किरतकर