History चांदबीबी जून

एका रात्रीचे जागरण

सा हि त्या क्ष र 

( अहमदनगरच्या कर्तबगार चांदबीबी सुलताना वर मिडोज टेलर यांनी लिहिलेल्या The Noble Queen या कादंबरीचा अनुवाद कामरगावचे इतिहास संशोधक सतीश सोनवणे करत आहेत. त्यातील हे दुसरे प्रकरण.)

ती उकाड्याची रात्र होती, जल प्रपाताचा अखंड येणारा आवाज आता अधिक गर्जना करत कानावर येत होता. रात्रीच्या हवेने तो आवाज शांत झाला होता. अफूच्या प्रभावा मुळे त्या तरुणाला झोप आल्या सारखी वाटत होती. परंतु ताप पुन्हा चढू लागला होता . गुंगलेल्या नजरेने त्याने स्वतः भोवती पाहिलं. त्याला कोणीच ओळखू येत नव्हतं. तो हळू आवाजात काहीतरी पुटपुटला. त्याच्या जवळ असणाऱ्यांनी  ते ओळखलं तो लढाईचा त्वेषपूर्ण आक्रोश होता. वृद्ध दरवेश वारंवार त्याची नाडी आणि ताप तपासत होता. बरं होण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. दरवेश चिंतातुरपणे खाली बसला आणि त्याच्या मुलीला म्हणाला. ” याला उन लागलंय आणि तलवार सुद्धा , हे त्याला कठीण जाउ शकतं परंतु तो मजबूत आहे. अरेरे, त्याने मरावं का? नक्कीच नाही, अल्लाहच्या इच्छे शिवाय नाही. कदाचित मी त्याला पाहू शकलो असतो. या करीम! त्याच्या वर लक्ष ठेव झोरा आणि मला सांग तो कसा आहे. त्याला बरं वाटत नसेल तर थंड पेय दे आणि त्याच्या कपाळा वरचं कापड सुकू देऊ नको. सकाळपर्यंत त्याला शांत झोपू दे. मी त्याच्या साठी प्रार्थना करतो. त्याचं नशीब चांगलं असेल तर तो नक्की वाचेल.” असं म्हणून तो बाजूला झाला. प्रार्थना करत गुढघ्यावर वर बसला. त्याच्या हातामधून मागे जाणारे मणी झोराने पाहिले.

     ती मुलगी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कुतूहलाने पाहत होती. कधी वेदनेने व्याकूळ झालेले तर कधी आवेशपूर्ण युद्ध गर्जना करणारे त्याचे हावभाव. मध्येच थोडेसे उठून त्याने हातात तलवार असल्या प्रमाणे हात फिरवला. त्या मुलीने हात हळूच खाली ठेवला आणि त्याला लहान मला प्रमाणे थोपटले. कधी त्याचे ओठ कोरडे पडल्यासारखे, जीभ जड पडल्या सारखी वाटे आणि तो हलक्या चिडक्य स्वरात पाणी मागे. मग त्याला थंड पेय देण्यात येई जे त्याला शांत करी. झोरा एक अनुभवी परिचारिका होती. तिच्या आजोबांच्या घरी आणलेल्या आजारी आणि जखमी लोकांची ती शुश्रुषा करत असे. तिच्या वयाच्या इतर मुली प्रमाणे तिला पुरुषांची आणि एकांताची भीती वाटत नसे. तिचे आजोबा जेव्हा बाहेरगावी जात तेव्हा त्यांना मदत करणे आणि आजोबांकडे सल्ला घेण्यासाठी आलेल्या लोकांची काळजी घेणे हे तिचं काम. प्रकाश जाणीवपूर्वक मंद करण्यात आला तरी तिचे स्वरूप स्पष्ट दिसत होते . आम्ही तिचे वर्णन करण्याचा प्रयत्न करू शकतो.

     झोरा वरवर पाहता सुमारे चौदा वर्षांची  किंवा त्यापेक्षा जास्त वयाची होती. तिच्या वयाच्या मानाने ती उंच होती . तिचा बांधा चपळ आणि लवचिक होता.  देशातील इतर मुसलमान स्त्रियांपेक्षा ती गोरी होती परंतु चमकदार, नितळ , निरोगी आणि सशक्त स्त्रियांपेक्षा जास्त गोरी नव्हती. डौलदार मानेवर बसवलेलं तिचं डोकं छोटं आणि योग्य आकाराच होतं. तिचे ते चमकदार काळेभोर केस, तीच्या गळ्याभोवती गुंडाळलेल्या स्कार्फ च्या खाली डोकावणारे ,  तिच्या मानेवर आणि खांद्यावर प्रेमळपणे रुळत होते. तिचं कपाळ मऊ, चमकदार आणि रुंद होतं, कमानदार भुवया ,  सर्वांना आकर्षित करणारे तिचे डोळे पाहता क्षणी घायाळ करणारे. तिचे ओठ तिच्या मनातल्या भावना व्यक्त करणारे होते. आता ते हळुवारपणे उघडले होते, तुम्हाला दिसेल ती  मोठी मऊ मखमली काळी बाहुली जणू निळ्याभोर मैदानावर तरंगत असल्या सारखी. ते बंद होतानाचा तो आनंदी दृष्टीक्षेप. ते राग आणि फुशारकी व्यक्तच करू शकत नव्हते आणि ते खरही होत कारण तिच्या आयुष्यात थोडसुद्धा दुःखद किंवा खळबळजनक असं काही घडलं नव्हतं. तिचा स्वभावच मुळी हळवा आणि नम्र होता.

     तिचं वय जसं वाढत जाईल तशी तिची छबी अधिक मोहक होणार हे नक्की होतं. अजून तिच्या आकाराची नाही परंतु तिच्या चपळतेची आणि सुडौलपणाची कल्पना माञ तिच्या प्रत्येक हालचालीतून येत होती. जसा तिने तिचा हात जखमी पिडितावर उपचार करण्यासाठी पुढे केला तिचे गोलाकार बाहू, छोटे हात आणि बारीक बोटांनी भविष्यातील सौंदर्याची झलक दाखवली. जसे तिने आपले आलिशान दाट केस मागे सारले तसे तिच्या मानेने  लहरी हालचाल व्यक्त केली. कोणी त्या मुलीला सुंदर  किंवा तिच्या वैशिष्ट्यांना सामान्य म्हणू शकलं नसतं. ते तसे मोहक नसते तर .परंतु एकत्रितपण  तिच्या तोंडाने आणि मोत्यासारख्या दातांनी एक सुंदर, विनोदी आकर्षक चेहरा तयार केला होता.ती अगदी साधी होती. खडबडीत, पांघरूण म्हणू नका; पण साधा मलमलचा स्कार्फ, जो तिच्या शरीरावर आणि डोक्याभोवती  गुंडाळलेला तिच्या उजव्या हातावर पडला होता .जो तिने विलक्षण नजाकतीने परिधान केला होता.  पेटीकोट तिच्या वयापेक्षा अधिकचा आणि मोठा वाटत होता.

     ती तिच्या आजोबांच्या घरची मालकीण होती. सगळे म्हणायचे लहान मुलांचे कपडे घालायला ती काही लहान नाही मग तिने ते वापरणे सोडून दिले. तिने गळ्यात चांदीची साखळी घातली होती तशाच बांगड्या आणि पैंजण सुद्धा छातीवर काही सोन्याचे दागिने आणि उंची कपडे. या आणि तिच्या पूर्वायुष्याबद्दल तिचा आजोबा शांत होता. एक. दिवस तो तिला सगळं सांगणार होता ती एक दुःखद कहाणी होती. त्याच्या बद्दल तिला शेजाऱ्याकडून मिळालेली माहिती अशी होती की तो एक दरवेश असूनही राजबंदी होता. तो किल्ल्यात कधी आला हे लोक  फार पूर्वीच विसरून गेले होते.

     ती लहान असतानाच तिची आई मरण पावली, तरीही झोराचं तरुणपण आनंदात चाललं होतं. म्हातार्‍याने तिला फारसीची मूलतत्वे आणि शब्दांचे अर्थ, सुरुवातीला पोपटपंची पद्धतीने शिकवले होते, पण हळूहळू, आणि गावातील एका लेखनिकाच्या मदतीने, तिने सहज आणि समाधानकारक प्रगती केली.  तिचे आजोबा तिच्याशी त्याच भाषेत बोलत. आता तिला चांगलं लिहिता येऊ लागलं होतं. तिला जे लिहायला सांगितल जाई ते लिहून ठेवत असे. लहानपणी तिला फारच कमी सवंगडी होते. ती जसजशी मोठी होत होती तसे आजोबा तिला किल्ल्या खालच्या गावातील फालतू गप्पा टप्पा बद्दल कान उघडणी करत असत. जेव्हा ती त्याला बाहेर घेऊन जात असे तेव्हा ही कोणी तिला काही बोलत नसे. तिला एकच मदतनीस होती, एक वृद्ध स्त्री मामुला नावाची, ती झाडलोट आणि स्वयंपाक करत असे. हे काम सोडून झोरा तिला सगळ्या कामात मदत करत असे , न कंटाळता. नाजूक गरम केक, शेवई ज्यामधे तो म्हातारा आनंदून जाई कोण बनवत असे? जुन्या धाटणीचे ढगळ कपडे कोण शिवत असे?  तिने टोप्या बनवणे शिकून घेतले होते त्यावर सोन्या चांदीचे जरिकाम करत असे. या टोप्या आठवडी बाजारात विकल्या जात ज्या त्यांच्या उदर निर्वाहला हातभार लावत. तिचे दोऱ्यांचे नाजूक विणकाम ज्याला बाजारात चांगली मागणी होती. अशा प्रकारे ती नेहमी व्यस्त असे त्यामुळे तिला एकटेपणा आणि काळजी कधी जाणवलीच नाही.

     तापाने अस्वस्थ झालेल्या तरुण खानाकडे पाहून झोराने उसासा टाकला. तो या अवस्थेत कस आला असावा? माझ्या दयाळू अल्लाह ने त्याला त्याच्या सामर्थ्य आणि शक्ती पासून वंचित का केले आणि इथे अज्ञात लोकांच्या भरवशावर का सोडले?  त्याच्या आईला, बहिणीला आणि बायकोला सुध्दा त्याला असे विव्हळताना,  झोपेत बडबडताना आणि “दीन! दीन !” म्हणत ओरडताना पाहून काय वाटेल? युद्ध म्हणजे काय, माणसाने खोट्या सन्माना साठी आयुष्य पणाला लावणे की अपंगत्व पत्करणे? तिच्या वयाच्या मुलांमध्ये युद्ध एक सामान्य गोष्ट झाली होती आणि युद्धातील नायकांची नावे त्यांच्या तोंडी होती. आता हे युद्धाचे लोण जलदुर्ग च्या एकाकी निर्जन किल्ल्या पर्यंत पोचले होते. सैनिक जात येत, जखमी लोकांनी आणलं जाई आणि तिच्या आजोबांना बोलावणं येई त्यांना पाहण्यासाठी. आह! हजारो जखमी सैनिकांना असे उघड्यावर पडलेले ,  उन्हात तडफडताना, भळभळणाऱ्या जखमांसह पाहणे किती वेदनादायक असेल, या विचारांनेच तिच्या अंगावर काटा येई आणि ती तिचा स्कार्फ घट्ट आवळून घेई.

     तिच्या समोर जो तरुण पहुडला होता त्याचा बांधा उच्च कुळातील होता. पट्टी केलेला भाग वगळता त्याचे पिळदार बाहू आणि रूंद छाती उघडी होती.  जेव्हा तो शांत पडून राही तेव्हा तर ते अधिकच भव्य आणि सुंदर वाटत. त्याला मध्येच जाग येई तेव्हा त्याचे ते दिलखुलास स्मित हास्य तिने कधीही न पाहिलेले. पुन्हा वेदनेच्या झटक्यात सगळं विकृत आणि अस्पष्ट होऊन जाई आणि ती मुलगी आपला रडवेला चेहरा लपवत असे. जे फक्त ती आतल्या आत दाबू शकत होती. तरीही ती लक्ष ठेऊन होती आणि तो वृद्ध आपली प्रार्थना चालू ठेवी. जलप्रपाताचा गरजणारा तो नीरस आवाज अजूनही चालूच होता जणूकाही हुंदक्या मध्ये सामील झाल्या सारखा.

     ” झोरा थोडं अंग टाक,” दरवेश हळू आवाजात म्हणाला.” तुला लक्ष ठेऊन कंटाळा आला असेल पोरी आणि रात्रही फार झालीय.”

     ” तस नाही, अब्बा!,” हे तिचे आजो बां साठीचे नेहमीचे प्रेमळ शब्द असायचे. ” तस नाही , मला कंटाळा नाही आला  , मला झोपही येत नाहीय आणि त्याच्या कडे लक्ष देण्याची गरज आहे. तो आपल्या छातीवर चादर धरू शकणार नाही आणि तो ती फेकून देईल. त्याच्या तोंडाला कोरड पडलीय. तो मध्येच माझ्याकडे पाहतो आणि मला थंडपेय देण्यासाठी आणि डोक्यावर ओल्या पट्ट्या ठेवण्यासाठी इशारा करतो. मला ते द्यावच लागतं. अब्बा, तो मरणार तर नाही ना? देव त्याला नक्कीच वाचवेल. त्याची नाडी तपासा तो जास्तच गरम आणि अस्वस्थ वाटतोय.”

     ” तू म्हणतेस तसचं आहे, पोरी ” म्हाताऱ्याने उत्तर दिले. त्याने उठून रुग्णाची तपासणी केली.  ” उन लागलय त्याला तो बराही होऊ शकतो किंवा पहाटे पर्यंत मरुही शकतो. शांतपणे जा आणि आपण तयार केलेली शरीर थंड करण्या साठीची भुकटी  घेउन ये. अबू सेनेचा उपाय आहे तो , हा ताप कमी करण्यासाठी सक्षम. जा एक आण.’

     “ओह जर हे दृष्टीहीन डोळे थोडा वेळ  पाहू शकले असते , मला त्याचा चेहरा पाहता आला असता” दरवेशाला वाटले.” जी नावं मी बरीच वर्षे ऐकली नाहीत ती त्याच्या तोंडातून बाहेर पडत आहेत, हमीद खान याचा काका! कोण हमीद खान? कोण अंकुश खान? ऐन उल मुल्क हा देशद्रोही अजून जिवंत आहे? मी इथे असा अंध आणि असहाय बसलो असलो तरी ती जुनी दृश्य – विजापूरच्या त्या शाही इमारती , तो राजेशाही थाट आणि युद्ध सगळं डोळ्या समोर आहे त्यांच्या धूसर झालेल्या आठवणी , दुःखी कष्टी राजा इब्राहिम आणि त्याची दंगलखोर नीती. नशिबाने केलेली क्रूर थट्टा! मान आणि संपत्ती माझ्या दृष्टीपथात असताना आलेले हे अंधपण आणि हा तुरुंग वास. ही त्याचीच इच्छा, हे दयाळू अल्लाह! वृद्ध दर वेशाने ते आदराने स्वीकारलं. “मला काळजी घ्यायला हवी “झोराने नाजूक पावलाने प्रवेश करताच तो स्वतःशी पुटपुटला.” तिला माझी कमजोरी माहित नाही, तिला ती कळायलाही

नको, झोरा पोरी औषध आणलस?”

     ” हे ईकड आहे अब्बा,” ती म्हणाली. ” मी कशी देणार ते?”.” त्याला तहान लागली की ते चूर्ण पेया मध्ये टाकून त्याला दे, मग पाहा काय होत ते. त्याला घाम आल्यास आणखी देऊ नको, तास भर ताप तसाच राहिला तर त्याला सगळं देऊन टाक. मी दुसरं काय करू शकतो पोरी, त्याला देवाच्या भरवशावर सोडू शकतो. मी इथून जाणार नाही झोरा परंतु मी आता थकलोय आणि मला झोप येतेय. तुला कधीही भीती वाटली तर मला उठव मी त्याच्या  जवळ बसेल. नवाबाची माणसं कुठं आहेत हे काम ते नक्कीच करू शकतात.”

     “सगळे गेले ” झोरा म्हणाली. ” प्रत्येकाने काहीतरी कारण सांगितलं आणि ते निघून गेले आता मी एकटीच आहे. एक माणूस मात्र इमानदार श्वाना सारखा आपल्या मालकाकडे एकटक पाहात आहे. त्याला विचारलं तर तो रंगा नाईक बेरड आहे म्हणाला पण तो हलक्या जातीचा असल्याने आत येऊ शकत नाही म्हणतोय. तो आत येऊ शकतो का अब्बा?”

     ” नक्कीच पोरी , नक्कीच . खरा इस्लाम भेदभाव शिकवत नाही. त्याला पाहायचं असेल तर आता येऊ दे. माझं शूर लेकरू, ” तो तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. ” आता तू दया आणि क्षमा शिकलीस. बघ तो हालचाल करतोय, मला ऐकू येतंय.”

 ” खरच की, पण आधी काय झालं , ”  एका छोट्या चांदीच्या कपात सरबत ओतत आणि त्यात चूर्ण टाकत ती उत्तरली. झोराने पाहिलं त्यानं ते अधाशीपणे पिऊन टाकलं आणि तो पुन्हा उशीवर पडला.

     ” आता मी बेरडाला बोलावते, ” झोरा म्हणाली. ती दरवाजा कडे गेली तिला तो बेरड पूर्वी सारखाच बघत असलेला दिसला.” उठ, चल माझ्या बरोबर, ” ती म्हणाली.

     ” पण बाई मी अस्वच्छ आहे, ‘ त्याचं उत्तर आलं.” धर्माभिमानी मुस्लिमाच्या सेवेत बेरडाला कोण बोलावतय? तरीही मी काही मदत करू शकलो तर , माझ्या शूर मुला, माझे मन तुझे आभार मानेल.”

     ” माझे आजोबा तुला बोलावतायेत अल्लाह साठी ” मुलगी म्हणाली. ” उठ आत ये, तुझं स्वागत आहे.”

     तो उठला आणि खाली वाकत त्याने तिच्या पायावर डोकं ठेवलं. झोराला त्याचे अश्रू जाणवले.” इतकं प्रेम, ” तिने विचार केला, ” आणि तेही एका मुस्लिमासाठी!” ” अब्बा इथ झोपले आहेत ” तिने दालनात प्रवेश करत म्हटले. धिप्पाड बेरड तिच्या मागोमाग आत आला.

     ” परम दयाळू परमेश्वराच्या नावाने त्याचं स्वागत आहे,” म्हातारा म्हणाला, ” त्याला पाहू द्या.”

     ”  तुमच्या आदरणीय चरणांना स्पर्श करण्यापूर्वी नाही, मी तुम्हाला ओळखतो हजरत, परंतु मी मृत्यु इतका शांत राहू शकतो,” डोक्यावरील पगडी बाजूला करत अणि साष्टांग दंडवत घालत तो म्हणाला.”मी लक्ष ठेवू शकतो”.

     ” माझ्या मुला,तू काही खाल्लंस का? तुला जेवणाची इच्छा आहे का?”

     ” काही नको,” रंगा उत्तरला. ” त्याला तिकडे पाहणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे हेच माझ्यासाठी खाणे पिणे.  मी त्याच्यावर प्रेम करतो, हजरत, अगदी माझ्या म

मुला सारखं. मी अंघोळ केल्यावर जेवण करेल. जर तो गेला तर त्याला माती देई पर्यंत मी इथच राहील त्या नंतरच मी इथून जाईल. माझ्या पुढच्या लांब अणि थकवणाऱ्या प्रवासा साठी तो जगेल का?”

      “जशी देवाची इच्छा,” त्याचं उत्तर आलं.” मला जे शक्य आहे ते सर्व मी केलं , तो आता त्याच्या हातात आहे. बघुया.”

    नंतर रंगा नाईक बिछान्या जवळ बसला आणि त्या मुली बरोबर लक्ष देऊ लागला. त्याने बाईच्या नजाकतीने पीडिताची उशी बदलली ,  त्याच्या कपाळावरील ओली पट्टी बदलली अणि त्याचा जखमी हात त्रास होणार नाही असा ठेवला. तरीही त्याचे कन्हणे चालूच होते आणि त्याचे बरळणे , झोराला त्यातले काही शब्दच समजत होते.

     ” त्याचा आत्मा आता लढतोय,”रंगा हळूच म्हणाला. ” घाबरु नका त्याच्या शत्रूला मारून तो जखमी झालाय. पण पहिला वार त्याने केला नव्हता. मियाचा वार माञ जबर होता इलियास खान जागेवरच मारला गेला. नंतर आम्हीही आक्रमण केलं आणि मियाला सुखरूप बाहेर काढलं, मी आणि आणखी दोघं होतो अशा उन्हाच्या झळातून त्याला वाचवणं कठीण तेव्हाही कठीण होतं आणि आता तर अधिकच. तुमच्या कडे आणखी काही औषध नाही का? त्याची ही बडबड बघवत नाही.”

     ” आहे माझ्याकडं, ” ती म्हणाली. ” पण तो जगेल की मरेल हे अब्बा सांगू शकत नाहीत आणि मला भीती वाटते “

     ” देवाच्या नावानं देऊन टाका!”  बेरड लगेच उद्गारला. एका पवित्र माणसाचा उपाय अहे वाया जाणार नाही. आणि तू ही थोडं अंग टाक बाई.”  “मी लक्ष ठेवतो” औषध दिल्या नंतर तो म्हणाला.

    ” मी झोपू शकत नाही,” तिने उत्तर दिलं.” मला लक्ष ठेवावच लागेल.”

     ती दोघंही शांत बसली. पण तिच्या समोरचं हे दोन चेहरे झोराला भुरळ घालत होते. एक शाही,  दाढी मिशा असलेला राजबिंडा तरुण. दुसरा राकट, डोळे आणि तोंड कुरूप असलेला, पिकलेल्या  मिशांचा , कपाळावर आठया असलेला तरीही कनवाळू आणि दुःखी वाटणारा. दोघ वेगवेगळ्या वर्णाचे, धर्माचे यांचं नातं तरी काय?

     तांबड फुटे पर्यंत ,  पक्ष्यांचा चिवचिवाट होईपर्यंत अणि कोंबडं आरवे पर्यंत ती दोघं लक्ष ठेऊन होती. अचानक बेशुद्ध असलेल्या अब्बास खानाने डोळे उघडले. त्याने बेरडला त्याच्या उशाला बसलेलं पाहिलं आणि कापऱ्या आवाजातच तो म्हणाला “रंगा!”

     ” मिया दोस्ता तू मला ओळखलं?” तो उत्तरला. ” रंगाच आहे, तुला कसं वाटतंय?”

      “मी स्वप्न पाहात होतो.” तो म्हणाला.” शत्रुची ती शेवटची नजर मी त्याला खाली पाडलं माझ्या डोळ्या समोर होतं आणि अचानक स्वर्गातून एक परी आली आणि तिन मला सरबत दिलं. देवदूत तिला घेऊन गेले.ते मला नरकात घेऊन जाऊ शकले नाहीत.” आणि तो थकून पुन्हा झोपला.

     ” अब्बा ज्या संकटाबद्दल बोलत होते ते हेच आहे,” झोरा कुजबुजली ” जर तो झोपला तर बर असेल, बोलू नका लक्ष ठेवा.”

     ज्या तणावाखाली ती दोघं त्या तरुणावर लक्ष ठेऊन होते त्याचे वर्णन करताच येणार नाही. जीवन मरणाची ही लढाई जास्त काळ टिकली नाही. आता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळून गालावर येत होते. जोरात चाललेला श्वास नियमित झाला होता. त्याच्या ओठावर दव बिंदू दिसत होते आणि तो क्षणोक्षणी थंड होत होता , परंतु हे फसवं असू शकतं!

     “ओह! याच्या जिवासाठी मी आईला मेंढीचा नवस बोललो होतो आन आईन माझं गाऱ्हाणं ऐकलं. तो सुखरूप आहे. सुखरूप बाई सुखरूप!” तो दबक्या आवाजात झोराला म्हणाला. ” सुखरूप, आणि तोमाझ्या बरोबर पुन्हा स्वार होईल त्याच्या राज्याच्या शत्रू विरुद्ध लढण्यातसाठी. आणखी पांघरूण असल तर द्या त्याला थंडी वाजता कामा नये. आणि तुम्ही पण विश्रांती घ्या रात्र खूप थकवणारी होती. पहा, म्हातारा कसा शांत झोपलाय; मिया बरोबर म्हणत होता तू स्वर्गातून आली आहेस.”

     उत्साह खूप होता आणि त्या मुलीने एक क्षणभरही डोळे मिटले नव्हते. आता या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमळ शब्दांचा तिच्यावर परिणाम झाला होता आणि ती खोलीच्या कोपऱ्यात पसरलेल्या गालिच्यावर झोपली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती हुंदके रोखू शकली नाही. परंतु त्यांनीच तिला शांत केले आणि ती गाढ झोपी गेली.

     बाहेरचं जग भल्या सकाळीच जागं झालं होतं. मोठ्या चिंचेच्या झाडावर पक्षी किलबिल करत होते. मशिदींवर कबूतरं घू घु करत होती. होले जणू काही त्यांना उत्तर देत होते. पोपट गोंगाट करत अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडले. सूर्य उगवला तसं त्याची कोवळी किरणं कठीण खडकांवर आणि  खोल दरितल्या पर्णसंभारावर पडली आणि दुर्ग बेटाच्या शेवटी ती पवित्र नदी मोठ्या, शांत तलावा सारख्या डोहात विस्तारली. तिकडे जलप्रपाताचे उदास गाणे चालू होते. परंतु पाणी इतके जास्त नव्हते. अचानक आलेल्या पुराचे पाणी रात्री सतत ओसरत होते. घरात एकच गडबड चालू होती ती  म्हातारीची. तिने गायी आणि शेळ्यांचे दूध काढले होते. त्यांना चरायला सोडून देऊन ती सकाळच्या जेवणासाठी तांदूळ निवडत बसली होती.

     ” खिचडी आणि डाळ च करावी, मला वाटतं त्यांनी काल फुलके आणि डाळच खाल्ली असावी. नको मी खिचडीच करते जास्त डाळ खाणे हजरत साठी  चांगले नाही आणि पाहुण्यांचा ताप कमी झाला असेल तर त्यांनाही ते चांगलेच असेल. या करीम! काय रात्र होती.  ही पोरगी रानटी बडबड ऐकून जरा सुद्धा डगमगली नाही की घाबरली नाही. पनाह! मी हे करूच शकले नसते आणि मी जेव्हा तिकडे पाहिलं तर बिछाण्याजवळ रक्तळलेला रांगा नाईक बसलेला त्याने मला इशाऱ्यानेच गप्प बसायला सांगितलं. झोरा माञ कोपऱ्यात निवांत झोपली होती जवळ रक्ताळलेला माणूस बसलाय हे माहित असून सुद्धा. बाई, मला तर झोपच आली नसती पण ही काय पोरगी आहे हे देवालाच माहित. देवदूतच जन्मलीय चांगली कामं करण्यसाठी.  ‘सेविका ‘  कधी कधी म्हणते सुद्धा’ या गावात कोणी आजारी नाही का? ज्यांची मी सेवा करू शकेल. कोणी गरीब नाही का? त्यांना जेवू घालू शकेल जा आणि बघून या कोणी असेल तर.’ मी खात्रीनं सांगते जर ती झोपली नसेल तर नक्कीच काहीतरी चांगले काम करत असेल. पण तिला झोपू दे आणि स्वतःहून उठू दे माझी परी! माझी लाडकी!”

     ” आई! आई मामुला!”  दरवेशाच्या घराच्या दाराजवळून राकट आवाज आला. ” आई! कुठं आहेस तू? मी तुला सगळीकडं शोधलं कोणी भेटलं नाही. तू गेलीस की काय? तो दरवेश सुध्दा गेला काय?”

     ” ए मुडद्या कशाला बोंबलतोस! निघ इथून” हातातील तांदूळ खाली ठेवत म्हातारी रागाने ओरडली. तिच्या स्वगतात अडथळा आला म्हणून . ” मी म्हणते ना निघ इथून आणि गप्प बस.  ते सगळे झोपले आहेत एका भयानक रात्री नंतर आणि एका जखमी माणसा बरोबर.” असं म्हणत ती दारात पोचली.” ‘ गफुर तू आहेस होय, आणि तू कशाला बोंबलत होतास?”

     ” सकाळी सकाळी कशापायी रागावतीस आई,” तो माणूस म्हणाला. ” तुझी तब्येत खराब होईल. अरे देवा नवाब आता त्यांच्या सहकाऱ्यासह खाली येत आहेत आपल्या भावाला भेटण्यासाठी.  मला तुम्हाला सावध करायला पाठवलय. ती सुंदर परी कुठाय? आणि हजरत मशिदित गेले असतील नमाज पढण्यासाठी मला तिकडं गेलेच पाहिजे ते कुठंही असोत.”

     ” मी पुन्हा सांगते तू निघ इथून” म्हातारी पुन्हा ओरडली. ” त्या नवाबला सांग ते सगळे झोपलेत आणि त्यांना मी, मामुला किंवा कोणीच  उठवू शकत नाही पन्नास नवाब आले तरी. त्याला सांग मामुला अस म्हणतीय आणि आल्या पावली माघारी जा. त्या पोराचा जीव टांगणीला लागलाय. देवाची प्रार्थना करा..तो झोपलाय आणि सगळे झोपलेत

फक्त रंगा नाईक तेवढा जागा आहे तो जणू त्याचा मुलगाच असल्या सारखा. पळ , मी म्हणते शक्य असल तेवढं जोरात नाहीतर देवाचं नाव घेत, शिंग वाजवत आणि मेलेल्याला उठवतील असा आवाज करत ते येतील.”

    ” असं आहे तर ,” तो माणूस हसत म्हणाला.” मी तुझा निरोप देईल पण नवाबाला ते आवडणार नाही. त्याने खोली तयार केली नाही का आणि स्वयंपाकी सुद्धा सकाळपासून कामाला लागले नाहीत काय?”

    ” अहो मी!”  पदराच्या कोपराने डोळे पुसत म्हातारी म्हणाली. ” चांगल जेवण तुमचं तुम्हीच करा. त्याने बरेच दिवसापासून काहीही खाल्ले नसले तरी हजरत परवानगी देत नाहीत तोवर त्याला काहीच खाता येणार नाही. जखम आणि उन्हामुळे तो लहान मुला सारखा अशक्त झालाय मी त्याच्या साठी खिचडी बनवणार आहे. देव त्याला खाण्या इतकी शक्ती देवो. मी उगाच बडबड करत बसले तो पर्यंत तू   अर्धा गड चढून गेला असतास ,  जा आणि लवकर परत ये, त्याला बरं वाटलं तर आपण नवाबला संध्याकाळी यायला सांगू.”

   ” आता मी बरोबर केलं, ” म्हातारी स्वतःशीच पुटपुटली. असं म्हणत तिने पायरी वर बसून तांदूळ निवडण्याच काम सुरू केलं. ” देवा मला माहित आहे नवाब रागावेल, पण फिकीर कोण करतं? त्यांना सगळ्यांना आत सोडलं असत तर तो म्हातारा काय म्हणाला असता?”

      “आई!”  तिच्या पाठीमागून आवाज आला. “आई! तो झोपलाय अजून. त्याने घट्ट पकडून ठेवलेला हात रंगाने जराही बाजूला केला नाही.पण त्यानें मला डोकं दुखत असल्याचं सांगितलय. मी पाहिलं हाताला जखम झालीय तरी कचरलो नाही की  तक्रारही केली नाही. आई आपण ते हलकेच पुसून काढू आणि झाडपाला बांधू. अब्बा अजूनही शांत झोपलेत आणि हा थकलेल्या लहान मुला सारखा निपचित पडलाय. आई! तो जगेल! तो जगेल! संत त्याला सांभाळतील त्याच्या आई साठी.”

    आणि ती मुलगी म्हातारी बरोबर आत गेली आणि त्याची  शुश्रुषा केली.  नाईकाची जखम जास्त खोल नव्हती पण तो मृत्यूच्या दाढेतून वाचला होता हे त्याला माहित होतं. थंड झाडपाला बांधला आणि त्याला बरं वाटलं तसे त्याच्या गालावरून अश्रू ओघळले.

    ” तो झोपलाय, अगदी शांत लहान मुला सारखा” नाईक पुटपुटला.” तो हलला सुद्धा नाही आणि त्याने माझा हातही बाजूला के ला नाही. खरंच,  तो नक्की वाचेल, बाई , मी तुझा आभारी आहे.”

     त्या माणसाच्या सहन शक्तीचे आणि वीरतेचे झोराला आश्चर्य वाटले. आदल्या दिवशी आपल्या जखमी तरुण मित्राच्या रक्षणासाठी त्याला उन, धूळ आणि थकवा सगळं सहन करावं लागलं होतं. त्याला माहित होतं तो मृत्यूच्या दाढेतून परत आलाय पण त्याने जीवाची पर्वा केली नाही एवढं करुन सुद्धा त्याने रात्रभर अन्न पाण्याविना त्याच्या मित्रावर लक्ष ठेवलं.” मी कोण आहे त्याच्या साठी?” ती खिन्न झाली.” पण मी तर एक लहान मूल आहे, मूल.”

     आणि एक उष्ण दिवस मावळला. त्यांनी झोपलेल्या खानाला हळूच वारा घातला. जागे झाल्यावर वृद्ध दरवेशाने आपल्या रुग्णाला तपासले आणि त्याला समाधान वाटले. रंगाला तिथून कोणीही ढळवू शकले नाही. घाईने आंघोळ करुन त्याने म्हातारीने शिजवलेले जेवण घेतले, थोडेसे शरबत घेऊन तो ताजातवाना झाला होता. ठरल्या प्रमाणे नवाब परत गेला पण तो खाना बद्दल सारखी चौकशी करत होता पण त्याला एकच उत्तर मिळत होतं- तो झोपलाय. अशा प्रकारे सगळ्याचा दिवस शांततेत गेला. सूर्य मावळतीला गेला. पक्षी घरट्यकडे परतू लागले आणि खानाला जाग आली.

     सुरवातीला त्याला कळेनाच तो कुठं आहे, काय झालं, इतक्यात त्याची नजर झोरावर पडली. ती त्याला हळुवार वारा घालत होती. तो हलक्या आवाजात तिला म्हणाला ” तू कोण आहेस? मी तुला ओळखतो, तूच ती. परी माझ्या स्वप्नात आलेली अणि मला स्वर्गातल सरबत दिलेली. कोण आहेस तू?”

     ” मी फक्त झोरा, ” स्कार्फ नेनचेहरा झाकत ती हळूच म्हणाली. एक पुरुष तिला पाहात आहे हे तिला पहिल्यांदाच जाणवलं. ” पण तुम्ही बोलू नका साहेब, तुम्हाला बोलू देऊ नये असा मला आदेश आहे. डोळे बंद करा अणि झोपा.”

     ” नाही ” तो म्हणाला ” माझी पुरेशी झोप झालीय आणि ताप सुद्धा कमी झालाय.”

     ” ती बरोबर बोलतीय मिया .” रंगा वाकून म्हणाला. “झोपा आता, धोका टळलाय आणि हजरत म्हणाले आपण वाचलात , पुन्हा जाग आली की थोडं खाऊन घ्या.”

     ” रंगा तू अजुन इथच आहेस! मला वाटलं मी स्वप्नात च पाहतोय आणि तुझा हात माझ्या जवळ आहे. तुझ्या डोक्याला ही पट्टी कसली?”

     ” काही नाही जरासं खरचटलय, हजरतनी पट्टी केलीय ‘ त्यान उत्तर दिलं.” मी तुम्हाला नंतर सांगेल सगळं, तुम्ही बोलत आहात हेच माझ्या साठी खूप झालं.”

     ” काय भयंकर स्वप्न होतं ते रंगा, ती लढाई, त्या उष्णतेच्या लाटा, धुळीचे लोट आणि मला आठवतंय मी पाहिलेला तो  कोसळणारा जलप्रपात जणू अश्व एकमेकाशी लढाई करताहेत. कोणी दाखवला मला? नंतर मला वाटलं मी लाटांवर डोलणाऱ्या एका तराफ्यावर आहे. तू मला धीर देत आहेस आणि मी बेशुद्ध झालो. मला आठवतंय एक परी आली आणि तिने माझी तहान भागवली.”

     ” बस्स! ”  तिचा पाय आपटत झोरा ओरडली.” मी तुला गप्प बसायला सांगितलं होतं ना, तू वेडा झालास काय? ” एका मुलीचे विचित्र वागणे आणि भारदस्त आवाज ऐकून त्याने तिच्या कडे आश्चर्याने पाहिलं.

     ” होय, सुंदरी ” तो म्हणाला. ” मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो तू पुन्हा माझ्या स्वप्नात ये.”

     दुसऱ्या दिवशी नवाब शांत बसूच शकत नव्हता. त्याचा वैद्य मुदगलहून आला होता. त्याने जखमी खानाला तपासले आणि त्याला काळजी पूर्वक किल्ल्यावर घेऊन जाण्याची परवानगी दिली. टेकडी वरची शुद्ध हवा त्याला लवकर बरे होण्यास मदत करेल असे तो म्हणाला. सायंकाळी खानाने रजा घेतली, बरे वाटल्या नंतर पुन्हा भेटण्याचं वचन देऊन….

*****

  • सतीश सोनवणे / कामरगाव
  • संपर्क : ७७०९६ ८३३२३

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

1 Comment

  1. John E. Snyder

    This is a topic that’s close to my heart… Many thanks!
    Where are your contact details though?

    Feel free to surf to my blog post … John E. Snyder

Leave A Comment