2020 जुलै

गट-तटांची हटती दुनिया – रंगनाथ पठारे

सा हि त्या क्ष र 

जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा याचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! पुणे पोस्ट या दिवाळी अंकात त्यांनी एक चॅन लेख लिहिला होता. सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख पुनश्च वाचकांसाठी…   

____________________________________________________________________

साठोत्तरी काळात समाजाच्या सर्व स्तरांतून, सर्वदूर भागांतून लेखक-कवी लिहू लागले, तसेच नवे वाचकही निर्माण झाले. साहित्याच्या मुख्य धारेत सार्याा प्रवाहांना सामावून घेताना कळत-नकळत त्याचे वर्गीकरण झाले. शहरी, महानगरी, दलित, ग्रामीण, स्त्रीवादी अशी कप्पेवारी प्रचलित झाली. साहित्याच्या संदर्भात ही सकारात्मक घडामोड असली, तरी समाजाची इतर अंगे विखंडित होत असताना साहित्यातील असे विखंडन योग्य आहे का? परिणामी, समाजाच्या अभंग होण्याच्या शक्यता दुरावत आहेत का? या शंकांचं निरसन करणारा व नव्या पिढीविषयी आशावाद जागवणारा परामर्श.

गट-तटांची हटती दुनिया

– रंगनाथ पठारे

साधारणतः १९६० पर्यंत मराठी लेखक पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती इथे, आणि बृहन्महाराष्ट्र होता म्हणून काही प्रमाणात इंदोर, बडोदा, भोपाळ, हैदराबाद यांसारख्या महाराष्ट्राबाहेरच्या शहरांत राहत असे. अपवाद म्हणून काही इतरत्र- उदाहरणार्थ, खामगाव, नाशिक, नगर, जळगाव इथेही- राहत असतील. पण त्यांचाही पुण्या-मुंबईशी संपर्क कायम असे. कारण छापणार्याद व्यवस्था मोठ्या शहरांत होत्या आणि वाचक-समीक्षकही जास्त करून मोठ्या शहरात राहणारा असे. लिहिणारे आणि वाचणारे साधारणतः ज्याला पूर्वी उच्च जातींचे समजत अशा देशस्थ, कोकणस्थ, कर्हावडे ब्राह्मण, सारस्वत, प्रभू, शेणवी आणि तत्सम जातींचे असत. (पूर्वी उच्च जातींचे अशासाठी, की हल्ली असे कोणी मानत नाही. या जातींतल्या काहींच्या मनात ते असेलही, पण ते तसे उघड दाखवत नाहीत, आणि दाखवले तरी इतर जाती त्याला जुमानत नाहीत.) लेखक आणि वाचक यांचे जगण्याचे स्थान, आस्थांचे विषय, जगण्याच्या रीती, प्रतिक्रियेच्या पद्धती यांच्यात सर्वसाधारण युनिफॉर्मिटी होती. त्यामुळे साहित्याच्या दुनियेत गटबाजी आणि कप्पे असण्याला तितकीशी संधी नव्हती. म्हणजे ते नव्हतेच असे नाही. आपल्या जातीच्या लेखकाला पुढे करण्याची वृत्ती होतीच, पण ती मर्यादित. आणि साहित्याच्या दुनियेचा भूगोलच मुळात मर्यादित होता. साधारणतः हरिभाऊ आपटे यांच्यापासून फडके, खांडेकर, अत्रे, माडखोलकर ते काही अंशी गंगाधर गाडगीळ यांच्यापर्यंत अशीच स्थिती होती. आणि म्हणूनच अत्रे यांचे उरलेल्यांशी आणि इतर अनेकांशी होणारे वाद वृत्तपत्रांचे रकाने भरत असत आणि लोकही रस घेऊन ते वाचत असत.

पुण्या-मुंबईबाहेरचा श्रमी महाराष्ट्र ह्या लोकांच्या आस्थेचा विषय सहसा नसे. तो झालाच तर अधिकांश विनोदनिर्मितीसाठी येत असे, किंवा तत्सम अतिरिक्त करमणुकीसाठी. गावठी लोकांची भाषा, त्यांचे मूढपण अशा गोष्टी जास्त. ज्यांच्या तो खरोखर आस्थेचा विषय होता त्या, उदाहरणार्थ, साने गुरुजी यांची रडवे लेखक म्हणून टवाळी करण्यात बहुतेकांनी आनंद घेतला. पुण्यातल्या मध्यमवर्गीय पांढरपेशा लोकांच्या जगण्यातील विसंगतींचे अस्सल दर्शन चिं. वि. जोशी यांच्या लेखनात घडले. त्यांना श्रमी महाराष्ट्र चांगला माहीत होता. त्यांना त्या लोकांविषयी आस्थाही होती. ते पाली भाषेचे पंडित होते. पण एक विनोदी लेखक यापल्याड अधिक गांभीर्याने त्यांच्याकडे कोणी पाहिले नाही. किंवा श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या अफाट असाधारण कार्याचे महत्त्व फार कोणाच्या लक्षात आले नाही, आणि राजारामशास्त्री भागवतांच्या ‘मर्हाणट्यासंबंधी चार उद्गारां’चे, बाकी भूमिकांचेही. बाकी ज्योतिराव फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, जवळकर, शिवराम जानबा कांबळे, बंधुमाधव हे लेखक म्हणून या वाचकांच्या खिजगणतीतही नव्हते. एकुणात, एका मर्यादित भूगोलात राहणारे मर्यादित ज्ञाती-समूहांतील लेखक आणि वाचक आणि त्यांचे मर्यादित आस्थाविषयांचे विश्व, अशी ती दुनिया होती. गटबाज्या, शिवीगाळी या गोष्टी होत्याच. उदाहरणार्थ, ‘केसरी’ आणि ‘सुधारक’मधली टिळक आणि आगरकर यांची अग्रलेखातील भाषा. अत्रे आपल्या ‘मराठा’ वृत्तपत्रातून विरोधकांवर अत्यंत शिवराळपणे हल्ला करीत. हे वृत्तपत्र लोकप्रिय असल्याने ते महाराष्ट्रभर जात असे. साहित्याची दुनिया वृत्तपत्रांच्या आस्थेचा विषय असल्याने ती तिथे येत असे, पण तिला मिळणारा प्रतिसादही प्रामुख्याने पुण्या-मुंबईतच असे. 

प्रस्थापितांना आव्हानाचा संक्रमण काळ

मागच्या शतकातल्या साठीच्या दशकात यात बदल दिसणे सुरू झाले. सत्तरीच्या दशकात हे बदल स्पष्ट झाले. १९४७ला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या आधीपासूनच ज्या जाती शिक्षणापासून वंचित होत्या त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले होते. राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, बाबुराव जगताप, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या लोकांनी ते सुरू केले होते. नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने शिक्षण सर्वांसाठी खुले झाले. परिणामी, साठीच्या दशकात अठरा पगड जातींतल्या लेखकांनी साहित्याच्या प्रस्थापित व्यासपीठांना आव्हान देत लघुअनियतकालिकांची चळवळ सुरू केली. तिचा आवाका फार मोठा नव्हता, पण लेखन-वाचन ही विशिष्ट जातींची मिरास नाहीय, हे तिच्यातून प्रस्थापित झाले. सत्तरीच्या दशकात नामदेव ढसाळ, राजा ढाले प्रभृतींनी दलित पँथर ही मिलिटंट संघटना स्थापन केली. दलितांच्या सामाजिक हक्कांसाठी लढा देणारी ती संघटना होती. पण त्याला जोडूनच बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्यासारख्यांनी दलित साहित्य चळवळीचा पाया घातला. नंतर ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, ख्रिस्ती मराठी साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशा अनेक चळवळी झाल्या. समाजातल्या वंचित घटकांमधून खूप वेगवेगळ्या अनुभवांची दुनिया मराठी साहित्यात काही एक आडदांडपणे, अस्सलपणे प्रकटू लागली. मराठी साहित्य हे खर्या  अर्थाने मराठी होऊ लागले. कारण तोवर ते तसे नव्हते. आता आठवले की हसू येते, पण दलित साहित्य अवतरल्यावर काही काळ साहित्याचे दोन प्रकार मानत असत. ललित साहित्य आणि दलित साहित्य. एक उच्च जातींचे आणि दुसरे मागास जातींचे! पण बाकी सगळे समाजघटक लिहू लागल्यावर अशी विभागणी निरर्थक झाली. दूरदूरच्या गावांतून चांगले लिहिणारे येऊ लागले. लेखकाने पुण्या-मुंबईत राहिले पाहिजे, अशा धारणा अस्तंगत होत गेल्या. वाचणार्याा लोकांच्या भूगोलाचा विस्तार झाला. महाराष्ट्राच्या सर्वदूर कोपर्यां पर्यंत मराठी साहित्याला वाचक मिळू लागला. एरवी महाराष्ट्र म्हणजे विशिष्ट जातीच्या लोकांचा देश आणि त्यांचे साहित्य हेच मराठी साहित्य, असा समज महाराष्ट्राबाहेर होता. (जरा अस्थानी होईल, तरीही एक अनुभव सांगतो. १९८० च्या सुमाराला मुंबई विद्यापीठाच्या Optical Instrumentation Centreoमध्ये एका कोर्सच्या निमित्ताने मी दहा दिवस काम केले. देशाच्या अनेक भागांतून प्राध्यापक आलेले होते. जम्मू-काश्मीरमधून आलेले राझदान नावाचे एक गृहस्थ होते. आमच्या गप्पा होत. मी पुण्यापासून जवळच्या गावातून आलेलो आहे, असे काही तरी मी त्यांना सांगितले असणार. ते पुण्याला काही दिवस राहिलेले होते आणि पुण्याविषयी त्यांना अतोनात प्रेम होते. सारखे ‘पूना कितना अच्छा है, वहॉंके लोग कितने अच्छे है,’ असे तो म्हणत असे. मी मराठीत नुकताच लिहायला लागलेलो होतो. मराठी साहित्याचा विषय निघाला. म्हणाले, ‘आप ब्राह्मणही होंगे!’ म्हटलं, ‘का?’ म्हणाले, ‘पूनामें सब ब्राह्मणही होते हैं|’ नंतर म्हणाले, ‘महाराष्ट्रमें सब ब्राह्मणही होते हैं ना!’ म्हटलं, ‘बाबा, मी ब्राह्मण नाहीय आणि महाराष्ट्रात सगळे ब्राह्मण नाहीत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांची अजूनही बहुसंख्या आहे हे खरंय, पण तेही आता बदलतंय. एकूण मराठी लोकांत ब्राह्मण संख्येने फार कमी आहेत, पण त्यांच्यात शिक्षणाची परंपरा आहे. देशपातळीवर सगळ्या क्षेत्रांत ते अग्रस्थानी होते आणि ते सर्वांना माहीत होते हे खरं आहे,’ इत्यादी.) 

चळवळींपाठी सामाजिक, सांस्कृतिक गरजा कारक व म्हणूनच प्रेरक असतात. जोपर्यंत त्यांची आवश्यकता असते तोवर त्या चालू राहतात. त्यांची गरज, त्यांच्या उद्दिष्टांपाठीची निकड संपली की त्याही हळूहळू अस्तंगत होतात. उदाहरणार्थ, साहित्यिक चळवळी ज्या अनेक समाजघटकांनी अलीकडच्या काळात केल्या त्या साहित्याच्या दुनियेत आपली रास्त जागा दाखवून देण्यासाठी केल्या. साहजिकच त्यांचे त्यांचे गट तयार झाले. आपल्या गटातल्या लेखकांसाठी अधिकचे प्रयत्न होऊ लागले. हे मी फार गैर मानत नाही. कारण याचा उपयोग असला तरी त्याचा प्रभाव तात्पुरता असतो. दलित साहित्य चळवळीतून आलेले किती टिकले? ग्रामीण साहित्य चळवळीने प्रमोट केलेले किती आज टिकले आहेत? मौज-सत्यकथेत लिहिणार्याा आणि एके काळी अत्यंत प्रभावशाली समजल्या गेलेल्या, तरीही आज ज्यांचे काहीही उरलेले नाही अशा किती तरी लेखकांची नावे सांगता येतील. 

मला असे दिसते, की लेखकाला खरा जोखतो आणि टिकवतो तो फक्त सामान्य वाचक. सामान्य वाचक आपण समजतो तितका सामान्य मुळात नसतो. एक वेळ प्रगल्भ वाचक मानला जात असलेला समीक्षक हितसंबंधी भूमिका घेत तडजोडी करील. अनेक समीक्षक अशा तडजोडी करताना दिसतात. सामान्य वाचक मात्र कोणत्याही भूलथापांना बळी न पडता अत्यंत सुज्ञपणे साहित्याच्या दुनियेतले लेखकाचे स्थान ठरवतो. आणि हे करताना तो कोणत्याही दबावांना किंवा त्या त्या काळात ज्ञानी समजल्या जाणार्याव लोकांच्या कृतक श्रेष्ठ आकलनाच्या पेशकशीला जुमानत नाही.  तो जातीय अथवा वर्गीय अंगाने विचार करत नाही. तो आपल्या भाषिक संस्कृतीचा सच्चा आणि सुज्ञ वाहक असतो. महात्मा फुल्यांना साहित्यिक म्हणून त्यांच्या हयातीत किती मान्यता होती? स्वतःला मराठी भाषेचे ‘शिवाजी’ म्हणवून घेणार्याच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांच्या लेखनाची कैकदा टवाळी केली होती. शास्त्रीबोवांचा अधिक्षेप मला करायचा नाहीय. त्यांनी काही महत्त्वाचे सांस्कृतिक प्रबोधन केलेले आहे; पण त्यांच्या आस्थेचा पल्ला सत्ता गमावलेल्या एका बारक्या जातीच्या पल्याड अजिबातही गेलेला नव्हता, हे कसे विसरता येईल? असा माणूस स्वतःला या भाषेचा शिवाजी म्हणवून घेतो, हे आज हास्यास्पद वाटते. उलट, आज मराठी साहित्याचा इतिहास लिहायचा ठरला तर महात्मा फुले यांचा ‘शेतकर्यांटचा आसूड’ किंवा ‘तृतीय रत्न’सारखे नाटक टाळता येईल काय? त्यांचा ‘कुळवाडीभूषण शिवराया’चा पवाडा कसा विसरता येईल? आणि हे केवळ काळ बदलला किंवा शिक्षणाची परंपरा नसलेल्या जातीत शिक्षण पोहोचले म्हणून झाले असे नाहीय. त्यांच्या लेखनातील वाङ्मयीन गुणवत्ता काळाच्या कसोटीला उतरली म्हणून त्यांचे लेखन उरले आणि महत्त्वाचे ठरले. श्रमी महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना त्यांनी आपल्या आस्थेच्या कवेत घेतले, त्यांची सुख-दुःखे, त्यांच्या आशा-आकांक्षा यांचे श्रेष्ठ प्रतीचे आंतरिकीकरण त्यांनी केले म्हणून ते अस्सल मराठी ठरले आणि वाङ्मयीन अनुभवांच्या मूलभूत साम्याच्या निकषावर जागतिक दर्जाचे होऊ शकले. 

ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर हे एके काळी अतोनात लोकप्रिय होते- विशेषतः फडके. आज त्यांचे काय उरले आहे? अगदी मागच्या पिढीपर्यंत हे लेखक स्वतः किंवा त्यांचे काही चाहते ‘त्यांनी मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले,’ असे म्हणत होते. कुठे गेले हे अधिराज्य? उलट, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘ज्ञानकोशा’सारखे अफाट काम जवळपास एकट्याने उभे केले. असे जगातल्या फार कमी भाषांत एखाद्या माणसाने केले असेल. बहुधा नसेलच. सोबतीने त्यांनी काही कादंबर्यायसुद्धा लिहिल्या. त्यांना हे अधिराज्य गाजवणारे महाशय ‘कादंबरीकार’सुद्धा मानायला तयार नव्हते. आज त्यांचे हे लेखन वाचताना जाणवते, की ते त्यांच्या बाकी समकालीनांच्या पेक्षा किती तरी महत्त्वाचे आणि काळाच्या अतीत होण्याच्या मूल्यांनी युक्त आहे. कोण कोणाची कोणत्या कारणाने किती भलावण करतो याला महत्त्व असतेच, पण ते तात्पुरते. दीर्घकाळ टिकण्यासाठी साहित्यात कालातीत होण्यासाठीचे मूल्य असावे लागते. त्यासाठी लेखक आपल्या वर्तमानात किती खोलवर आणि कशी बुडी मारतो आणि तिथून वर आल्यावर काय सांगतो हे महत्त्वाचे असते. 

जातीय-वर्गीय उतरंडीचा अटळ परिणाम

लेखक आणि समीक्षक हे सामान्यतः मध्यमवर्गातून आलेले असतात. आज हा वर्ग फार बदललेला आहे. साठीच्या दशकाआधी होता तसा तो एकजिनसी नाहीय. तो सगळ्या जाती आणि धर्मांमधून आलेला आहे. स्थूलमानाने १९६० ते १९९० या काळाला एक प्रकारे संक्रमणाचा काळ म्हणता येईल. साठीच्या दशकापर्यंत लेखक आणि समीक्षक प्रायः एकाच वर्गातून येत. ते काही समकक्ष जातींतले असत. याचा एक फायदा असा होई, की लेखनाची समीक्षा तुलनेने सुलभ होई. साठनंतर हे चित्र बदलू लागले. लेखक अठरा पगड जातींतून येऊ लागले आणि प्राध्यापक/समीक्षक मात्र आधीच्या पिढीतले आणि जाती-वर्गांची पार्श्वभूमी असलेले राहिले. हा त्यांचा दोष नव्हे. पण त्यांना हे नवे उन्मेष समजून घेणे कठीण होऊ लागले. वाङ्मयीन नियतकालिकांना या नव्या लेखनाला जागा देता येणे कठीण होऊ लागले. संपादकसुद्धा काही अंशी गोंधळून जाऊ लागले. प्रा. रा. ग. जाधव एकदा म्हणाले होते, की १९७५ नंतरच्या कादंबरीला समीक्षकच नाहीय, ते अगदी खरे होते. त्याची कारणे या संक्रमण काळात शोधावी लागतात. जे नवे, वेगळे येत होते त्याच्या पार्श्वभूमीशी बव्हंशी समीक्षकांचा परिचयच नव्हता. त्यांना कसा दोष देणार? आपण फार कप्पेबंद लोक होतो. अजूनही आहोत. पण हळूहळू परिस्थिती पालटत गेली आणि जात आहे. विविध जातींतून आलेले समीक्षक लिहू लागले. आज असे आहेतच, पण ते पुरेसे नाहीत.

हे असे जातीय पद्धतीने मांडणे उचित नाही हे सरळच आहे. दुर्दैवाने आपल्या आजच्या मध्यमवर्गाचे हे सगळ्यात मोठे दुखणे आहे. आजचे आपले लेखक आणि समीक्षक घोषित पातळीवर काहीही म्हणत असले तरी त्यातल्या बर्यांचजणांना आपली मुळातली जात विसरता येत नाही, आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे फक्त साहित्याच्या दुनियेतले दुखणे आहे असे नाही. हा एकूणच आपला रोगट सामाजिक वसा आहे. हल्ली जे मराठा विरुद्ध दलित आणि ब्राह्मण असे चालू आहे ते त्याचेच प्रतीक आहे. म्हणजे हेच फक्त आहे असे नाही. याच्या आधी आणखी वेगळे होतेच. कोणत्या ना कोणत्या प्रकारे असे दुकानदारीचे काही तरी चालू असतेच. राजकीय आणि सामाजिक लाभांसाठी काही प्रवृत्ती ही अस्त्रे वापरत असतात आणि भले भले ज्ञानी लोक त्याला बळी पडतात.

साहित्य हे समाजात घडत असल्याने त्यात आणि त्याच्या व्यवहारात त्याचे प्रतिबिंब पडणार हे सरळच. साधारणतः १९८०च्या सुमाराचा एक अनुभव सांगतो : मी त्या वेळी एक वर्षासाठी एक फेलोशिप मिळवून पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागात काही संशोधनाचे काम करत होतो. रावसाहेब कसबे आणि मी संगमनेर कॉलेजातले सहकारी आणि मित्र. त्या काळी प्राध्यापकांना पगार फार कमी असे आणि ते सारे अनियमित असे. कित्येक प्राध्यापक अगदी केस कापणेसुद्धा उधारीवर करत. तीन-तीन महिने पगार होत नसे. खिशात खडकूही नसणे असे बर्यारचदा असे. मार्ग काही ना काही निघतच. कसबे यांचे त्या काळात उत्तम नाव झालेले होते. त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रणे असत. पुण्यात असे निमंत्रण असले की रावसाहेब मला आवर्जून सोबत नेत. त्या काळात अनेक दलित नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांच्या सोबत सामिष भोजन-प्राशन यांचा मनसोक्त आनंद मी रावसाहेबांच्या सोबतीने घेतलेला आहे. अशाच एका आय.ए.एस. अधिकार्याकच्या घरी एकदा ते मला घेऊन गेले. ते निवृत्तीच्या जवळ पोहोचलेले सुखवस्तू असे गृहस्थ होते. त्यांची पत्नी डॉक्टर, एम.बी.बी.एस. झालेली होती. त्यांच्या कामाच्या क्षेत्रापल्याड त्यांचे वाचनही उत्तम होते/असावे. त्यांच्याकडे उत्तम प्रतीची मदिरा होती. सरंजाम मांडला जात असतानाच रावसाहेब म्हणाले, हे माझे मित्र (अर्थात अस्मादिक) काळ्या अमेरिकन लोकांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. यावर ते गृहस्थ आनंदित होऊन म्हणाले, फारच छान! मीही ते थोडेफार वाचले आहे. काहीच कल्पना नसल्याने मी चमकलो. रावसाहेबांना या गृहस्थाशी चर्चेत फारसा रस नाहीय आणि मी किल्ला लढवायचा आहे, अशी हिंट मला मिळाली. कारण पूर्वानुभव. सुदैवाने मी रिचर्ड राइट, राल्फ एलिसन, जेम्स बाल्डविन या लेखकांचे लेखन वाचलेले होते. रावसाहेबांना एलिनॉर झेलिएट यांनी काही पुस्तके भेट दिलेली होती, त्यात हे लेखक होते. त्यांच्याकडून घेऊन मी हे लेखक काही प्रमाणात वाचलेले होते. साहजिकच मी त्याविषयी बोलू लागलो. रावसाहेबांचे निवांत चालू होते. त्या गृहस्थांचे लक्ष नाहीय असे पाहून मला डिवचण्यासाठी ते सूक्ष्म स्मित माझ्याकडे फेकत होते. मी अडकलो होतो आणि किल्ला लढवत होतो. त्या गृहस्थांना अमेरिकन ब्लॅक लिटरेचरविषयी फार माहिती नसल्याचे हळूहळू स्पष्ट झाले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी अधिकारवाणीने बोलत राहिलो. इतक्या उत्तम मदिरेचा फुकट आस्वाद हा मुद्दा होताच. दोनेक पेग झाल्यावर जसे होते तसे होऊन विषय फ्लुइड होऊ लागले. एका क्षणी ते म्हणाले, आपले लोक नोकरशाहीत फार कमी आहेत. अधिकारी तर आणखीनच कमी. ब्राह्मण संख्येने ७-८ टक्के, पण त्यांचे अधिकारी ९५ टक्के. देश चालवतो कोण, आम्ही अधिकारीच चालवतो. मी त्यांना म्हणालो, तुम्ही ९० टक्के असा, पण १० टक्के जागा आमच्या लोकांना, म्हणजे आपल्या लोकांना द्या. बाकीच्यांना घुसून द्यायचंच नाही. तुम्ही आणि आपण मिळून हा देश चालवू. काय, पटतं की नाही? असं म्हणून त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. मीही दिली. पर्यायच नव्हता. तिथून परतल्यावर रावसाहेब हसत म्हणाले, मस्त गेली रे संध्याकाळ! खाणं-पिणं फर्स्टक्लास! काय किल्ला लढवलास यार तू! फार बोअर होता तो माणूस. मानलं तुला! आणि सगळ्या पातळ्यांवर जातीच्या भानगडींमधून आपली सुटका नाहीय याचं ज्ञानही झालं. सालं, फुकटात इतकं काय कमी आहे?

हे प्रातिनिधिक आहे. एका जातीचे लोक एकत्र आले की मोकळेपणा येतो. आपल्या जातीच्या भल्याच्या गोष्टी बोलता येतात. अनेक जातींचे एकत्र येतात तेव्हा उदारता आणि सामंजस्य. आपण सारेच असे या ना त्या प्रकारे वेळ साजरी करीत असतो. हे ढोंगीपण आहे. मी त्याला अपवाद कसा असेन? एक फार तर म्हणेन. मी आता पासष्टी ओलांडलीय. जात, धर्म, वंश यांच्या मूर्ख अभिमानातच मी जन्माला आलो; पण मी हळूहळू शिकत गेलो. स्वतःला प्रश्न विचारत गेलो. यातलं काहीही आता माझ्या मनात उरलेलं नाहीय. म्हातारपणी देव देव करायला लागणार्यार माणसांचं मला आश्चर्यच वाटतं. अर्थात एक लिहिणारा माणूस म्हणून त्याचाही अर्थ लावणे, त्याची मीमांसा करणे मला आवश्यकच आहे.

एक बरे आहे. अशी ढोंगी पिढी आता म्हातारी होत चाललीय. असे ढोंगीपणाने वागणे ही कदाचित त्या काळाची गरजही असेल. मनातल्या जाती पुसल्या जाण्याचा तो संक्रमणाचा काळ असेल. आता जाती तितक्या कोणी मानत नाहीत. शहरात त्या तितक्या उरल्या नाहीत. म्हणजे व्यवहारात. पण आजही त्या मनातून गेल्यात का? ब्राह्मण मुलीशी प्रेमविवाह करून आयुष्य तिच्यासोबत घालवलेला एक कार्यकर्ता मित्र म्हणाला, ‘अहो, मी देशमुख आहे. शहाण्णव कुळी मराठा!’ का? एवढं आयुष्य जगूनही? अगदी काल पेपरात वाचलेली बातमी : एका हिंदू माणसाशी प्रेमविवाह करून दुबईत राहत असलेली मुसलमान स्त्री. तीन लेकरांची आई. ती फेसबुकवर इस्लामिक स्टेटसाठी हिंदी तरुणांना रिक्रूट करायचा उद्योग उत्साहाने करत होती. काय होतंय काय? जात, धर्म सोडूनही तो सुटत का नाही? आपण हिंदुस्तानी लोक. जगातले यच्चयावत धर्म आणि मानवी वंश इथे आहेत, खास आपली निर्मिती असलेल्या जाती आहेतच; पण याच्या सोबतीने सहिष्णुता नावाची गोष्टही आपल्याला लाभलेली आहे. म्हणून तर इतक्या विविधतेत आपण एकत्र राहिलो आणि टिकलो आहोत. ज्या गोष्टींच्या गरजा संपतात त्या नाहीशा होतात. जातींच्या गरजा संपत चालल्या आहेत, पण त्या आपल्या मनातून जात नाहीत. लेखकांना हे सगळे अत्यंत कोमल औदार्याने आत्मसात करून आपल्या लेखणीचा स्वर लावता आला पाहिजे. त्याला आपला सहिष्णुतेचा वारसा आपल्या मनाच्या गाभ्याशी आणता आला पाहिजे, तरच चांगले काही त्याला लिहिता येईल. हल्लीचे एक समीक्षक म्हणतात, मराठीत चांगली जातीयवादी कादंबरी नाहीय. म्हणजे काय? जातीयवादी कादंबरी चांगली कशी असू शकेल? मराठीत चांगले समीक्षक पुरेसे नाहीत. 

साहित्यातील कप्पेवारी क्षीण होतेय

तरुण लेखकांविषयी मी आशावादी आहे; आणि हा माझा आशावाद खुळचट आणि भंपक नाहीय. जातीच्या भानगडींच्या पल्याड गेलेले अनेक तरुण लेखक मला दिसतात. गट-तटांच्या गोष्टी तरुण लेखकांच्या मनातून हटत चालल्या आहेत. लेखक आपल्या काळातल्या त्याला चुकीच्या वाटणार्यात धारणांचा प्रतिकार करत असतो. लिहिणे हे त्यासाठीच असते. चांगले, टिकणारे, काळाच्या अतीत होण्याची क्षमता असलेले लेखन अशा प्रतिकारातून आणि दुःखाच्या सहिष्णू आंतरिकीकरणातूनच प्रकट होऊ शकते. समाजाची बांधणी, पुनर्बांधणी करणे हे कदाचित लेखनाचे थेट उद्दिष्ट नसेलही, पण तो त्याचा एक श्रेष्ठ अनुषंग असू शकतो.

आज साहित्याची दलित, ग्रामीण, नागरी, स्त्रीवादी, शहरी, महानगरी अशी विभागणी क्षीण होत चालल्याचे मला दिसते. या चळवळी भरात होत्या तेव्हा त्यांचे गटही होते. ते स्वाभाविक म्हटले पाहिजे. आणि त्यातून प्राध्यापक-समीक्षकांची सोयही होत असे. पण होतेय काय, की काही एका समाजगटाचा किंवा वाङ्मयीन भूमिकेच्या समूहाचा, त्यांच्या म्हणण्याचा स्वीकार वाचक करतो आहे, त्यांना गंभीरपणे घेतो आहे असे दिसले की चळवळी थंडावतात. किंवा खरे तर लिहिणारे सगळेच लोक आपल्या तरुण वयात आपल्यासाठी जागा करून घेण्यासाठी काही वाङ्मयबाह्य प्रयत्न करत असतात. त्यांना तशी जागा मिळाली की ते शांत होतात. लेखकाचा लेखकराव होण्याचा रस्ता मोकळा झाला की धामधुमीची गरज संपते. हे असे सगळे लेखक सर्रास करतात असे नव्हे, पण बरेच करतात; आणि त्यात गैरही काही मला दिसत नाही. कारण नंतर ते टिकणार असतात ते त्यांच्या लेखणीच्या बळावर. साठी, सत्तरी आणि ऐंशीच्या दशकात लेखकांच्या समूहांनी अशी जागा करण्याचे प्रयत्न केले, हे जरासे वेगळे होते. नव्वदीच्या दशकात काही स्वतःला महानगरी म्हणवणार्याा कवींनी धामधूम केली ती छानच होती. हल्ली चळवळींचे आवाज क्षीण झाले आहेत, पण लेखन सगळ्या समाजगटांमधून येत आहे आणि जे चांगले असेल त्याला मान्यता मिळण्याचा रस्ताही बर्याचपैकी खुला झाला आहे.

अकरा कोटींच्या महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत आणि त्या समृद्ध आहेत. त्यांचा वसा पुरेसा साहित्यात आलेला नाहीय. त्यांच्या येण्याने मराठी साहित्य अधिक मराठी होत राहील. त्याला थोडा विरोध होताना दिसतो. म्हणजे असे, की काय हे खेड्यांतले लोक लिहिताहेत, ती भाषा कळत नाहीय, या प्रकारचा. तो अर्थातच चुकीचा आहे. आणि खेड्यांची पार्श्वभूमी असलेल्या लेखकांनी बोलींचा वापर करून सघन लिहूनच त्याला उत्तर द्यावे लागेल; आणि ते आज होताना दिसत आहे. एका चर्चेत मुंबईत जन्मलेल्या-वाढलेल्या एक महत्त्वाच्या लेखिका सहजभावाने म्हणाल्या, तुम्ही लोक बोली अवश्य वापरा, पण आवश्यक तिथे शब्दांचा प्रमाणभाषेत अर्थ द्या. त्यांना मला सांगावे लागले, की प्रमाणभाषेत त्यासाठी शब्द नाहीय म्हणून तर तो बोलीतले शब्द वापरतोय. ते शब्द त्या वातावरणाचा भाग आहेत आणि ते मराठी शब्द आहेत. ते तुम्हाला समजावून घ्यावेच लागतील. त्यामुळे तुमचे मराठीपण अधिक समृद्ध होईल. ते करायचे की नाही, हा फार तर प्रश्न होऊ शकतो. आणि ते ज्याचे त्यालाच ठरवावे लागेल. त्यांना बहुधा माझे म्हणणे पटले असावे. 

गेल्या काही वर्षांत खेडी, शहरे, निमशहरे फार वेगाने बदलत आहेत. माध्यम क्रांती, संपर्कांच्या सुविधा आणि साधने, व्यक्त होण्यासाठीची व्यासपीठे या सगळ्यात आणि सगळ्यामुळं झपाट्याने बदल होताहेत. कप्पे नाहीसे होताहेत. प्रश्न निर्माण होतच आहेत, आणि तेही स्वरूपाच्या अंगांनी प्रत्यही बदलत आहेत. प्रत्यही बदलत्या अल्पजीवी चपळ वास्तवाचा वेध घेताना कप्पे कसे उरणार? त्यांची फोलकटे होण्याच्या मार्गावर आहेत. आता सदानंद देशमुख, जी. के. ऐनापुरे, मकरंद साठे यांना अनुक्रमे ग्रामीण, दलित, शहरी (की ब्राह्मणी?) लेखक कोणी म्हणत नाहीत. हे महत्त्वाचे लेखक आहेत असेच म्हणतात. पूर्वी पेंडसे, दळवी, खानोलकर यांना प्रादेशिक लेखक म्हणत. खरे म्हणजे त्यांच्या साहित्यातला प्रदेश हा त्यांच्या मनातला अधिक होता. आज खर्याय अर्थाने कोकणी माणूस, त्याचे जगणे, त्याचे प्रश्न, मच्छीमारांचे जग, दशावताराचा खेळ अशी दुनिया पहिल्यांदाच अस्सलपणे साहित्यात आणणार्याय प्रवीण बांदेकरांना कोणी कोकणी किंवा प्रादेशिक लेखक म्हणत नाही. प्राध्यापक मंडळी आणखी काही काळ विद्यापीठात त्यांच्या अभ्यासक्रमात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य अशा गोष्टी कदाचित ठेवतील, पण तेही उत्तरोत्तर त्यांना कठीण होत जाईल. काळासोबत त्यांना आणि त्यांच्या अभ्यासक्रमांना बदलावेच लागेल. 

साहित्याची दुनिया बदलत आहे. ती अधिकाधिक सर्वसमावेशक अंगाने मराठी होत आहे. सगळीकडच्या आंग्ल माध्यमाच्या पुरस्कारामुळे नवा मराठी वाचक निर्माण होण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. पण अशा मुष्किलीतही नवा मराठी लेखक घडतच राहील. कारण फार लोक काही लेखक नसतात आणि सगळेच लेखक श्रेष्ठ लेखक नसतात. आंग्ल माध्यमात शिकलेल्या किरण नगरकर यांनी आपली पाहिली कादंबरी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ मराठीतच लिहिली. ते साहित्य मराठी पाठ्यपुस्तकाबाहेरचं होतं आणि म्हणूनच प्रमाण मराठीत भर घालणारंच होतं. सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला मराठीत लिहिलेली ती भारतीय कादंबरी होती. मराठी भाषेने आपल्या काही हजार वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात पुष्कळ गोष्टी पचवलेल्या आहेत. ही भाषा आपल्याला सहजी सोडणारी नाहीय. आपले रांगडेपण, स्पष्टवक्तेपण, आपल्यातला खोट्या नम्रतेचा अभाव ही मराठी स्वभावाची सामूहिक वैशिष्ट्ये आहेत. आणि ती आपल्या भाषेत मुरलेली आहेत. आपले मराठीपण आपल्याला खेचून या भाषेत धरून ठेवील याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका नाहीय.

– रंगनाथ पठारे

rangnathpathare@gmail.com

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment