राजेश खन्ना : पहिला सुपरस्टार
पहिला… १८ ०७ १९
देव आनंद, राजकुमार आणि काका यांच्यात उतारवयात चित्रपट आपटणं एवढंच साम्यं नव्हतं तर सगळे स्वतःच्याच् प्रेमात इतके बुडाले की पडद्यावरचं पात्रं काय आहे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही, हे ही होतं. राजकुमारला चित्रपट आपटला म्हणून नवीन मिळाला नाही असं मात्र झालं नाही, दिग्दर्शकाला सहन होईपर्यंत तो चित्रपटात येत राहिला. देव आनंद इथलं इथेच वाटून टाकूयात या थोर विचारसरणीमुळे पदरमोड करून स्वान्तसुखाय चित्रपट काढत राहिला. हास्यास्पद कथानकं, नवीन जत्रा आणि देव आनंद येत राहिले. आर्थिक प्राप्तीपेक्षा आपण अजूनही देखणे दिसतो, हिरो आहोत या समाधानासाठी त्याने ते पैसे खर्च केले असावेत. मनोजकुमार देशभक्ती दाखवायचा पण हिरोईनला एकदा पवित्र करून घेतल्यासारखी पाण्यातून काढायचाच, देव आनंद कथेची मागणी म्हणून ते करायचा. त्याच्या एका चित्रपटात कोडवर्ड असलेली खूण त्या हिरोईनच्या मांडीवर असते म्हणजे मागितला कोडवर्ड की कर झगा वर आणि दाखव. असो! तर उरला काका उर्फ जतीन खन्ना
पासष्ठ सालच्या स्पर्धेत दहा हजारात निवडलेले आठ अंतिम फेरीत होते. सुभाष घई आणि धीरजकुमार पण त्यात होते, खन्ना विजेता ठरला. आठमधे ह्या बाकीच्या दोघांना कुणी निवडलं हा एक प्रश्न आहेच. स्पर्धेच्या आधी ठरल्याप्रमाणे त्याला ‘आखरी खत’ आणि ‘राज’ मिळाले. ‘इत्तेफाक’ पण त्यामुळेच मिळाला. वहिदा रहमानने त्याचं नाव सुचवलं होतं ‘खामोशी’साठी. खन्नाचे आधीचे सिनेमे बघाल तर त्यात बुजरा, लाजाळू, कमीत कमी हातवारे करणारा दिसेल. तो देखणा होताच. ‘राज’मधे बबितासमोर तर तो खूपच बुजरा वाटलाय. चांगला डायरेक्टर असला की तो मन लावून काम करायचा. ह्रषिदांकडे ‘आनंद’, ‘बावर्ची’, ‘नमकहराम’, जे.ओमप्रकाशकडे (राकेश रोशनचा सासरा-तो अ पासून सिनेमे काढायचा) ‘आखिर क्यों’, ‘अगर तुम ना होते’, ‘आप की कसम’, बी.आर.चोप्राकडे ‘इत्तेफाक’, शक्ति सामंतकडे ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘कटी पतंग’, यश चोप्राकडे ‘दाग’, साउथचा ‘हाथी मेरे साथी’ चांगले होते. ‘आराधना’ आला आणि पत्रकारांनी त्याला सुपरस्टार पदवी देऊन टाकली. हा सिनेमा चालला नाही तर गाशा गुंडाळण्याचं पक्कं केलेला किशोर पण मग इथेच राहीला. आरडी, किशोर आणि खन्ना हे त्रिकूट राज्य करून गेलं.
ऐकणीय गाणी, किशोरचा आवाज, लाडंलाडं बोलणारी हिरॉईन, माफक क्रूर खलनायक, प्रेमाचा त्रिकोण या कोंदणात तो हि-यासारखा शोभायचा. मारामारी वगैरे त्याचा प्रांत नव्हताच. ‘आन मिलो सजना’मधे तो विनोद खन्ना समोर मारामारीत हास्यास्पद वाटला. त्याचे हातवारे लोकांना आवडायला लागले आणि मग त्याला वाटत गेलं की हेच आपल्या यशाचं कारण आहे, काळ बदलत गेला तरी ती तेच तेच करत राहिला. अभिनयाचे मापदंड बदलले हे त्याच्या लक्षात आलं नाही किंवा त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं असावं. सलग यश मिळू नये यासाठी. मधे मधे आपटी खाल्ली की माणूस चुका शोधतो. पोरींच्या रांगा लागायच्या, चित्रपट हिट होत होते, तो म्हणेल त्याला मान तुकवली जात होती, मग त्याच्या -हासाची सुरवात झाली. तो घरचा श्रीमंत होता चित्रपटात यायच्या आधीच त्यामुळे आर्थिक यश डोक्यात जाणं शक्य नव्हतं. मुली त्याला रक्ताने पत्र लिहायच्या, दुधाची तहान ताकावर भागवावी तशा त्याच्या गाडीचे मुके घ्यायच्या. आपणच एकमेवाद्वितीय असं त्याला वाटायला लागलं.
बच्चनचा उदय खन्नाला संपवून गेला. त्र्याहत्तरला ‘नमक हराम’ आणि ‘जंजीर’ आले. पंचाहत्तरला ‘शोले’ आणि ‘दीवार’. पहिल्यांदा ‘दीवार’साठी खन्ना आणि नवीन निश्चल (आई वैजयंतीमाला) अशी स्टारकास्ट कुठल्या दरिद्री क्षणी सुचली असावी? खन्ना त्यात असता तर ‘दीवार’ ग्रेट ठरला असता का असा मला कायम प्रश्नं पडत आलाय. मारामारी, त्वेष, अभिनयाचे विविध प्रकार हा त्याचा प्रांत नव्हताच. तरीही राखीच्या मते तो बच्चनपेक्षा व्हर्सेटाइल होता. छान दिसणे, गाणी म्हणणे, हातवारे, प्रेमकथा आणि स्वप्रेम हेच त्याच विश्व होतं. प्रसिद्धी मिळवणं सोपं एकवेळ पण ती डोक्यात न जाऊ देणं, पाय जमिनीवर ठेवणं मोठं अवघड काम. मुमताझ त्याच्या शेजारीच रहायची. अत्यंत सामान्य वकुबाचा तिचा भाऊ रुपेशकुमार हा काकाचा मेन चमचा. त्याने काकाच्या इगोला खतपाणी घातलं. ‘पापे, तुस्सी ग्रेट हो’, बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळत होतं पण त्याने खिडकी आक्रसून घेतली आणि आकाशाचा छोटा तुकडाच बघायला सुरवात केली. एका रात्रीत तुम्ही फलंदाज किंवा गोलंदाज यांची शैली बदलू शकत नाही. काकाचं तेच झालं. तो शैली बदलायला गेला पण हास्यास्पद झाला.
‘फिफ्टी फिफ्टी’, ‘छैला बाबू’, ‘सौतन’, ‘उंचे लोग’, चोप्राचा ‘अवाम’ अगदी टुकार. उतार वयात ‘अवतार’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘आज का एम्.एल.ए.रामअवतार’ हे जरा बरे सिनेमे होते पण साउथचा ‘मास्टरजी’ आणि जितेंद्रच्या जोडीने केलेला ‘मकसद’ मात्र अधोगतीचं पाउल होतं. दूरदर्शनवर आलेल्या मालिकेत त्याचा चेहरा बघण्यापलीकडे सुजरट झाला होता. डिंपलशी त्याने थ्रिल किंवा ब्रेकिंग न्यूज म्हणून लग्न केलं होतं म्हणे. ‘बॉबी’ रिलीज व्हायच्या आधीच तिने लग्न केलं. त्यात प्रेम वगैरे प्रकार नव्हताच. अंजू महेंद्रू, टिना मुनिम आणि रुपेशकुमार व असंख्यं चमचे त्याच्या जीवनात आले आणि गेले. त्याच कुणाशी पटणं शक्यच् नव्हतं, डिंपलचा बरोबरचा संसार मोडला गेला. मग तो अजूनच् कोषात गेला. खासदार झाला, पण तो त्याचा प्रांतच् नव्हता. अमिताभनी जे जे केलं ते करायला गेला आणि अजूनच् खचला. आपल्याला जे येतं ते आपण करावं. अपयश आलं म्हणून दुसरा करतो ते जमत असेल तर करावं नाहीतर ते हास्यास्पद ठरतं.
त्याला प्रचंड यश मिळालं पण ते त्याला टिकवता आलं नाही, अपयश, सद्दी संपल्याचं त्याला मान्यं झालं नाही. त्याच्या शेवटच्या फॅनच्या जाहिरातीत पण तो त्याचं शल्य बोलून गेला – ‘मेरे फॅन्स् मुझसे कोई नही छिन सकता, बाबू मोशाय’. केविलवाणं होतं फार ते. बाबू मोशाय कधीच पुढे निघून गेला होता, पाय जमिनीवर असल्यामुळे तो आभाळाएवढा उंच होत राहिला आणि खन्ना अजूनच खचत गेला. ‘बावर्ची’च्या सेटवर बच्चन जयाला घ्यायला जायचा तेंव्हा खन्ना मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा, बोलायचासुद्धा नाही. एके दिवशी जयाने त्याला सुनावलं म्हणे, ‘बघशील, एक दिवस हा मोठा स्टार होईल’. घोळक्याची सवय असलेला काका शेवटी एकाकी उरला. दुर्दैवाने असो वा स्वकर्माने आलेलं असो, उतारवयातलं एकाकीपण फार वाईट. खन्ना गर्तेत सापडल्यासारखा त्यात अडकला आणि संपला.
अनेकजणांनी दहा हजार धावा पूर्ण केल्या, सुनील सगळ्यात पहिला. क्रमांक खाली सरकत राहिला म्हणून त्याचं पहिलेपणाचं महत्व कमी होत नाही. तसे नंतर सुपरस्टार झाले तरीही खन्ना पहिला सुपरस्टार. त्याच्या अभिनयक्षमतेबद्दल वाद असू शकतो पण तो निर्विवाद पहिला सुपरस्टार होता. त्याला जाऊन आज सात वर्षे झाली.
जतीन खन्ना, आमच्या आयुष्यात तू काही `आनंदा`चे क्षण दिलेस हे मात्र आम्ही विसरणार नाही, एवढं निश्चित.
– जयंत विद्वांस याच्या वॉलवरून साभार.
*****
लवकरच आपल्या भेटीला