चौक आणि चौकट
लालसर रंगाच्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा गरुड, त्याखाली एक चौरस त्यात हिरवा, लाल, जांभळा अशा रंगांच्या छटा, फटकारे… काहीसं अब्स्ट्रॅक्ट .. पांढऱ्या व काळ्या अक्षरात पुस्तकाचं शीर्षक.. ‘ चौक आणि चौकट ‘. प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि त्यांचाच ब्लर्ब.. आणि कवी म्हणजे चक्क जाहिरात क्षेत्रातले मोठे नाव,कमर्शियल आर्टिस्ट अनंत खासबारदार…!ज्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो बनवला, भालचंद्र नेमाडे यांच्या ‘चांगदेव चतुष्ट्य’ ची मुखपृष्ठं बनवली असे प्रतिभावंत चित्रकार..
पॉप्युलर या विख्यात प्रकाशनसंस्थेने काढलेल्या या संग्रहात एकूण १०८ पृष्ठे व तितक्याच कविता आहेत. राष्ट्राला अर्पण केलेल्या या संग्रहात दुसऱ्याच पानावर
निसटून जातो जसा पारा
तसा जगलो रोज इथे
झूल रोज नवीच तरीही
मागत गेलो दान इथे
या ओळी आपले लक्ष वेधून घेतात आणि एकूणच कवितांची जातकुळी लक्षात येते. जगणेच पाऱ्यासारखे असल्याने ते शब्दात पकडणे अशक्यच.. जगताना पांघराव्या लागलेल्या झूली रोज नव्याच असल्या तरी दान मागणे जुनेच आहे. वेगवेगळ्या भूमिका निभावताना साकल्य आणि साफल्याचे दान मागत राहण्याचे भागधेय ठरुन गेले आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारी, आत्मशोधाच्या वाटेने जाणारी ही कविता आहे.
हा अर्थ लावताना वारशात मिळालेल्या संचितांचा अन्वय लावताना ‘त्या ‘ शक्तीशी संवाद होतो.. एवढे सगळे असूनही ओढ लागली आहे ती हव्यासपलीकडचे मिळवण्याची.. त्यामुळे साधने हाताशी असूनही काहीच सापडत नाही अशी अवस्था झाली आहे, हे सांगताना कवी प्रार्थना करतात –
आता जे हवंय, हव्यासापलीकडचं
तेही तूच दे…
या पसाऱ्यात हरवलेली एक जागा;
तुला भेटण्याची… शांतपणे (पृ.१)
जगाच्या पाठीवर अगतिक, दुर्बल जीव आढळतात. पाण्याअभावी सुकलेले झाड ; तहानलेले जीव;पाणी ताब्यात असलेल्या बलदंड आसाम्या;चिरडले जाणारे चिमुकलो जीव;रुग्ण शय्येवरच्या अगतिक रुग्ण आणि ज्यांच्यासाठी आपण परके आहोत अशा सर्वसामान्यांसाठी कवी प्रार्थना करतात. ज्यांच्यासाठी प्रार्थना करणारे कुणीच उरलेले नाही अशा सर्वांसाठी काहीच करता येत नसेल तर किमान प्रार्थना करायची बांधिलकी मानणारा हा कवी आहे. संवेदनशीलता कमी झाल्याचे शल्य घेऊन, संवेदनांच्या काहूरात कवीने ‘ मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन ‘ ही कविता लिहिली असल्याचे जाणवते…
‘ जळालेले मंत्रालय ‘ ही कविता मागच्या शासनाच्या काळात मंत्रालयाला लागलेल्या आगीवरचे राजकीय परंतु भाष्य आहे –
जळालेल्या त्या साऱ्या फाइल्समधून एक कागद वाचला होता…
दूरवरच्या खेडेगावातून आलेला एक अर्ज तेवढा
उरला होता….
जळून गेलेल्या मुलीच्या खुनाची तक्रार..
किंवा पोट जाळता जाळता रस्त्याकडेला अपघातात
गेलेल्या म्हाताऱ्याचा तपास,
गावाबाहेर जळालेल्या वस्तीतले आक्रोश,
आणि फटाक्यांच्या फॅक्टरीच्या आगीत होरपळलेलं बालपण…
वणव्यात भस्मसात झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या…
आणि पेट्रोल माफियांनी जाळलेले देह,
कोणता तरी एक अर्ज जिवंत होता..
मंत्रालयावर नुकत्याच लावलेल्या राजमुद्रेतील
एक सिंह दुःखी होता..
द्दष्टी अधू असल्याने त्याने वाचला तो अर्ज…
अन् भिंतीवरची अक्षरं वरुन उलटी…
सत्यमेव जळते !
सामाजिक विषमता आणि राजकीय अनास्था यावरची सणसणीत चपराक खासबारदार ताकदीने लगावतात.
” त्या पहाटे ‘ या कवितेत पहाटेच्या तरलपणा सोबत एकाकीपणा ते चित्रित करतात. परस्परविरोधी मानसिक आंदोलनांना कवी खासबारदार खुबीने चितारतात. म्हणजे त्यांच्या कवितेत एकाच वेळी संवाद लय आणि विरोध लय आढळते. कधी हा संवाद स्वतःचा स्वतःशी तर कधी समष्टीशी चालू असतो. विरोध लय साकारताना ते स्वतःची अगतिकता भोवतालच्या कडूझार वास्तवाच्या पार्श्वभूमीवर मांडतात. सभोवतालचे दैन्य, दुःख, विपरीत वास्तव त्यांच्या संवेदनशील मनावर चरे उमटवते. या दृष्टीने त्यांच्या ‘भुकेचा श्लोक, ‘ ‘ वादळ भोवरा ‘ , ‘ दुःखाचे हुंकार ‘ , ‘ जुना डाग ‘ , ‘दुष्काळ ‘ , ‘स्तवनदरबारी ‘, ‘काँक्रीट जंगलात ‘ , ‘चिंता आणि चिता’,’मोनालिसा’, ‘ प्रहर ‘ अशा अनेक कविता दाखवता येतात.
ते चित्रकार असल्याने त्यांच्या कवितेतही हे रंग शब्दांच्या सोबत येतात. उदा. कविता व त्यातील रंग –
प्रार्थना – शुभ्र
शाप – आकाशी
जळालेले मंत्रालय – आग (नारंगी, पिवळा, लाल )
त्या पहाटे – शुभ्र
रंग – इंद्रधनुषी
सैरभैर – पांढरा, काळा, कर्दळी
भुकेचा श्लोक – पांढरा
काय करु -हिरवा
आठवणींचा नाग व शाई सती जाताना – शाई
कारखाना – लाल,निळसर व कळकट
‘ रंगीत सूज ‘ या कवितेत तर रंग आणि सेलिब्रेटींचा संबंध उलगडून दाखवला आहे. खासबारदार यांच्यातला चित्रकार दिसतो तो असा..
त्याचप्रमाणे कवीच्या अभिव्यक्तीचे दोन स्तर दाखवता येतात. एक जनभाषेचा स्तर तर दुसरा सूचकतेचा स्तर. जनभाषेच्या स्तरातील अभिव्यक्ती ही सर्वसामान्यांच्या भाषेत थेटपणे होते.तर सूचकतेच्या स्तरातील कविता प्रसंगी भयसूचन तर अर्थाच्या अनेक शक्यता अधोरेखित करताना दिसतात.पहिल्या प्रकारच्या कवितांमध्ये ‘सूर्य राहू दे तरी ‘,’हजार पावलांवर’,’काय करू’, ‘बायोडेटा’,’कारण..राजकारण..’सारख्या कविता दाखवता येतात.
कालच्या दि. २१ जून च्या मटाच्या अंकात हा लेख