पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष
आशिया खंडातील दोन नंबरचा विशाल वटवृक्ष
‘ नेर ‘ या शब्दाचा अर्थ होतो ‘गांव ‘. अहमदनगर जिल्हयातील ‘संगमनेर ‘ या तालुक्याच्या गावाच्या नावाचा अर्थ होतो – संगमावरील गाव. हे तालुक्या चे गाव प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
या तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट वनराईमुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. ऐतिहासिक
पेमगिरी किल्ला आणि महाकाय वटवृक्ष हा पेमगिरीकरांचा अमूल्य ठेवा आहे. भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे. त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो. सुमारे अडीच ते तीन एकरांच्या परिसरात या झाडाचा विस्तार झाला आहे. वाढलेल्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या, की त्यालाच मुळे फुटून नवीन झाड जन्म घेते. अशा शेकडो पारंब्या जमिनीत रुजून हा विशाल वटवृक्ष वर्षांनुवर्षे दिमाखात उभा आहे.
झाडात झाड वडाचे झाड! हा वंश वटवृक्ष. वंशवृद्धीसाठी या झाडाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, इतकेच नव्हे तर, या झाडापासून वातावरणात पसरणारी शक्ती व वायू यांचा शरीरावर परिणाम होतो म्हणूनही काही संस्कार-व्रते प्रचलित आहेत. सध्या हिरवळीचे खूप महत्त्व आहे. बागबगीचे, जंगले वाढवावीत असा खूप प्रचारही होतो आहे. परंतु लोकांच्या मनात झाडाच्या श्रेष्ठतेविषयी श्रद्धा वाढल्याशिवाय या उपक्रमाला खरी साथ मिळणे अवघड राहील. वटपौर्णिमेच्या पूजेसारखे उत्सव ( पण पुराणातले चमत्कार टाळून ) वैज्ञानिक पद्धतीने याचा प्रचार करून अवश्य वाढवावेत व पर्यावरणरक्षणाला मदत करावी. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे.
गवताची व दर्भाची पाती असोत, जंगलातील दोनदोनशे फूट वाढणारी झाडे असोत, झाडाच्या खोडातून अख्खी मोटर जाऊ शकेल एवढे मोठे खोड असलेली झाडे असोत किंवा वटवृक्षासारखे झाड असो, एकूण प्राणिमात्राची व जिवाची उत्क्रांती वनस्पतीपासून होते. वनस्पतीतील उत्क्रांती वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूर्ण झाली. पुढे सजीव, हिंडणारे-फिरणारे प्राणी सुरू होतील असे हे पूर्णत्व सुचविणारे वडाचे झाड.
वनस्पती सजीव असतात व त्यांच्यात प्राण असतो, पण त्या एकाच जागी राहतात. प्राण कार्यान्वित होऊन भूमीपासून अलग होणारे किंवा एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे प्राणी उत्क्रांत झाले याची गोष्ट समजावी म्हणून की काय, सावित्रीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीला प्राण देऊन जिवंत केले ही कथा प्रचलित असावी.
वडाचे झाड आयुर्वेदात खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. साल, मुळ्या, पारंब्या वगैरे वटवृक्षाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतो. नवांकुरांचा रस नाकात टाकायचा असो, एकूणच वीर्य वाढविण्यासाठी असो किंवा गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असो, वडाच्या झाडाचा उपयोग होतोच.
वडाच्या झाडाची एक गंमत अशी की ते लावावे लागत नाही. ते कुठे, कसे व केव्हा उगवेल हे सांगता येत नाही. वनस्पती लावा, हिरवळ लावा, वृक्षतोड थांबवा, सेंद्रिय शेती करा, अमुक खत वापरा, तमुक खत वापरू नका, जमिनीची मशागत अशी करा, अमुक प्रकारचे बियाणे वापरा असा खूप प्रचार झाला व त्याचे शिक्षण दिले तरी झाडे वाढवता येतीलच असे नाही. त्या उलट अचानक घराच्या भिंतीतून एक वडाचे झाड उगवलेले दिसते. वडाच्या झाडाची एक काडी नव्हे तर एक पान जरी जमिनीत खोवले तरी त्याचा वृक्ष होतो असे म्हणतात.
शेजारच्याच्या व आपल्या शेतजमिनीच्या सीमा नीट कळाव्यात म्हणून बांधावर वडाच्या फांद्या खोचल्या जातात. वडा-पांगाऱ्याच्या सरळ काड्या वापरून भाजीपाल्यासाठी लागणारा सुंदर मांडव उभारता येतो, शिवाय ह्या कामाला एक पैसाही खर्च होत नाही. मांडव उभारताना काड्या एकमेकाला बांधण्यासाठी वडाच्या पातळ पारंब्या उपयोगाला येतात. लावलेल्या वाळक्या काड्यांना पाने फुटून पुढे मोठी झाडे झालेलीही दिसतात.
पेमगिरीच्या वडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांनी जाखमतबाबा,जाखाई यांच्या मूर्ती आहेत. त्यामागे एक कथा आहे त्यामुर्ती मध्ये जाखमतबाबा, त्याची बहीण जाखाई,एक वाघ व एक कुत्रा आहे. गावकऱ्यांच्या तोंडून ऐकलं तर असं कळत की, “एकदा जाखमतबाबा तो शेळ्या चरायला न्यायचा तेव्हा त्याची शेळी वाघाने पकडली म्हणून त्या बाबाने त्या वाघाला ललकारलं त्यामुळे त्याच्यावर वाघाने हल्ला केला तेव्हा त्या जाखमतबाबाने आपल्या हातातली कुऱ्हाड वाघाच्या डोक्यात घातली अशी त्यांची झटापट पेमगिरी गडावरून खालपर्यंत येऊन थांबली तेव्हा सोबत असलेला कुत्रा त्या वाघाचे लचके तोडत होता संध्याकाळची वेळ असल्याने त्या जाखमतबाबाची बहीण जाखाई त्याला शोधत निघाली असता रक्ताच्या डागावरून ती वडापर्यंत येऊन पोचली व तिला दिसलं की भाऊ मृत्यमुखी पडला आहे तिला दुःख अनावर झालं आणि तिने हातातला पाण्याचा गडवा डोक्यात मारून स्वतः स्वतः प्राण सोडला” अशी कहाणी ह्या मूर्तीची. म्हणून आजही ह्या वडाखाली असलेल्या ह्या मूर्तीची लोक मनोभावे पूजा करतात.
भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे.
मात्र पेमगिरी येथील हा विशाल वटवृक्ष तीन एकरात पसरलेला असून त्याच्या अजून काही पारंब्या जमिनीला टेकून खोड बनण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्यांच्या जमिनीत हा वृक्ष आहे त्यांनी आपले उर्वरित शेत आता या वडासाठीच राखून ठेवले आहे.
संगमनेर पासून २४ कि मी अंतरावर हा वटवृक्ष आहे. शहाजीराजे, बाजीराव मस्तानीच्या वास्तव्याने प्रेरित झालेला प्रेमगड उर्फ शहागड उर्फ पेमगिरी च्या किल्ल्याच्या मागे हा सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा वड आहे. या वडाच्या बाजूलाच मोरदरा आहे.सीताफळाची विपुल झाडे असणारा हा परिसर आवर्जून पहावा असाच आहे.
– डॉ.सं ज य बो रु डे,
२१ अ , अमन, गोविंदपुरा, एकता कॉलनी, अहमदनगर,४१४००१.
मो.९४०५००० २८०