2021 फेब्रुवारी

मनोहर शहाणे : व्यक्ती आणि वाड्मय

सा हि त्या क्ष र 

शहाणे, मनोहर यांचा जन्म १ मे, १९३० रोजी झाला. वयाची जवळजवळ आठ दशके नाशकात काढल्यानंतर आज ८९ वर्षे वय असलेले शहाणे  पुण्यात स्थायिक आहेत. साठनंतरच्या काळातील मराठीतील ते एक महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार आहेत. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई- आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर शिक्षण घेता आले नाही. शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ‘क्रांती’ ही नाटिका लिहिली. नाटकांमध्ये भूमिका, नकला, जादूचे प्रयोग केले. हस्तलिखिते- मासिके चालविली. रेशनिंग खात्यात तात्पुरते काम सुरू असतानाच ‘पालवी’ मासिक काढले. ही धडपड पाहून ‘गांवकरी’त ‘मुद्रितशोधक’ म्हणून १९४९ मध्ये संधी मिळाली. पुढे साप्ताहिक ‘गांवकरी’ व दिवाळी अंकाचे ‘संपादक’ म्हणून जबाबदारी सांभाळली. 

१९५५- ५६ मध्ये डॉ. अ.वा.वर्टीं यांच्या समवेत ‘अमृत’ नियतकालिकाचे काम सुरू केले. मनोहर शहाणे यांनी ‘अमृत’चे ‘संपादक’ म्हणून भरीव योगदान दिले. मराठी, इंग्लिश व जागतिक वाड़्मयातील ग्रंथांनी त्यांचा मनःपिंड घडला. कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू जवळून पाहिल्याने शहाणे यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, हळवेपणा, तटस्थपणा आणि जीवन- मृत्यूविषयक असंख्य प्रश्न निर्माण झाले. यातून ते गंभीर लेखनाकडे वळले. माणूस, नियती, सुख- दुःखे व त्यांचा मानवी मनावर होणारा परिणाम यावर चिंतन सुरू झाले. “मनुष्य म्हणजे नियतीच्या हातातील बाहुले असून त्याचे अस्तित्व क्षुद्र आहे”, हा विचार त्यांच्या लेखनातून प्रकटला. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा सर्वसामान्य असून ‘तटस्थ’ता जिवंत, प्रत्ययकारी आणि भेदकतेमुळे साठोत्तरी काळात मराठी कादंबरी जीवनाभिमुख बनविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. 

मनोहर शहाणे  यांचे वाङ्मय विविधस्वरूपी आहे. कथा, कादंबरी, एकांकिका या प्रकारांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली. त्यांच्या अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. साठच्या सुमारास नाशकात सुरू झालेल्या ‘अनामिक वाड़्मय मंडळा’त सादरीकरणासाठी शहाणे यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार होऊन त्यांची पहिली कादंबरी ‘धाकटे आकाश’ (१९६३) आकाराला आली. जन्म- मृत्यू, वेड- हळवी प्रीती, कामप्रवृत्ती, आर्थिक दैन्य, आजारपण अशा मानवी जीवनातील विविध अटळ सत्यांचे प्रकटीकरण कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाचे मनोविश्लेषण चौकटीबाहेरचे व प्रभावी आहे. नवतेची अनेक लक्षणे या कादंबरीत असून ज्या लेखनामुळे तत्कालीन मराठी कादंबरी समृद्ध व प्रौढ झाली, त्यात ‘धाकटे आकाश’चाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. ‘झाकोळ’ (१९६५) या दुसऱ्या कादंबरीत पौगंडावस्थेतील मुलाच्या मनोवस्थेचा पट साक्षात झाला आहे. आर्थिक ओढाताण, वैचारिक संघर्ष, वैचारिक स्थित्यंतरे, मनोविश्लेषणाबरोबर दुसरे महायुद्ध, रेशन वस्तूंची टंचाई, काळाबाजार व राष्ट्रीय चळवळी या समकालीन घटनांचा पट कादंबरीतून सूक्ष्मतेने साकारला आहे. नायकाची स्व- जाणीव आणि परात्मता शहाणे यांनी एकाचवेळी लक्षणीयरित्या रेखाटलेली आहे. ‘देवाचा शब्द’ (१९६८) या कादंबरीत निपुत्रिक नायिका, तिचे जीवघेणे दुःख शहाणे तटस्थपणे रेखाटतात. विचार- अपेक्षा आणि नशिबाच्या पार्श्र्वभूमीवर मध्यमवर्गीय मूल्य स्वीकारातून निर्माण झालेली कोंडी आणि अस्वस्थतेचे प्रभावी चित्रण कादंबरीत आहे. नायिकेची असहाय्यता व दुःख परिणामकारक चित्रणातून कादंबरीतून नव- नैतिकतेचे प्रकटीकरण आहे.

‘पुत्र’ (१९७१) कादंबरीतून वडिलांचा धार्मिक देखावा आणि त्यामुळे कुटुंबीयांची झालेली वाताहत उपरोधिकपणे रेखाटलेली आहे. भावविवशता, सांकेतिकता आणि उपदेशप्रियता टाळत मध्यमवर्गीय जीवनातील कारूण्य उत्कटतेने त्यांनी मांडले आहे. उपरोधशैलीच्या दर्शनबिंदूतून या कादंबरीला नवी परिमाणे लाभतात. ‘ससे’ (१९७७) कादंबरीतून विकलांग ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या मुलीच्या ससेहोलपटीचे चित्रण आहे. ‘स्वतःचे जन्मदाते घरात नकोसे होणे’ ही आजच्या कुटुंबव्यवस्थेची सर्वांत मोठी शोकांतिका कादंबरीद्वारे समर्थपणे प्रकटली आहे. वृद्धत्वातील दुःख आणि त्याला लाभलेल्या दारिद्र्य पार्श्वभूमीमुळे कारूण्य उत्कट- प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त होते. ‘लोभ असावा’ आणि ‘एखाद्याचा मृत्यू’ या दोन लघु कादंबऱ्या १९७८ मध्ये आल्या. ‘लोभ असावा’मधून स्वप्न आणि वास्तवाचे अनेकमितींचे चित्रण आहे. बंगल्याचे स्वप्न बाळगणारा नायक व्यवहारात फसविला जाऊन स्वप्नभंगाचे आलेले अनुभव तो पत्रातून नेमकेपणाने मांडतो. हे आशयसूत्र संवेदनशील, हळव्या आणि वास्तवाचे भान असलेल्या दृष्टिकोनातून येते. मार्मिक, सूचक, भेदक आणि अंत:र्मुख करणारी ही कादंबरी चटकदार वाक्ये व मौलिक तत्त्वज्ञानामुळे वेगळी ठरते. ‘एखाद्याचा मृत्यू’मधून सर्वसामान्य व्यक्ती मेल्यावर प्रकटणारा उपस्थितांचा शोक, आपुलकी निरर्थक व दांभिक असल्याचा अनुभव व्यक्त होतो. उत्तरक्रिया लवकरात लवकर आटोपून मोकळं होण्यावरचा कटाक्ष भयाण अनुभूती देतो. नातेसंबंधातील ताणेबाणे- वाद यामुळे “मृत्यू म्हणजे मानवी जीवनाचे अंतिम- अटळ सत्य” असल्याचेच माणूस विसरून जातो, याची जाणीव ही कादंबरी देते.

‘इहयात्रा’मधून (१९८६) ‘आपण का जगतो आहोत’, असा प्रश्न पडल्यावर आत्मशोध घेत इतरांपासून तुटत जाणारा व स्वतःचे अस्तित्व गमावून बसणारा प्राध्यापक भेटतो. एकीकडे अस्तित्ववाद, दुसरीकडे टोकाचे आत्मकेंद्रीपण या दोन द्वंद्वांमध्ये तो समाजसंकेत व सामाजिक बंधने पाळण्यात कमी पडून मृत्यूच्या काठावर पोहोचतो. ‘आधुनिक कादंबरी’ म्हणून या कादंबरीकडे पाहता येते. ‘आरसे’ (१९९०) ही लघुकादंबरी वृद्ध आईसह नैराश्यात जगणाऱ्या अविवाहित नायकावर बेतलेली आहे. तो असंख्य प्रश्नांमध्ये अडकून सर्वांशी तुटक- विक्षिप्त व बेफिकीर वागतो. आत्मशोधाचे प्रतीक म्हणून वापरला जाणारा आरसा कादंबरीतून सुत्ररूपाने येतो. ‘संचित’ (१९९७) ही कादंबरी ब्लॅक कॉमेडी स्वरूपाची आहे. एका श्रीमंताचे विसंगत वर्तन, त्याचा मृत्यू, मृत्यूनंतर जमलेली गर्दी, गर्दीतील वाद- संवाद आणि मागे उरलेल्यांचे विविध प्रश्न यांतून मानवी जीवनाचे अस्तित्व व निरर्थकता अचूकतेने नोंदविलेली आहे. आधुनिकतेचा पेच मांडताना शहाणे त्याला भारतीय सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक वस्तुनिष्ठतेची जोड देतात. मात्र हे मांडताना रूढ- पारंपरिक साधने, तपशील व शैलीत नवनवे प्रयोग करत राहतात. लेखकाच्या अनुभवविश्वाची समृद्धता अभिव्यक्त करणारी ही कादंबरी आहे. एकाचवेळी परात्मता, आधुनिकता, अस्तित्ववाद आणि तात्त्विकता मांडणारी ‘नव- कादंबरी’ म्हणून ‘संचित’ मराठी कादंबरीत महत्त्वाची कादंबरी आहे. ‘उलूक’ (२००५) मध्ये श्रीमंत व्यक्तीला मृत्यूची चाहूल लागल्यावर अमर होण्यासाठीची त्याची चाललेली केविलवाणी धडपड, देवाचे मंदिर बांधल्यावर आपला मृत्यू होणार नाही, ही त्याची भावना फोल ठरून शेवटी येणारा मृत्यू. यातून गूढवाद- अस्तित्ववाद आणि मृत्यूविषयक गंभीर चिंतन प्रकटते. माणूस, त्याचा जन्म, त्याच्या जगण्याचे कार्यकारणभाव व धर्मकारण त्याच्या हातात नसते. आपले बाहुलेपण टाकुन तो स्वत:चे आकाश, क्षितिज निर्माण करू पाहण्याची शक्यता आणि त्यातून निर्माण होणारा अपरिहार्य संभ्रम यावर शहाणे समर्पक- मार्मिक- अभ्यासपूर्ण भाष्य करतात. 

मनोहर शहाणे यांनी कथालेखनही केले. त्यातून मनुष्यजीवन, सुख- दुःखे, प्रेम- प्रेमभंग, अस्वस्थता, दारिद्र्य, वेश्या/ भिकार जीवन, ज्येष्ठ नागरिक, मानवी मृत्यू असे गंभीर, भेदक व मार्मिक विषय हाताळले. शहाणेंच्या बहुतेक कथा मानवी जीवन व जगण्यातील, वर्तनातील अस्वस्थपण रेखाटतात. लेखनाची मर्यादा राखत बीभत्सरसाचे दर्शनही घडवितात. ‘शहाण्यांच्या गोष्टी’ (१९६१), ‘अनित्य’ (१९८७), ‘ब्रह्मडोह’ (१९९९) आणि ‘उद्या’ (२००८) या कथासंग्रहात मिळून एकूण पंचेचाळीस कथा आहेत. ‘आरोपी दादासाहेब देशमुख?’ (१९९९) हे नाटक आणि ‘तो जो कुणी एक’ (२००३) यातील चार एकांकिकांतूनही विविध विषय त्यांनी हाताळले. वैविध्यपूर्ण आविष्कारशक्तीचा प्रत्यय त्यांच्या एकांकिका देतात. नाट्यलेखनात ते भेदक, उपरोधिक व थेट संवादी शैली स्वीकारतात. दोन संवादांदरम्यानची जागा तपशिलांनी भरून काढत गरजेनुसार निवेदन करत गती राखतात. 

२००५ साली त्यांना अमेरिकेतून ‘महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळाले होते. शहाणे यांच्या एकांकिकांचे फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले. त्यांच्या ‘पुत्र’ नाटकास १९७८ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेची सर्व पारितोषिके मिळाली. ‘लिटिल मॅगझीन ऑफ इंडिया’ या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले.  तब्बल पाच दशके ‘अमृत’ या लोकप्रिय मासिकाचे संपादन केले.

मराठीतील प्रयोगशील गद्यलेखक म्हणून गेल्या सहा दशकांत विपुल साहित्यचिंतन आणि कसदार लेखन करणाऱ्या शहाणे यांनी लिहिलेल्या कथा- कादंबऱ्या- एकांकिका गंभीर, तात्त्विक व जीवनासंबंधीचे चिंतन करायला लावतात. वाचकांना स्तिमित करताना माणसाच्या एकूणच जगण्याचा व त्याच्या वर्तनाचा सखोल विचार करतात. मानवी जीवनाचा विविध अंगाने प्रामाणिक शोध घेत राहतात. त्यांनी लेखनातून असंगतता (Absuraity), अस्तित्ववाद (Existentialism), आत्मप्रीती (Narcissism), मृत्यू प्रेरणा (Death Drive), उपरोध (Irony) आणि परात्मता (Allination) मांडली. सहा दशकांत वैविध्यपूर्ण लेखन करून मध्यमवर्गीय – शहरी लोकांचे जगणे, समस्या अस्वस्थता आणि मनोवृत्तीचे प्रभावी चित्रण केले. मळलेली वाट नाकारून मानवी जगण्यातील अर्थ गांभीर्याने शोधला. शहाणे यांचे लेखन वास्तव, भेदक, प्रत्ययकारी, चिंतनशील व अधिक परिणामकारक असून साठोत्तरी वाड़्मयातील त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

डॉ. राहुल अशोक पाटील,

भ्रमणध्वनी: ९८९०८७२४२६

मेल: rpatil766@gmail.com

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment