नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ – डॉ.अरुण ठोके,नाशिक
‘स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एक अभ्यास’– नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ
– डॉ.अरुण शिवाजी ठोके
(मराठी विभाग प्रमुख,के. के. वाघ कला, वाणिज्य विज्ञानआणि संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी,ता. निफाड,जि. नाशिक E mail- arunthoke26@gmail.com
मोबा-९१७५१६४७९९)
प्रस्तावना:
‘स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एकअभ्यास’ (निवडक कवयित्रींच्या आधारे) या समीक्षात्मक ग्रंथाचे साहित्याक्षर प्रकाशन संस्थेकडून नुकतेच प्रकाशन झालेले आहे. प्रस्तुत ग्रंथात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांतील समकालीन कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा आशय व अभिव्यक्ती या दोन अंगांनी स्री जाणीवा व स्री संवेदनांसंदर्भात विचार करण्यात आलेला आहे. स्री जाणीवा समृध्द करणाऱ्या आशयसूत्रांचा शोध घेणे यासाठी समाजाशास्रीय, मानसशास्रीय व आदिबंधात्मक या समीक्षा पद्धतींचाअवलंब करण्याचा प्रयत्न रचना यांनी केलेला आहे.
आपल्या समाजात स्रीला दुय्यम मानण्याच्या धारणेमुळे रूढ झालेल्या परंपरांमुळे स्त्रियांच्या अभिव्यक्तीला फारसा वाव नव्हता. किंबहुना संत कवितेच्या परंपरेतही पुरुषांच्या तुलनेने कवयित्रींची संख्या फार कमी होती. ज्या संत कवयित्रींनी कविता लिहिल्या त्यांना फार कष्ट सोसावे लागले. संतकवयित्री जनाबाई, कान्होपात्रा व संत बहिणाबाई यांची उदाहरणे सांगता येतील. तरीही तत्कालीन समाजाला पुरोगामी दृष्टीकोन बहाल करण्याचे काम या कवयित्रींनी केले.
आधुनिक काळात मराठी कवितेत क्रांती झाली. केशवसुत ते मर्ढेकरी कविता,मर्ढेकरी कविताते साठोत्तरी कविता ही मराठी कवितेची वेधक वळणे आहेत. या वळणांवरही बोटावर मोजण्याइतक्याच कवयित्रींची कविता पुढे आली. स्रीवादी चळवळीच्या प्रभावातून स्रिया स्री जाणीवेच्या स्वतंत्र कविता लिहू लागल्या. ऐंशीच्या दशकात कवयित्रींच्या संख्येत बरीच वाढ झाली. नव्वदोत्तर काळात स्री जाणिवांचे प्रकटीकरण करणाऱ्या कवयित्रींची संख्या लक्षणीय आहे. आपल्याच काळात लिहिणाऱ्या प्रथितयश व नवोदित कवयित्रींच्या कवितांची दखल घेवूनत्यावर साधक बाधक चिंतन करण्यातून प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती झालेली आहे.
हा समीक्षाग्रंथ स्रीला‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला अर्पण करण्यात आलेला आहे. म्हणजेच रचना यांची भूमिका ही माणूसकेंद्री आहे. माणूस उभा करण्याचे, त्याच्या सृजनावर भाष्य करण्याचे, त्याला प्रेरित करून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करणे म्हणजे समीक्षा करणे होय. हे ज्यांना कळाले आहे त्या रचना यांचे लेखन अभिनंदनाला पात्र आहे.
या ग्रंथात एकूण १७ प्रकरणे असून सुमारे १५ कवयित्रींच्या प्रत्येकी १० निवडक कवितांचा म्हणजे सुमारे १५० कवितांचा विचार करण्यात आलेला आहे. या ग्रंथात नव्वदोत्तर स्रीकवयित्रींच्याकवितांचा प्रामुख्याने विचार केल्याने या अभ्यासाला नव्वदोत्तर कालखंडाचे संदर्भ प्राप्त झालेले आहेत. स्रीवादी चळवळीमुळे पाश्चात्य जीवनव्यवहार व साहित्यव्यवहारात परिवर्तन घडून आल्याचे निरीक्षण रचना यांनी प्रास्ताविकात नोंदविले आहे. या ग्रंथावर भाष्य करतांना त्यातील कवयित्रींच्या कवितांबाबत काही स्वतंत्र निरीक्षणे या ठिकाणी नोंदविण्यात आलेली आहेत.
डॉ. भाग्यश्री यशवंत यांच्या कवितांचे नेटके विवेचन करून रचना यांनी ठळक विशेष नोंदवले आहेत. सन १९९० नंतर वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात नवीन शोध लागले. हे नवीन शोधच स्रीभ्रुणहत्येस कारणीभूत ठरले. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले. एकीकडे मुलगी जन्माला येवू नये असे वाटणे व पुढे त्याच मुलीच्या पोटी वंशवेल वाढण्याची अपेक्षा करणे या दुटप्पी सामाजिक भूमिकेचा पर्दाफाश डॉ. भाग्यश्री यशवंत यांनीकेलेला आहे. हे वास्तव रचना यांनी उलगडवून सांगितले आहे. तसेच भाग्यश्रींच्याकवितांतून तारुण्यात सुखी संसाराची स्वप्नेरंगविणाऱ्यामुलीच्या विवाहानंतर झालेल्या अपेक्षाभंगाचीदुखरी जाणीव सूचकतेने व्यक्त झालेली आहे. स्रीच्या वाट्याला आलेले अनेक भोग तिच्या घालमेलीचे अनुभव, त्यातच तिचे तुटत जाणे तरीही संसाराशी एकात्म होत त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, चाळीशीनंतरच्या शरीर-मानसिकबदलांचीहोणारी घालमेल, सासू-सुनेचा संघर्ष व शेवटी सहन करणं ही बाईची प्रकृती आहे. तिच्या सहन करण्यातफक्त बाईपण हेच मुळ आहे याविचारसूत्राच्या आधारे त्यांच्या कवितांचे विश्लेषण नेमकेपणाने केलेले आहे.
श्रीमती वैशाली मोहितेंच्या कवितांच्या आकलनासाठी रचना यांनी स्रीवादी समीक्षक सिमॉन दि बोव्हा यांच्या सिद्धांतातील संकल्पनेचे उपयोजन केलेले आहे. ही या समीक्षा ग्रंथाची जमेची बाजू होय. वैशाली मोहिते यांच्या कवितांतील सिता, राधा व राम मिथकांची योजना करण्यामागील भूमिका व मिथकांचा आजच्या काळासंदर्भातील अन्वयार्थ लावला तर मोहितेंच्या कवितांचेवेगळेपण लक्षात येईल. त्यांनी योजलेली प्रतिमासृष्टी खास समकालीन आहे. उदाहरणार्थ मन डाऊनलोड करणे, माणसांचा बाजार इत्यादी प्रतिमा वेधक आहेत. यादृष्टीनेशोध घ्यायला वाव आहे.
श्रावणी बोलगेंच्या कवितांत आत्मभान असून स्री-पुरुष विषमतापूर्ण समाजव्यवस्थेतील अनेक दोषांचे सोदाहरण प्रतीकात्मक चित्रण येत असल्याची मांडणी रचना यांनी केलेली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतील दुटप्पीपण स्रीयांच्या शोषणाला कारणीभूत ठरत असल्याची तीव्र जाणीव बोलगेंच्या कवितांतून व्यक्त होते. बलात्कारित स्रीचे दुःख व तृतीयपंथीयांच्या वेदनांशी तादात्मिकरण करून घेतल्याने त्यांच्याविषयीच्या तरल संवेदना व्यक्त करणारी अभिव्यक्ती वेधक आहे. श्रावणी बोलगे यांनी अलक्षित विषय हाताळल्याने त्यांच्या कवितेतील आशयाचे नाविन्य चटकन लक्षात येते, असे निरीक्षण रचना यांनी नोंदविले आहे. बोलगेंच्या कवितांतून स्त्रियांच्या व्यथांचे व्यापक चित्रण करण्यात आले असल्याचानिष्कर्ष काढलेला आहे. उत्तरआधुनिक जीवनव्यवहाराचे संदर्भ बोलगेंच्या कवितांना आहेत असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या अनुषंगाने सोदाहरण विश्लेषण करता आले असते.
श्रीमती स्वाती पाटील यांच्या कवितांतून स्रीच्या सोशिक वृत्तीचे अनेक दाखले आलेले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने ग्रामीण जीवनावर केलेल्या विदारक परिणामांचे चित्रण करण्यात आलेले आहे. स्रीयांतील सकारात्मक वृत्तीच त्यांचे आत्मबल वाढीस कारणीभूत ठरत असल्याचा नवा काव्याशय स्वाती पाटील यांनी घडविला आहे. उदाहरणार्थ,
“ नवरा मेला सोडून गेला तरी
नसतंच कोणालाही सुतक
तिच्याएकटेपणाचं…
त्याच्या टायमाला
कावकावणारे कावळे
तिच्या वेळी मात्र
कुठं गायब होतात
कोण जाणे?
संस्कृती जतन का काय म्हणतात
ते हेच असेल का कदाचित??
तिच्या जीतात्म्याचा काकस्पर्श रोखणारं..!”१
ताराबाई शिंदेंच्या लेखनशैलीची आठवण करून देणारी ही कविता प्रश्नार्थक शैलीत अवतरते तेव्हा आपल्या समाजातील विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवते. स्रियांची कविता कशी असावी याची दिशा प्रस्तुत लेखनशैलीतूनध्वनित होते. या दृष्टीने स्वाती पाटील यांची कविता महत्त्वाची असल्याचे मत रचना यांनी नोंदविले आहे.
डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या कविता सामाजिक जाणिवांचे चित्रण करणाऱ्या व विद्रोही प्रकृतीच्या आहेत. पती-पत्नीच्या सहजीवनाविषयी यांनी घेतलेली भूमिका आदर्शवत आहे. पतीने पत्नीला सोबती, सहप्रवासी किंवा सांगाती म्हणून सन्मानपूर्वकस्थान द्यावे, परावलंबी समजू नये, हा विचार महत्त्वाचा आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला समर्थन देणारा काव्याशय घडवून त्यांनी विदर्भाच्या जनतेच्या हलाखीकडेहीलक्ष वेधले आहे. स्पष्ट राजकीय भूमिका व तत्त्वज्ञानाच्या बैठकीमुळे त्यांच्या कवितेतील वैचारिकता प्रगल्भ जीवनदृष्टीचा प्रत्यय देते. वानखेडे या कवितेच्या आशयाबरोबरच रूपदृष्ट्या सजगता असलेल्या कवयित्री आहेत.
रचना यांनी संगीता गुरव यांच्या कवितांतील घर, स्री व पुरुष हे आदिबंध उलगडवून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.संसाराच्यानित्य रगाड्यात पिचलेल्या स्री-मनाचे प्रातिनिधिक अनुभव मांडलेले आहेत. समई व नदी पारंपरिकप्रतीकांचे वाचन केले आहे. संगीता गुरव या रुपदक्ष कवयित्री असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितांतून येतो. उदाहरणार्थ पहा,
“घरानं बडवलं उंबऱ्यानंअडवलं
भिंतींनी कोंडलं, चुलिनी मांडलं
छपरानं झाकलं, अश्रूंनीसारावलं
भाजलं-कापलं, सललं, सोसलं
दुःखतिचं बोललं”२
क्रियापदांच्या विशिष्ट योजनेतून निर्माण झालेल्या आवृत्तीमुळे कवितेत लयबद्धता निर्माण होते. अनुस्वारांच्या आवृत्तीतून लयबद्धतेला, अर्थाच्या सुचकतेला अधिक उठाव प्राप्त होतो. हे उत्तम काव्यसंहितेचे लक्षण आहे. यातून गुरव यांच्या अभिव्यक्तीचे वेगळेपण चटकन नजरेत भरते. रचना यांनी आशयविशेषांवर भर दिल्यामुळे अभिव्यक्ती वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणे राहुन गेले आहे.
अर्चना डावखर या धाडसी काव्याभिव्यक्ती असलेल्या कवयित्री असल्याचे मत रचना यांनी नोंदविले आहे. समकालीन जीवनाचे आकलन करून घेण्यासाठी सीता व द्रौपदी या मिथकांना त्यांनी नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधवास्रीच्या मनातील भाव-भावनांचीआंदोलनेअत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केल्याने मराठी काव्यपरंपरेच्या आशयात्मक वाढीस त्यांनी हातभार लावला आहे. विधवा स्रीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याच्या सामाजिक मानसिकतेला त्यांच्या कवितेतून जाब विचारला जातो. प्रेम, विरहाचे धीट वर्णन केल्याने ही कविता स्रीवादी प्रकृतीची असल्याचा प्रत्यय येतो. अर्चना डावखरांच्या कवितांतील आशयाचे नाविन्य प्रशंसनीय आहे. स्री-विशिष्ट अनुभवांच्या मांडणीतून सूचकता प्रकट केल्याने समकालीन मराठी स्री-कवयीत्रींत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे वेगळेपण रचना यांनी नमूद केलेले आहे.
सावित्री जगदाळे या जेष्ठ कवयित्री आहेत. त्यांनी‘विठ्ठल’ व‘कविता’ ही दोन मिथके मांडून स्वतंत्र काव्याभिव्यक्तीची चुणूक दाखवून दिलेली आहे. मराठी कवितेच्या परंपरेशी अनुबंध साधणारी अभिव्यक्ती असल्याने त्यांच्या कवितेतील वैचारिकता संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका वठवते. त्यांनी योजलेल्या ‘विठ्ठल’ या मिथकाची सविस्तर चिकित्सा करणे उद्बोधक ठरेल. रचना यांनी त्यांच्या कवितांचे आकलन स्री जाणीव व संवेदना या केंद्रवर्ती सूत्र अभ्यासाच्या आधारे केलेले आहे.आत्मनिष्ठेकडून आत्मशोधाकडे वाटचाल करणारी स्री प्रतिमा आत्मोद्धाराच्या दिशेने विचार करू लागते ही खास भारतीय स्री संवेदना सावित्रीजगदाळेंच्या कवितांतून प्रत्ययाला येते. त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान व्यावहारिक अनुभूतींतून तपासात संत कवितेशी नाळ जुळवून घेतल्याने अधिक प्रगल्भ स्री जाणीवा व संवेदनानुभूतींचे आविष्करण केलेले आहे.
मनीषा पाटील या गंभीर प्रकृतीच्या कवयित्री आहेत. विधवा स्रीला आलेल्या दुःखद अनुभवांचे धारदार कंगोरे त्यांच्या कवितांतील आशयाची व्यापक अर्थक्षमता दर्शविणारे आहेत. झोकून देऊन नाते जपण्याच्या स्त्रियांच्या नैसर्गिक स्थायीभावाकडे त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. पारंपरिकलोकोक्तींना नवीन अर्थ बहाल करण्याचे कसब म्हणून त्यांची ‘बायका’ ही कविता उल्लेखनीय आहे. पाटील यांच्या कवितांच्या आधारे संस्कृतीची निर्मिती, उभारणी व विकासातील स्रियांचे योगदान दुर्लक्षित केले जाते, त्यामागे असलेली हेतुपुर्वकता रचना यांनी उलगडवून दाखवली आहे. त्यांची एक कविता पहा,
“नसतेच सुंदर बाईपण
जाहिरातीत दाखवतात तसे
रापलेली बोटं, टाचेच्या भेगा
साक्षीलाच असतात तिच्या उन्हाळ्यांच्या”३
प्रस्तुत कवितेतून माध्यमांतील आभासी स्री-प्रतिमा व प्रत्यक्षातील स्री-प्रतिमा यातील फरक दर्शवून सौंदर्याच्या बेगडी संकल्पनेचा उपहास करून सामाजिक धारणेच्या विसंगतींवर नेमके भाष्य केलेले आहे. मनीषा पाटील यांच्या कवितेतील स्रीविषयक चिंतन वाचकांना नवदृष्टी देणारे आहे, असे रचना यांनी केलेल्या विश्लेषणातून स्पष्ट होते.
सुनंदा शिंगनाथ यांच्या कवितांतून व्यक्त झालेल्या स्री जाणीव आंबेडकरी विचारांनी प्रभावित आहेत. त्यामुळे त्या राजकीय भान असलेल्या कवयित्री ठरतात. रूपदृष्ट्या सजगता ठेवल्यास त्यांची कविता अधिक प्रभावी होईल, असेनिरीक्षण नोंदवावेसे वाटते. त्यांच्या कवितेतील संवादात्मक शैली लक्षणीय आहे. दीर्घ कवितेतचा आशयबंध घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्यांनी अशी काव्याभिव्यक्ती केल्यास हे त्यांचे वेगळेपण ठरेल असे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते.
उषा हिंगोणेकरांच्या कवितेचा प्रेरणास्रोतही आंबेडकरी विचारधारा आहे.बंडखोर अभिव्यक्ती व शोषणाविरुद्ध आवाज उठविणे ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या कवितेतील विद्रोहाची भाषा क्रांतीचे आवाहन करते. क्रांतीच्या फঁटसीत रममाण होण्याच्या सोस ही दलित कवितेची मर्यादा ठरण्याचा धोका संभवतो. कारण क्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या चळवळींचे थंडावणे, त्यातील स्वार्थी राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला असलेली कुंठितावस्था व पैसाकेंद्री जीवनाचे आकर्षण क्रांतीला मारक ठरणारे आहे. अशा कविता दलित वास्तवापासून दूर जातात आणि काव्याभिव्यक्तीच्यादृष्टीनेही एकसुरी बनतात. ही बाब लक्षात घेऊन हिंगोणेकारांनी लेखन केले तर त्या प्रभावी काव्यनिर्मिती करतील. प्रस्तुत प्रकरणात अशीचिकित्सा अपेक्षित होती.
मनीषा घेवडे यांच्या कवितांतून प्रेमाच्या तरल स्री अनुभूतींच्या संवेदनांचा प्रत्यय येतो. धरती, आभाळ व सूर्य या पारंपरिक प्रतीकांची योजना करण्यात आलेली आहे. दैहिक अनुभूतींचा धीट अविष्कार करणाऱ्या स्रीवादी काव्यपरंपरेत त्यांनी भर घातली आहे. तसेचछाया बेले यांच्या कवितांतून स्रीसंवेदनांबरोबरचसामाजिक प्रश्न व समस्यांवर सूचक भाष्य येते असे निरीक्षण रचना यांनी नोंदविले आहे. अमृता प्रीतम यांच्या प्रभावातून कवयित्रीचे काव्यव्यक्तीमत्व स्रीवादी अभिव्यक्तीसाठी अधिक उजळ झाले.स्रियांसाठी घर हे ‘कबर’ ठरत असल्याची विस्मयकारक जाणीव त्या करून देतात. त्यांच्या कवितांतील आशयाची व्यापकता वाखाणण्याजोगी आहे. अल्पाक्षरी शैली, सूचकता या विशेषांमुळे कवितेतील सौंदर्यानुभूतीचा प्रत्यय येतो. त्यांच्या कवितेतील सामाजिकतेची सोदाहरण चर्चा करण्यात आलेली आहे.
योगिनी सातारकर पांडे यांच्या कवितांतून प्रगल्भ स्री जाणीव व संवेदनांचा प्रत्यय येतो. समकालीन वास्तवाचे आकलन करून घेण्यासाठी मिथकांची योजना करून स्री पुरुष नात्याचा प्रभावी अर्थ उलगडण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्या काव्यसंहितांचे ठळक वैशिष्ट्य नोंदविता येते. उदा. द्रौपदी व कृष्ण या मिथकांची मैत्रभावाचे प्रतिक म्हणून योजना करण्यात आलेली आहे.त्यांच्या कवितांतील कमालीची सूचकता लक्षवेधक ठरते उदाहरणार्थ,
“फक्त दोन सीझर्सनी शिवलेल पोट
आणि तीन गर्भपातांच्याओझ्याने मोडलेली कंबर
दिसत नाही कोणाला इतकच !”४
स्रीबरोबर तिच्या वेदनांनाही गृहीत धरणे अन्यायकारक आहे ही जाणीव उपहासाने करून देण्यात आलेली आहे. कवितेतील संवादात्मक शैली काव्यगत अर्थाला अधिक उठाव प्राप्त करून देते. पुरुषसत्ताक राजकारणातील कावेबाज डावपेच स्रीशोषणाच्यामुळाशीआहेत, हे भान प्रकट होते. संस्कृती अभ्यासाचे पुनर्वाचन करून यांच्या ऐतिहासिक योगदानाची पुनर्मांडणी करण्याचा विचार मौलिक आहे. त्यांनी चित्रित केलेली द्रौपदीची प्रतिमा मुळातून वाचण्यासारखी आहे. ही काव्यअभिव्यक्ती समकालीन स्री कवितांत मौलिक भर घालणारी आहे.
गीतांजली वाबळे यांनी अभंग, गझल व हायकू बरोबरच मुक्तछंदातही कविता लिहिल्या आहेत. स्रीवादी विचारांचा प्रभाव डोंबाऱ्याच्या मुलीचे प्रतीकात्मक रुपात चित्रण करून स्रीचे आयुष्य / जीवन असेच टांगणीला लागलेले सतत पुरुषांच्या हातात तिच्या नियंत्रणाचा दोर असल्याने व्यवस्थेच्या तालावर नाचनेच तिला भाग पाडले जाते, हा काव्याशय व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय देणारा आहे. त्यांनी घेतलेलास्वत्त्वाचा शोध वेधक आहे. ही अपेक्षा वाढवणारी काव्याभिव्यक्ती आहे.
उपसंहारात रचना यांनी पंधरा कवयित्रींच्या कवितांच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात धांडोळा घेतला आहे. या सर्व कवयित्रींच्या कवितांतून कोणते युगभान प्रकट होते? जागतिकीकरणाच्या भूलभूलैयाला स्री जाणीवा कशा प्रतिसाद करतात? स्री संवेदनेचे स्वरूप बदलते का? प्रतिमा, प्रतीके व मिथके यांची नव्याने योजना करण्यात आलेली आहे का? पाश्चात्य स्रीवाद व भारतीय स्रीवाद याविषयी मौलिक चिंतन असलेली वैचारिक भूमिका कोणत्याकवयित्रींच्याकवितांतून प्रकट होते? आपल्या समाजातील अन्य भेदांकडे स्री कवयित्री कशा पाहतात? पूर्वसुरींचा प्रभाव कोणी पचवला आहे? नव्या काव्यसंहिता घडविण्याचे सामर्थ्य कोणत्या कवयित्रींत आहे? स्रीवादी कवितेची सौंदर्यमुल्ये समकालीन मराठी स्री कवयित्रींच्या कवितांतूनप्रकट झालेली आहे का? अशा काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतल्यास रचना यांच्या समीक्षा व्यवहारात भर घालण्यास पुरता वाव आहे. रचना यांच्या समीक्षा ग्रंथाचे वाचक, अभ्यासक स्वागत करतील. अभ्यासक संदर्भ म्हणून नोंद घेतील हा विश्वास वाटतो.
संदर्भ:
१) रचना,स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एकअभ्यास (निवडक कवयित्रींच्या आधारे),साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर,ऑगस्ट २०१९, पृ. ६५
२) उ. नि. पृ.९५
३)उ. नि. पृ.१३७
४) उ. नि. पृ.२१५
साहित्याक्षर प्रकाशनाचे पहिले पुस्तक म्हणजे ‘स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदन ‘रचना यांनी लिहिलेल्या या समीक्षाग्रंथाचे आकलन करणारा हा लेख डॉ.अरुण ठोके यांनी लिहिला आहे.त्यांचे हार्दिक आभार.ब्लोगला भेट देणाऱ्या रसिकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत.धन्यवाद.
– संपादक