‘हुमान’अस्वस्थ जाणिवांची कविता -किशोर कवठे
हुमान : मुखपृष्ठ
मानवी जाणिवा अस्वस्थ व्हायला लागल्या की त्यातून मूक संवेदनेची अभिव्यक्ती होत असते.
प्रत्येक कलावंत स्वतःची जाणीव, अनुभव आणि निरीक्षणाच्या मदतीने समृद्ध करीत जातो.
शब्द वैभव प्रत्येकाच्या ठायी वास करीत असते. किंबहुना ते परंपरेने रक्तात भिनलेले असते. ज्यांना
जगण्याचा सूर गवसला त्यांचे शब्द जीवनगाणे होत असतात. स्त्रिची जाणीव संसाराच्या
रहाटगाड्यात अस्वस्थ झालेली असते. समाजाची काही परिमाणं विखारी संस्कृतीने
तिच्यावर लादलेली असतात. पण भुईच्या दातृत्वाचा वसा घेऊन जगाचे दुःख भवतालची
अगतिकता , निसर्गाची नानाविध रुपे साकल्याने व्यक्त करणारी … सावित्री जगदाळे सारखी
प्रतिभावंत कवयित्री दगडांचीही फुले करण्याची ताकद शब्दात ठेऊन कवितांतून मानवी प्रश्नांची उकल
करते.
कवयित्री सावित्री जगदाळे ह्यांचा ‘हुमान ‘ कवितासंग्रह नुकताच वाचनात आला.
संतोष घोंगडे यांचे समर्पक मुखपृष्ठ कवितेच्या अंतरंगाची उकल करते. सावित्री जगदाळे
यांची काव्य भुमिका व्यथा- वेदनांशी नाते सांगणारी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी
सोसलेली कौटुंबिक धग जगदाळे यांच्या कवितेत दिसते. ‘ कुटुंब ‘ हाच परिघ तेथील विचार
म्हणजेच जीवन – प्रवास . अशी काहीशी अवस्था कवयित्रीची झाली असल्याने , ‘ धागा सापडला सुखे
शब्द आहे माझा श्वास |
असे म्हणण्याचे धाडस करते. जगण्याचा श्वास जेव्हा शब्द होतात तेव्हाच तुकोबाच्या
वाणी सारखे शब्द जीवनाला वाहून नेण्यास धावून येत असतात. अभिव्यक्त होण्याच्या
अनिवार उर्मीतून कविता फुलत गेली आहे. लोकसाहित्याचा संस्कार कवितांतून पाझरताना दिसतो.
मराठी कविता विठ्ठलाच्या अवतरणाशिवाय कशी अलिप्त राहू शकेल? कवयित्रीला विठ्ठलाचे
सामाजिक अस्तित्व मान्य आहे. म्हणूनच ती लडीवाळपणे विठ्ठलाला त्याच्या निर्गुण निराकारा
बाबत प्रश्न विचारते. ‘ किती निर्गुण निराकार आहेस तू …. ‘
किंवा
पाठीत खंजीर |ते खुपसणारे | लोक असे बरे| पांडुरंगा।|
समाजात विश्वासघातकी वृत्ती बळावली आहे. विश्वास ठेवावा असा माणूस उरला नाही.
अशा स्थितीत कवयित्रीचे मन आक्रंदते. ही तिचीच अवस्था आहे असं नाही, प्रामाणिक आयुष्य
जगणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला हा भोगवटा येत असतो. कवायित्रीचे आकलन समुहाचे आहे.
कवयित्रीची मागणी प्रतिकांतून प्रेरित होते.
‘पाऊस ‘(पृष्ठ -१६ ) कवितेत ती, ‘ पाऊस हळवा | भरलेली झोळी । दे लुगडं चोळी । धरणीला ‘
उपेक्षितांच्या वाट्याला हिरवळीचे दिवस येऊ दे . ही तिची मागणी अभावग्रस्त समाजाला आशेचं
किरण दाखवणारी आहे.
कमी शब्दात प्रचंड आशय सुत्राची बांधणी करणे खरे तर कवितेचा बाज असतो. अल्पाक्षरीत
नेटकेपणाने शब्दफेक करुन कवयित्रीने ते सामर्थ्य सिद्ध केले आहे. मध्यमयुगीन काळापासून
संतांनी समाजप्रबोधनासाठी ‘ अभंग ‘ काव्यप्रकार हाताळला. स्त्री संत परंपरेत संत जनाबाई,
संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई इत्यादी स्त्रित्व जगणाऱ्या स्त्रियांनी प्रापंचिक दुःखा
सोबत सामाजिक परंपराही अधोरेखित केल्या होत्या. याच परंपरेशी कवयित्री सावित्री जगदाळे नाते
सांगते. रोजमर्रा
जिंदगीची संक्षिप्त कहाणी ‘हुमान’ मधून मांडते. कविता जगविण्याचा खटाटोप आशावादी आहे.
धीर सोडून जगणे कवयित्रीला नापसंद आहे. कवी असण्याचे समाधान व्यक्त करताना ती म्हणते,
हिणवणाऱ्यांची । वाचणाऱ्यांपेक्षा | जास्त असे संख्या |ही समज॥
ध्यानीमनी जागे । मानावे लागते | कवी असल्याचे समाधान ॥
परंपरेने लादलेले जोखड कवयित्रीला नको आहे. मानेवरचे जू झुगारून जगण्याला निधड्या
छातीने पुढं जावं. जगण्याचे संदर्भ बदलले तरी परिस्थिती बदलत नाही. म्हणून सजगतेने पावलं
टाकत जावं . ही अपरिहार्यता कवितेत दिसते. कर्मकांडांनी स्त्रिचे स्वातंत्र्य पादाक्रांत केले .
पुरुषी व्यवस्थेला स्त्री बळी पडली. एक व्यक्ती म्हणून तिचा विचार न होता भोगवादी वस्तू
म्हणून तिचे शोषण झाले. म्हणून कवयित्रीला अशा जडत्वाच्या भिंती नको आहेत. कवयित्री लिहिते,
‘ गळून पडू दे कर्मकांडाचे देव्हारे
तुझ्या मनातले दूर होऊ दे अडथळे
नाहीशा होऊ दे जडत्वाच्या भिंती
नाश होऊ दे अहंकारी थारोळे (पृष्ठ क्र. -३२ )
‘लय दुक होतं ‘ कवितेत कवायित्रीने बदलत चाललेल्या कौटुंबिक मानसिकतेचा वेध घेतला आहे.
जन्म देणाऱ्या आई -बापाला म्हातारपणात नाकारणारी औलाद पैदा होण्यापेक्षा कूस वांझ असलेली बरी. असा प्रत्यय अनेकांच्या आयुष्यात येतो.
दुःख कितीही असो पण जगणं निधडी छाती करुनच जगलं पाहिजे. कठीण प्रसंगांना सामोरे
जाताना मन वज्रासारखे असले पाहिजे. तरिही आपल्यावर अवलंबून असलेल्यांचं मन ओळखता
आलं पाहिजे. हाच धागा घेत कवयित्री सांगते,
वाघासारखं जगणं
सिंहासारखं वागणं
. घरात हरिणी दोन
काय त्यांचं मागणं ( पृष्ठ क्र. ५२)
आधुनिकीकरणात माणूस निसर्ग आणि मानवता विसरत चालला आहे.
औद्योगिकीकरणामुळे सभोताल सिमेंटची जंगले उभी झालीत. अंगणात आता माती
शिल्लक राहिली नाही. विकासाच्या नावाखाली महाकाय वृक्ष जमीनदोस्त झालीत.
हे दुखरं वास्तव कवयित्री शब्दांत व्यक्त करते.
‘चिमण्यांसारखेच बालपण उडून गेले
सुपात दळण करण्याचे दिवस सरले
अंगणात दाणे टाकायला अंगण उरले नाही
चिमणीनं घरटं बांधायला झाड उरले नाही ( पृष्ठ क्र. ५५ )
कवयित्रीला मनाची अवस्था उनाड पाखरांसारखी वाटते. सगळेच सोबतीला असूनही
एकांतवास मात्र मनात गलबला निर्माण करते. कवयित्री मनाची चंचल अवस्था जाणून आहे. ती म्हणते,
‘घेऊ कोंडून स्वतःला
आत शोधीत आत्म्याला
मन सैरभैर चंचल हे
कसे स्थिरावू त्याला ( पृष्ठ क्र. ८७ )
ग्रामीण जिवनाचा प्रभाव कवयित्रीच्या भाव जिवनावर झाल्यामुळे शेती, माती, पेरणी या सबंधाचे
विषय कवितेत आले आहेत. तरूणाईच्या प्रेमापासून वृध्द्त्वाचा विरह, प्रवाह कवितेत तुरळकपणे
आला असला तरी महत्वपूर्ण आहे. बालमनाच्या भावविश्वाच्या, बालप्रेम जाणिवांचा उल्लेख
कवयित्रीने स्वाभाविकपणे योजला आहे. कवयित्री यांची कविता एका अनामिक दुःखाला हृदयाशी
कवटाळून प्रवास करीत आहे. दुःख पारंपारिक असले तरी दृष्टी मात्र आधुनिक आहे. पुरुषप्रधान
व्यवस्थेत नवी वाट शोधणारी ‘बाईची कविता ‘ आहे. तिच्या लौकीक जीवनाचा आधार कविता आहे.
मनातील वेदना स्व परिप्रेक्षातून व्यक्त करताना विठ्ठलसाक्ष तिला महत्वाची वाटते. कवयित्रीची
कविता केवळ प्रापंचिक दुःख सांगून थांबत नाही तर प्रबोधन आणि चिंतनही करते. कवयित्री
सावित्री जगदाळे यांची कविता बोलीच्या शब्दाने समृध्द असल्याने वाचकांच्या मनात आदराचे
स्थान निर्माण करते. वाचकाच्या भावनाशी तादात्म पावणाऱ्या कविता खऱ्या अर्थाने वाचकांच्या
होऊन जातात. अशा कवितांना मरण नाही कारण त्या प्रामाणिक व्यथांच्या साक्षिदार असतात.
एकंदरित मानवी जिवनाचे विविध पैलू उजागर करणारी कवयित्री जगदाळे यांची कविता
समाजाचे प्रतिबिंबच आहे. पुरुषी व्यवस्थेत स्त्री स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी ही कविता शब्दवेल्हाळ
होत जाते. कवितेची लांबी किती यावरून कवितेचे आयुष्य ठरत नसते तर आशयाची ताकद
कवितेला समृद्ध करीत असते याचे भान प्रत्येक कविता कर्त्याने ठेवले पाहिजे. कवयित्री महदंबे
पासून कवयित्री जगदाळे यांच्या पर्यंतचा दुःख आख्यानाचा विषय समाज अनुभवतो आहे. स्त्रिच्या
दुःखाचे शोषणाचे स्वरूप काळानुसार बदलले पण समग्र उच्चाटन झाले नाही. पण अशाही अवस्थेत
कवयित्री सावित्री जगदाळे यांचा शब्द प्रवास उद्याच्या नव पहाटेची नांदी आहे. प्रस्तूत संग्रहाला
साहित्यिक शंकर सारडा यांची प्रस्तावना लाभली असून समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांचे
सूचक पूर्ण विधान पाठपृष्ठावर केले आहे. पुरुषी व्यवस्थेला प्रश्न करून स्त्री जाणिवांना समृध्द
करणारा असा हा आकर्षक काव्यसंग्रह आहे. कवयित्री सावित्री जगदाळे यांना पुढील वाटचालीस
मंगलमय शुभेच्छा.
कविता संग्रह – ‘हुमान‘
कवयित्री – सावित्री जगदाळे – ९७६५९८८९९३
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन , पुणे.
०२० २४४७१७२३
पृष्ठे . १६७
किंमत – रु. २२०/ –
*************
किशोर कवठे
विद्यानगरी , बामन वाडा,
ता. राजुरा जि. चंद्रपूर -४४२९ ०५
मो. ९४२०८६९७६८